पर्यावरणाचे रक्षण -पर्यावरण मित्र  रामदास मारणे यांचा लेख

‘पर्यावरण’ या शब्दाचा अर्थ परि आणि आवरण हे दोन शब्द मिळून झाला आहे. परि म्हणजे आसपास,आपल्या चहूबाजूने आणि आवरण म्हणजे अच्छादित असलेले ते पर्यावरण! पृथ्वीवरील नैसर्गिक वातावरण!
       नैसर्गिक परिस्थिती म्हणजे हवा,पाणी, जीवसृष्टी,जमीन,नैसर्गिक वातावरण ही एकमेकांत गुंतलेली व्यवस्था आहे ,तिच्यात संतुलन असणं महत्वाचं आहे, असंतुलन झाले की जीवसृष्टीचा समतोल बिघडतो!
  हवा ,पाणी,जीवसृष्टी,जमीन या चार घटकांचे संतुलन पर्यावरणाचे संतुलन असते. पाणी, प्राणी,जंगल यांचे संतुलन बिघडले तर माणसाचे अस्तित्वही धोक्यात येईल!
   पृथ्वीवरील सर्व भौतिक परिसरांना पर्यावरण म्हणतात,यात सजीव आणि निर्जीव गोष्टींचा समावेश होतो.
भविष्यात जीव वाचविण्यासाठी आपल्याला पर्यावरणाचे रक्षण करणे आवश्यक आहे,ती पृथ्वीवरच्या प्रत्येक व्यक्तीची जबाबदारी आहे.


आपले पर्यावरण हजारो वर्षांपासून पृथ्वीवर प्रगती करण्यास,विकास करण्यास मदत करते! मनुष्य हा निसर्गाने निर्माण केलेला सर्वात बुद्धिमान मानला जातो.पण त्याच माणसाच्या चुकांमुळे नैसर्गिक हवा,पाणी,माती प्रदुषीत होत आहे.त्याचा परिणाम मानव व इतर जैविक प्राण्यांवर होत आहे.वाढते शहरीकरण आणि औद्योगिकीकरण त्यासाठी होणारी प्रचंड जंगलतोड,इंधन,कोळसा यांचा अतिरिक्त वापर यामुळेच वातावरणातील प्रदुषण वाढते आहे.यांचे गांभीर्य लक्षात आल्याने संयुक्तराष्ट्राद्वारे जागतिक स्तरावर जागृती निर्माण करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले.
५ जून हा जागतिक पर्यावरण दिन मानला जातो ,त्याची सुरुवात १९७२ मध्ये ५ जून ते १६ जून पर्यंत संयुक्त राष्ट्र महासभेने आयोजित केलेल्या विश्व पर्यावरण संमेलनाने झाली. ५  जून १९७३ हा दिवस पहिला विश्वपर्यावरण दिन साजरा केला गेला.
तरीही अजूनही भौतिक सुख मिळविण्यासाठी, स्वार्थासाठी,लोभामुळे मनुष्य निसर्गाशी खेळत आहे.झाडांची बेसुमार कत्तल होत आहे त्यामुळे जंगले उद्ध्वस्त होत आहेत. वेळीच पर्यावरण वाचविण्यासाठी पावले उचलली नाहीत तर मानवी अस्तित्व धोक्यात येईल,म्हणून अधिकाधिक झाडे लावावीत आणि झाडे तोडणे बंद करावे!
पर्यावरणच्या रक्षणाबाबत युवापिढीने अधिक जागरूक होऊन या कार्यात सक्रिय सहभागी होणे गरजेचे आहे.

