मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात वर्धापन दिन साजरा

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २४ व्या वर्धापन दिनी आज राष्ट्रवादी भवन, मुंबई येथे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांच्या हस्ते आणि विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ व खा. सुप्रिया सुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत झेंडा फडकावून राष्ट्रवादी काँग्रेस परिवारास वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी पक्षाचे नेते, पदाधिकारी, कार्यालयील कर्मचारी व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना पक्षाच्या २४ व्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करताना ते म्हणाले की, “राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा २५ वर्षांचा कालखंड हा छोटाही नाही आणि या देशात निरंकाळ असलेल्या पक्षांच्या तुलनेने मर्यादित कालखंड आहे.

महाराष्ट्रात अनेक क्रांतिकारक निर्णय हे शरद पवार साहेब मुख्यमंत्री असताना घेतले गेले. पक्षाच्या स्थापनेनंतर या पक्षाने देशात आणि राज्यात नेत्रदीपक कामगिरी बजावली. त्यानंतर महाराष्ट्राच्या सामाजिक व आर्थिक बदलांसाठी महत्त्वाचे निर्णय पक्षाच्या नेतृत्वाने त्या त्या वेळी घेतले. महाराष्ट्रातील प्रमुख पक्ष ज्यांच्यावर टीका केल्याशिवाय सत्तेत बसणाऱ्यांचा एकही दिवस जात नाही, एवढं महत्त्व महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेतृत्व नेस्तनाबूत कसे करायचे हा प्रयत्न अखंडितपणे गेले काही वर्षे सुरू आहे. गेल्या चार-आठ दिवसात विरोधकांनी किती खालची पातळी गाठली आहे हे आपण पाहत आहोत. पवार साहेबांबाबत बेताल वक्तव्ये केली जात आहेत. सत्तेत बसणाऱ्यांनी बाळगलेले जे लोक आहेत त्यांना दुसऱ्यांवर सोडायचे काम गेले काही वर्षे सुरू आहे. त्या माध्यमातून किती जहरी आणि खालच्या पातळीची टीका केली जाते हे सगळं आपण पाहिले आहे.

जेव्हा मला असे विचारले जाते की फक्त राष्ट्रवादीबाबतच का असे घडते तर याचे कारण म्हणजे भाजपाला महाराष्ट्रात केवळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच खंबीरपणे विरोध करत आहे. हा पक्षच छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार पुढील पिढीला देऊ शकतो. आपल्या पक्षाचे नेतृत्व हे देशातील सर्वात प्रगल्भ, सर्वात अनुभवी आणि भारताला योग्य दिशा देणारे नेतृत्व आहे. त्यामुळे आदरणीय पवार साहेबांवर हल्ला होणं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोणत्याही नेत्यावर हल्ला होणं या सर्व गोष्टी आज नित्याच्या व्हायला लागल्या आहेत. कारण आपल्या पक्षाशिवाय दुसरा कोणता पक्ष त्यांना महत्त्वाचा वाटतं नाही.

स्व. यशवंतराव चव्हाण यांचे विचार घेऊन आपला पक्ष कार्यरत आहे. छत्रपती शिवाजी महाराज, फुले, शाहू, आंबेडकर यांचा विचार बळकट करण्यासाठी पक्ष प्रयत्न करत आहेत. दुदैवाने आज महाराष्ट्रात जातीयवादी तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक केला जात आहे. जाणीवपूर्वक दोन धर्मात वाद कसा होईल, त्या ठिकाणी आपली राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न महाराष्ट्रातील ठराविक पक्ष करत आहेत. महाराष्ट्रात ज्या पद्धतीने गेल्या एक-दोन महिन्यात निरनिराळ्या भागात, शहरात जे वातावरण निर्माण करण्यात आले याचा अर्थ एकच आहे की यांना आता निवडणुका घ्यायच्या आहेत. निवडणुका जवळ आल्या आहेत म्हणून महाराष्ट्रामध्ये धार्मिक तणाव निर्माण करण्याचे पाप काही लोक करत आहेत. सत्तेत बसलेले लोक त्याकडे दुर्लक्ष करत आहेत. अशा लोकांना आळा घालण्याचे सामर्थ्य सत्ताधाऱ्यांमध्ये नाही किंवा ते बघत बसण्याची त्यांची इच्छा आहे. अशावेळी आपल्या सर्वांची जबाबदारी महत्त्वाची आहे. महाराष्ट्र दंगामुक्त व्हावा यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे. महाराष्ट्र दंगामुक्त करून कोणत्याही गावात, शहरात दंगे होणार नाहीत यासाठी राष्ट्रवादीचा प्रत्येक कार्यकर्ता पुढे राहील व महाराष्ट्रात शांतात निर्माण व्हावी यासाठी पुढाकार घेईल.

