जिल्ह्यात २४ मे रोजी ‘लाक्षणिक हेल्मेट दिवस’ साजरा करण्यात येणार

दुचाकीचा वापर करणाऱ्या सर्व शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांनी हेल्मेट परिधान करण्याचे आवाहन

पुणे : हेल्मेट वापराच्या व्यापक जनजागृतीसाठी जिल्ह्यात २४ मे रोजी लाक्षणिक हेल्मेट दिवस साजरा करण्यात येणार आहे. शासकीय अधिकारी, कर्मचारी हे नियमितपणे हेल्मेटचा वापर करीत असले तरी त्यांनी हेल्मेट वापराच्या व्यापक जनजागृतीसाठी, जनतेस मार्गदर्शक ठरावे आणि स्वतःच्या व सहप्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने २४ मे रोजी हेल्मेट परिधान करून ‘लाक्षणीक हेल्मेट दिवस’ साजरा करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले आहे.

भारतात दररोज सुमारे ४११ भारतीयांचा रस्ते अपघातांमध्ये बळी जातो. वाहन अपघातात दगावणाच्या व्यक्तींमध्ये सुमारे ८० टक्के व्यक्ती या दुचाकी वाहन चालक, पादचारी आणि सायकलस्वार असतात. हेल्मेटमुळे दुचाकीचा अपघात घडल्यास जीव वाचण्याची शक्यता ८० टक्क्याने वाढते. मोटार वाहन कायद्यानुसार ४ वर्षांवरील प्रत्येक व्यक्तीने दुचाकीवरुन प्रवास करतांना हेल्मेट परिधान करणे आवश्यक आहे.

जागतिक स्तरावर १५ ते २१ मे दरम्यान शाश्वत वाहतूक या विषयासंदर्भात ‘७ यूएन ग्लोबल रोड सेफ्टी वीक २०२३’ चे आयोजन करण्यात आले आहे. रस्ते अपघातांप्रती स्वयंसेवी संस्था, शासन यंत्रणा, प्रसारमाध्यमे तसेच सामान्य नागरिकांचे लक्ष वेधणे व रस्ते अपघात टाळण्याच्या प्रयत्नांना बळकटी देणे हा या सप्ताहाचा हेतू आहे. केवळ जागरूकता वाढवणे हाच नव्हे तर रस्ते अपघातातील जखमींना वेळेत व योग्य उपचार व मदत मिळवून देणे हेही यात अंतर्भूत आहे.

मोटार वाहन कायदा १९८८ च्या कलम १२९ नुसार तसेच उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालय यांनी वेळोवेळी दिलेल्या निर्देशानुसार भारतात कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी दुचाकी चालविणाऱ्या तसेच पाठीमागे बसणाऱ्या व्यक्तीने हेल्मेट परिधान करणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने जनजागृतीसाठी या सप्ताहाअंतर्गत जिल्हाधिकाऱ्यांच्या संकल्पनेतून ‘लाक्षणिक हेल्मेट दिवस’ साजर करण्याचे निश्चित करण्यात आले आहे.

दुचाकीचा वापर करणाऱ्या सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, महामंडळे, महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषद, सर्व शाळा, कॉलेज व शासकीय यंत्रणा यांच्या कार्यालयात काम करणाऱ्या शासकीय अधिकारी, कर्मचारी यांना शासकीय कार्यालयात येताना जाताना हेल्मेट परिधान करणे बंधनकारक आहे.

See also  निधन वार्ता : कै.उत्तम बाळाजी मुरकुटे

सर्व कार्यालयप्रमुखांनी आपल्या कार्यालयामध्ये दुचाकीवरुन येणारे अधिकारी, कर्मचारी यांनी हेल्मेट परिधान करावे याबाबतच्या सुचना आपल्या स्तरावरुन पारित कराव्यात. दुचाकी वापरतांना हेल्मेट घातलेले नसल्यास संबंधीत अधिकारी, कर्मचारी व नागरीक हे मोटार वाहन अधिनियम १९८८ मधील तरतूदीनुसार शिक्षेस पात्र राहतील, असेही कळवण्यात आले आहे.