बाणेर मधील विविध विकासकामांसाठी पालकमंत्री आग्रही ;विकासकामे जलदगतीने पूर्ण करण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना


बाणेर: बाणेरमध्ये महापालिकेच्या माध्यमातून सुरु असलेल्या विविध विकासकामांची पालकमंत्री नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी आज पाहाणी केली. तसेच सुरु असलेली कामे जलदगतीने पूर्ण करावित अशा सूचना नामदार पाटील यांनी यावेळी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना केल्या. तसेच विकासकामांसाठी निधीची कमतरता असल्यास जिल्हा नियोजन आणि आमदार निधीतून तरतूद केली जाईल, असेही यावेळी आश्वास्त केले.

यावेळी माजी नगरसेवक अमोल बालवडकर, नगरसेविका ज्योती कळमकर, स्वप्नाली सायकर, भाजपा नेते गणेश कळमकर, प्रल्हाद सायकर, उमाताई गाडगीळ यांच्या सह रस्ते दिनकर गोजरे, भवन हर्षदा शिंदे, स्मार्ट सिटीचे आरुण गोडबोले, औंध बाणेर क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त संदीप कलाटे आदी विभागांचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सर्वप्रथम बाणेरमधील सावरकर उद्यानामध्ये महापालिकेच्या माध्यमातून उभारण्यात येणाऱ्या क्रीडा संकुलाची पाहाणी केली. सदर काम का रखडले आहे, अशी विचारणा नामदार पाटील यांनी भवन विभागाच्या हर्षदा शिंदे यांना केली‌. सदर क्रीडा संकुलासाठी महापालिकेने उपलब्ध करुन दिलेला निधी अपूरा असल्याचे शिंदे यांनी नामदार पाटील यांना सांगितले. त्यावर सदर कामासाठी जिल्हा नियोजन आणि आमदार निधीतून निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वास्त केले.

यासोबतच ज्युपिटर हॉस्पिटल जवळ सुरु असलेल्या दोन पूलाच्या कामाची देखील नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी पाहाणी केली. वाहतुकीच्या दृष्टीने दोन्ही पूल महत्वाचे असल्याने सदर कामे जलदगतीने पूर्ण करण्याच्या सूचना पथ विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी बाणेरमधील कलमाडी शाळेसमोर स्मार्ट सिटीने विकसित केलेल्या उद्यानाला नामदार पाटील यांनी भेट दिली. सदर उद्यानाची देखभाल दुरुस्ती योग्य प्रकारे होत नसल्याची तक्रार स्थानिक नागरिकांनी नामदार पाटील यांच्याकडे केली. त्यावर संबंधित उद्यान हे स्मार्ट सिटीकडून महापालिकेला पूर्णपणे हस्तांतरित झाले नसल्याचे अधिकाऱ्यांनी निदर्शनास आणून दिले. त्यावर नामदार पाटील यांनी अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमनार यांच्याशी संपर्क साधून सदर उद्यानाची देखभाल दुरुस्तीसाठी तरतूद करावी. तसेच उद्यानासाठी दोन सुरक्षारक्षक नेमण्याची सूचना केली.

See also  औंध इंदिरा वसाहत येथे संविधानाचा जागर



बालेवाडी-वाकडला जोडणारा सोपान बाग येथील प्रस्तावित रस्त्याची ही नामदार पाटील यांनी यावेळी पाहाणी केली. सदर प्रस्तावित रस्त्यासाठी खासगी विकासकाला टीडीआर मिळाला आहे. पण तरीही विकासकाने जागा हस्तांतरित केली नसल्याचे अधिकाऱ्यांनी निदर्शनास आणून दिले. त्यावर संबंधित विकासक आणि महापालिका आयुक्तांसोबत बैठक घेऊन हे काम मार्गी लावण्याचे आश्वास्त केले.

यानंतर नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी महापालिकेच्या माध्यमातून ६.५० कोटी रुपये खर्चून उभारण्यात येणाऱ्या मुलींच्या वसतिगृहाची पाहाणी केली. सदर वस्तीगृहाच्या कामाच्या पाहणीनंतर महापालिका आयुक्त आणि समाजकल्याण विभागाचे आयुक्त यांच्याशी बैठक घेऊन मुलींच्या वापरासाठीचे नियोजन करु, असे यावेळी स्पष्ट केले.