See also  बालेवाडीत बेकायदेशीरपणे गौण खनिज उत्खनन केल्याप्रकरणी नामांकित  बांधकाम व्यावसायिकास दंड करण्यास टाळाटाळ

विरोधी पक्षांतील नेत्यांवर, पदाधिकारी, कार्यकर्त्यांवर खोटे आरोप करून त्यांच्यावर कारवाई करण्याचे काम आज राज्यात होताना दिसते. अशा प्रकारचे कधीच काम गृहखात्याने केलेले नाही. या उलट सत्तेत असणाऱ्या पक्षाने असे काम केले तर त्याकडे कित्येक दिवस दुर्लक्ष केले जाते. कशाही प्रकारे ट्विट केले, संदेश लिहिला तर त्याकडे दुर्लक्ष करणे व तो जास्तीत जास्त प्रसारित होईपर्यंत गप्प बसणे असा वेगळ्या प्रकारचा पायंडा आज राज्यात गृहखात्याच्या माध्यमातून पडत आहे.

त्यामुळे आपली लढाई मोठी आहे. आपल्याला एकसंधपणे सगळ्या गोष्टींचा सामाना करावा लागणार आहे. त्यासाठी तुम्हा सर्वांचे बळ २४ व्या वर्धापन दिनी आदरणीय पवार साहेबांच्या, पक्षाच्या मागे अधिक खंबीरपणे उभे करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांवर आहे. त्यासाठी डोळस राहण्याची गरज आहे. आजच्या वर्धापन दिनाच्या शुभ मुहूर्तावर विधानसभेच्या व लोकसभेच्यानिमित्ताने मोठ्या प्रमाणात लाडू वाटण्याची संधी आपल्याला मिळेल असा विश्वास व्यक्त करुया. आपण सर्व एकसंध व एकत्रित राहिलो तर पवार साहेबांचे नेतृत्व एवढे मोठे आणि प्रगल्भ आहे की कोणत्याही वादळात नौका पुढे घेऊन जाण्यात ते यशस्वी ठरलेले आहेत.”

खासदार सुप्रियाताई यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना संबोधित करताना सांगितले की, “आपला पक्ष २५ व्या वर्षात पदार्पण करत आहे. २४ वर्षांचा प्रवास बघताना आपण १९ वर्षे सत्तेत राहिलो तर ६ वर्षे विरोधक म्हणून काम केले. स्थापनेनंतर इतकी वर्षे सत्तेमध्ये राहून आपल्या पक्षाला जनतेची सेवा करण्याची संधी मिळाली. आता विरोधातही देशाची सेवा करण्यासाठी संविधानाच्या चौकटीत राहून नेतृत्व करण्याची ताकद जर कुठल्या पक्षात असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे मोठ्या अपेक्षेने पाहिले जाते. ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट आहे.

या पक्षाच्या प्रवासाकडे जेव्हा मी बघते तेव्हा पक्षाच्या जडणघडणीत उभारणीत असंख्य असे लोक होते ज्यांच्यामुळे हा पक्ष उभा राहिला. त्या सर्व दिवंगत सहकाऱ्यांचे कृतज्ञपूर्वक स्मरण करून त्यांना आदरांजली अर्पण करते. या ठिकाणी विशेषतः गुरुनाथ कुलकर्णी व स्व. आर. आर. आबा यांची आठवण आवर्जून येते. अशा असंख्य लोकांनी पक्षासाठी दिलेले योगदान आपल्याला कधीच विसरता येणार नाही. आज आपल्यासोबत नवाबभाई नाहीत. मला विश्वास आहे की पुढच्या वर्षी ते या कार्यक्रमाला नक्की उपस्थित असतील. सत्य परेशान हो सकता है लेकीन पराजित नही हो सकता।

See also  पाषाण बाणेर बालेवाडी परिसरात आयटीचे जाळे पसरले त्या प्रमाणात सुविधा निर्माण करण्यात अपयश आले आहे - तानाजी निम्हण

आपण खूप संघर्ष केला. सुरुवातीला आपल्याला राज्यात सत्ता मिळाली. नंतर केंद्रात प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळाली. देशातील अन्नधान्याचा प्रश्न सोडवण्यासाठी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने आदरणीर पवार साहेबांना खंबीर पाठिंबा मिळत एक महत्त्वाचे पद केंद्रात मिळाले. केंद्रीय कृषी मंत्री म्हणून १० वर्षात या देशाचा अन्नधान्याचा व दूधाचा प्रश्न सोडवण्यात आदरणीय पवार साहेबांना यश मिळाले. खूप मोठी हरितक्रांती युपीए सरकारच्या काळात झाली. प्रफुल्लभाई पटेल यांच्यावर केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री म्हणून जबाबदारी होती. देशातील शेवटचा माणूस आज ताठ मानेने विमानाने प्रवास करतो. एक वेळ वंदे भारत त्याला परवड नाही. पण सुरक्षितपणे विमानाने प्रवास करतो. याचे कारण युपीए सरकारच्या काळात देशातील विमानतळांचा झालेला विकास आहे.

