हडपसर : स्व. संदीप जगदाळे यांनी तळागाळातील घटकाला बातमी द्वारे न्याय देण्याचे काम केले आहे. हे नागरिकांच्या शब्दरूपी कौतुकातून दिसून येत आहे. शेवटी चांगल्या कामाची पावती समाजातून मिळत असते. त्याचेच रूप त्यांच्या नावाचा पुरस्कार आहे. असे सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी प्रतिपादन केले.
हडपसर नोबल एचएमए हॉल मध्ये मानवी युवा विकास संस्था व हडपसर पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार स्व. संदीप जगदाळे यांच्या द्वितीय स्मृती दिनानिमित्त दिला जाणारा संदीप जगदाळे स्मृती पुरस्कार आमदार चेतन तुपे, सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक माजी नगरसेवक प्रमोद भानगिरे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी माजी उपमहापौर निलेश मगर, माजी नगरसेवक योगेश ससाणे, सुनिल बनकर, माजी नगरसेविका उज्वला जंगले, जेष्ठ पत्रकार विलास जाधव, ज्ञानदेव जगदाळे आदी उपस्थित होते. पत्रकारिता मध्ये लोकमतचे पर्यावरण विभागाचे जेष्ठ पत्रकार श्रीकिशन काळे व एबीपी माझाचे जेष्ठ पत्रकार मिकी घई यांना देण्यात येणार आहे. तर सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारे होळकरवाडी येथील समाजसेवक रवींद्र झांबरे, मुस्लिम समाज सुधारणा चळवळीत काम करणारे पैगंबर शेख तर हडपसर उपनगर परिसरामध्ये आपत्ती व्यवस्थापन मध्ये काम करणारा युवक आझादसिंग टाक व पोलीस प्रशासनामधील मूळचा हँडबॉलचा खेळाडू प्रशिक्षक असलेले तानाजी देशमुख, रामटेकडी झोपडपट्टीतील घरची हलाकीची परिस्थिती असताना हि बी. ए एम एस झालेली विद्यार्थी पूजा शिंदे व ज्यांना कोणी नाही त्यांना आपली माता बनवून आश्रय देणारे गंगा तारा वृद्धाश्रमाच्या संस्थापिका नीता भोसले व ॲड. लक्ष्मी माने यांना सम्मान चिन्ह, शाल, गुलाबपुष्प देऊन सम्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्तविक मानवी युवा विकास संस्थेचे अध्यक्ष दिगंबर माने यांनी केले तर सुत्रसंचलन लक्ष्मण जाधव व पुरस्कारांचे वाचन मनोजकुमार धनलोभे यांनी केले तर आभार पत्रकार कृष्णकांत कोबल यांनी केले.
आमदार चेतन तुपे यांनी सांगितले, पत्रकार हा समाजाचा आरसा असतो, पुणे शहराचा विस्तार दिवसेंदिवस वाढत असताना येथील सामाजिक प्रश्न वृत्तपत्राच्या माध्यमातून ठळक पणे मांडण्याचे काम स्व. संदीप जगदाळे यांनी केले. पुण्याच्या पूर्व भागाची स्वतंत्र महापालिका नियोजित असताना पत्रकार पोलीस व राजकारणी यांची समाजाच्या वाटचालीत भूमिका महत्वपूर्ण आहे.
प्रमोद भानगिरे यांनी सांगितले, हडपसर भागात समजजिक आणि राजकीय क्षेत्रातील विविध घटकातील प्रश्नाला न्याय देण्याचे काम संदीप जगदाळे यांनी केले. त्यांनी केलेल्या बातमी मुळे अनेकजण राज्य व राष्ट्रीय पातळीवर पोहचले आहेत. सकारात्मक बातमी करणारे पत्रकार होते.