पर्यावरणीय प्रदुषणाचा जीवनावर परिणाम होत असतो. पर्यावरणाचे रक्षण करणे हे आपले कर्तव्य आहे.पर्यावरणाचा परिणाम मनुष्य,जीवजंतू,प्राणी,पक्षी,नैसर्गिक वनस्पती यांच्यावर होत असतो.आरोग्यदायी जीवन जगण्यासाठी स्वच्छ वातावरणाची आवश्यकता आहे.आजच्या काळात आरोग्य बिघडत आहे.कृत्रिम खतांच्या दुष्परिणामामुळे अन्नधान्य पोषक असत नाही,शरीराची प्रतिकार शक्ती कमी होते निरोगी असूनही केव्हाही कोणताही आजार होऊ शकतो. शहरीकरण,औद्योगिकीकरण आणि निसर्गाबाबत असलेल्या आपल्या वागणुकीमुळे पर्यावरणातील प्रदुषण ही जागतिक समस्या झाली आहे.
तंत्रज्ञानाच्या प्रगती आपल्या सर्वांच्या जीवनात घडल्या आहेत.  ज्या जीवनाच्या संभाव्यतेस धोका आणत आहेत आणि पर्यावरणाचा नाश करीत आहे. हवा पाणी माती प्रदुषीत होत आहे. हे प्रदुषण थाबविण्यासाठी आपण उपाय योजना केल्या पाहिजेत.
हवा– कारखान्यांचा धूर,वाहने सोडीत असलेला धूर यामुळे हवा प्रदुषीत होत असते.यासाठी वाहनांचा कमीत कमी वापर करावा. सार्वजनिक वाहने किंवा सायकलचा वापर योग्य ठरेल!फटाके,आतिषबाजी या गोष्टी टाकाव्यात!
पाणी – नदी,नाले,तलाव यामधील पाण्याची स्वच्छता राखणे महत्वाचे आहे.  नद्या व त्यांचा परिसर स्वच्छ  ठेवणे हे आपले कर्तव्य आहे.

माती-मातीचे प्रदुषण ही सुद्धा फार मोठी समस्या आहे . नैसर्गिक माती टिकवून ठेवण्याची गरज आहे. रासायनिक खते आणि कीटक नाशकांचा वापर यामुळेच मातीची नैसर्गिक क्षमता कमी होत आहे.मातीचे गुणधर्म नष्ट होत आहेत.शेतीची उत्पादन क्षमता वाढविण्यासाठी केलेला रासायनिक खतांचा वापर,पसरणारा विषारी वायू,क्षारयुक्त पाण्याचा वापर,कारखान्यांचे आम्लयुक्त पाणी या सर्वाचा जमीनीवर वाईट परिणाम होत असतो. यासाठी योग्य चिंतन होणे आवश्यक आहे.सेंद्रिय शेती, पीक पद्धतीत बदल करायला हवा.मातीचे प्रदुषण रोखले पाहिजे.अन्यथा ती नापीक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.शेती करणे अशक्य होईल.

पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी काही गोष्टी कटाक्षाने टाळायला आणि पाळायला पाहिजेत, विजेचा कमी वापर,इंधनावर चालणा-या वाहनांचा कमी वापर, कच-याचे योग्य व्यवस्थापन, प्लॅस्टिक बॅगचा वापर कमी करून प्लॅस्टिक कच-याचे योग्य  व्यवस्थापन! या गोष्टी करायलाच हव्यात.
आरोग्यपूर्ण जीवन जगायचे असेल तर   गांधीजींचा “खेड्याकडे चला” हा मंत्र आचरणात आणण्याची वेळ आली आहे. निसर्गात रहा.नैसर्गिक जगू,कृत्रिमतेचा त्याग करू.अकृत्रिम जगा.निसर्गाचा समतोल राखू, अनेक  वनस्पती आणि प्राण्यांच्या जाती नष्ट होऊ लागल्या आहेत त्यांचे रक्षण करू!
पर्यावरण आणि आपण :
५ जून हा पर्यावरणदिन  म्हणून साजरा केला जातो. पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे, त्यावर काही उपाय योजना राबविण्यात येत आहे.विशिष्ट दिवस साजरे करून जनजागरण करण्यात येत आहे.पण पर्यावरणाचे महत्व हे जनमानसात मुळातच रुजायला हवे !
  पर्यावरण म्हणजे सृष्टीतील समतोल राखणे हे आपण जाणतोच! निसर्ग, मनुष्यप्राणी,यांचे जीवन एकमेकांवर अवलंबून आहे.
वाढती लोकसंख्या, जंगलतोड करून उभारण्यात येणारी सिमेंटची जंगले, वन्यजीव, पक्षी यांची घटत चाललेली संख्या या सर्वच चिंतेच्या बाबी आहेत. पर्यावरणाचे रक्षण ही रोजची बाब आहे.फक्त पाच जूनची भाषणबाजी नव्हे,ती दैनंदिन जीवनशैली असली पाहिजे !
वेगवेगळ्या प्रकारची प्रदुषणे ही पर्यावरणाला घातक ठरली आहेत, वायुप्रदुषण, जलप्रदूषण,ध्वनिप्रदूषण, प्लास्टिक कचऱ्याची समस्या !