काँग्रेससोबत आपण १५ वर्षे सत्तेत होतो. भुजबळ साहेब, अजितदादा, जयंतराव पाटील यांच्या सारख्या नेतृत्वाने राज्याला दिशा देण्याचे काम केले. अर्थमंत्री असताना जयंतरावांनी अर्थसंकल्पांची उत्तम मांडणी केली तर अजितदादांनी उपमुख्यमंत्री म्हणून जबाबदारी उत्तमरीत्या सांभाळली. महाविकास आघाडी सरकार असताना कोरोना काळात राजेश भैय्या टोपे यांनी आरोग्यमंत्री म्हणून केलेले कार्य कोणीच विसरू शकत नाही. जेव्हा जेव्हा या देशात कोरोना बद्दल लिहिले जाईल तेव्हा राजेश टोपे यांचे नावं सुवर्णअक्षरात लिहिले जाईल.

२४ वर्षांचा हा आपला प्रवास समाधानाचा व संघर्षाचाही आहे. काही लोक पक्ष सोडून गेले पण कार्यकर्ता जागेवर राहिला. या पक्षाची ताकद नेते आहेत त्याचबरोबर तुमच्यासारखे असंख्य कार्यकर्ते आहेत जे पक्षासोबत राहिले. हीच या पक्षाची ओळख आहे. साहेबांनी लोक माझे सांगाती हे पुस्तक लिहिले आहे. लोकच या पक्षाचे सांगाती आहेत. पुढील २५ वर्षे हा पक्ष ताकदीने उभा राहील. सत्ता येते आणि जाते. आज जे सत्तेत आहे त्यांना अस्वस्थता वाटत असावी. मला नक्कीच अस्वस्थता वाटली असती कारण राज्यात आज असुरक्षित वातावरण आहे. कोल्हापूर, सोलापूर, अमरावतीला झालेली घटना असेल ही काय पुरोगामी विचारांच्या महाराष्ट्राला, छत्रपती शिवाजी महाराज, फुले, शाहू, आंबेडकर यांच्या महाराष्ट्राला शोभणारी नाही. महागाई, बेरोजगारी व जातीय तेढ असेल यातून देशाची व राज्याची प्रगती होत नसते. हे केंद्र व राज्य सरकारचे अपयश आहे. त्यामुळे आज विरोधी पक्ष म्हणून आपल्यावर जबाबदारी जास्त आहे. जेव्हा जेव्हा सरकार चुकते तेव्हा कणखर विरोधी पक्षाने आमची बाजू मांडावी ही अपेक्षा लोकांची असते. त्यामुळे महत्त्वाच्या जागेवर आपण उभे आहोत. पक्ष आहे म्हणून आपण सर्व आहोत. पक्ष हा आईच्या जागेवर असतो. बाकीची नाती ही वेगळ्या जागेवर असताता. गेल्या २४ वर्षात ज्या पदाधिकाऱ्यांनी, सहकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी या पक्षाला वेळ दिला त्यांचे मनपूर्वक आभार मानते. महाराष्ट्र आणि देशाच्या प्रगतीसाठी आपण लढत राहू.”

See also  लोणावळा शहरातील विविध नागरी समस्यांचाउपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून आढावा

विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ म्हणाले की, आपण सगळे योद्धे आहोत आणि जेव्हा योद्धा शरण जात नाही तेव्हा बदनाम केला जातो आणि तोच प्रकार आज आपल्या पक्षासोबत केला जातोय. परंतु आपण शरण जात नाही, जाणार नाही आणि जायचं नाही. धैर्याने लढायचं, असं आवाहन त्यांनी केले व सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी आ. संजय बनसोडे, कोषाध्यक्ष हेमंत टकले, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, प्रदेश सरचिटणीस अदिती नलावडे, सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष डॉ. जानबा म्हस्के, महिला प्रदेशाध्यक्ष विद्याताई चव्हाण, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख, मुंबई विभागीय कार्याध्यक्ष राखी जाधव, मुंबई विभागीय कार्याध्यक्ष नरेंद्र राणे, अल्पसंख्याक प्रदेशाध्यक्ष मोहम्मद खान पठाण, ओबीसी सेल कार्याध्यक्ष राज राजापूरकर आदींसह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.