पर्यावरण संरक्षणासाठी भारत सरकारने  काही कायदे केले आहेत. प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायदा,
,वन्यजीव संरक्षण कायदा, प्राणी प्रदुषण आणि नियंत्रण कायदा,वनसंवर्धन कायदा, वायुप्रदुषण कायदा,प्लास्टिक विषयक कायदा, जैविक विविधता कायदा आणि बांधकाम आणि विध्वंस कचरा व्यवस्थापन नियम ! पर्यावरण संरक्षणासाठीच सरकारने हे कायदे केले आहेत.

राष्ट्रप्रेमासारखीच “पर्यावरण प्रेम” ही भावना जनमानसात रुजली पाहिजे! पाणीटंचाई ही फार मोठी समस्या आहे त्यासाठी आपल्या दैनंदिन जीवनात पाण्याचा योग्य वापर, पाण्याची बचत या गोष्टींवर कटाक्षाने लक्ष दिले पाहिजे, सार्वजनिकरीत्या नदी व तिच्या भोवतीच्या परिसराची स्वच्छता !
  “पाणी अडवा पाणी जिरवा” ही मोहीम राबवण्यात आली पाहिजे! सर्व जलाशये, सार्वजनिक तळी यांची योग्य देखभाल आणि स्वच्छता महत्वाची आहे, पाणी म्हणजे जीवन, सर्व भूतलावर पाणी ही हवेइतकीच जीवनावश्यक गोष्ट आहे. पाण्याच्या वाढीसाठी योग्य प्रयत्न करायलाच पाहिजेत!

वृक्षतोड प्रचंड प्रमाणात झाली आहे. त्यासाठी “झाडे लावा झाडे जगवा”  ही मोहिम सुध्दा राबवण्यात यायला हवी ! झाडे म्हणजे राष्ट्रीय संपत्ती आहेत. त्यांची योग्य काळजी घेतली पाहिजे! ग्लोबल वाॅर्मिंग ही जागतिक समस्या होत आहे. त्यासाठी अधिकाधिक झाडे लावून त्यांचे संवर्धन करायला हवे !

वाहनांची संख्या खूप वाढली आहे, इंधनावर चालणाऱ्या वाहनांमुळे हवेतील प्रदुषण वाढते आहे,सायकल चा वापर करता येईल, विजेवर चालणाऱ्या उपकरणां ऐवजी सौरशक्तीवर चालणारी उपकरणे वापरावीत जेणेकरुन विजेची बचत होईल.

जमिनीची काळजी घेण्यासाठी शेतीत रासायनिक खतांचा वापर न करता सेंद्रिय खतांचा वापर केला पाहिजे.आपण आपल्या दैनंदिन जीवनात हवा ,पाणी, अन्न यांची शुद्धता जपली पाहिजे ! प्रत्येक गोष्टीची स्वच्छता आणि जपणूक महत्वाची आहे ! प्लास्टिक चा वापर टाकला पाहिजे .

निसर्गाने आपल्याला बहाल केलेल्या गोष्टी पुढच्या पिढ्यांसाठीही खूप महत्त्वपूर्ण आहेत याची जाणीव प्रत्येकाने ठेवली पाहिजे.
दिवसेंदिवस होणाऱ्या सर्वच प्रकारच्या प्रदुषणांमुळे पृथ्वीचा समतोल ढळायला लागला आहे ,  तो समतोल राखण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न केले पाहिजे.आपल्या संस्कृतीत झाडे,नद्या आणि सर्व चराचरातच ईश्वर आहे असं मानले आहे. म्हणजेच पर्यावरणाविषयी प्रेम हीच ईश्वरभक्ती मानली पाहिजे.

See also  पंडित दीनदयाळ उपाध्याय राष्ट्रीय कल्याण कार्यक्रमांतर्गत खेळाडूंना मिळणार आर्थिक साहाय्य