पत्ता कट होण्याची भीती? कि सत्तेत जाण्याची घाई? पिंपरी, राष्ट्रवादीच्या आमदाराची शिंदेंशी जवळीक

पुणे :  २०१४ पर्यंत पिंपरी चिंचवड हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचा बालेकिल्ला मनाले जात. मात्र भाजपने तत्कालीन कारभारी अजित पवार यांना जोरदार धक्का देत भाजपने दोन आमदार तसेच महापालिकेवर सत्ता आणली. २०१९ नंतर राज्यात आलेल्या महाविकास आघाडी सरकारमध्ये उपमुख्यमंत्री झाल्यानंतर अजित पवार यांनी शहरावर पकड मजबूत करण्यासाठी प्रयत्न केला. मात्र वर्षभरापूर्वी झालेल्या सत्तानाट्यानंतर पुन्हा एकदा राष्ट्रवादीला गळती लागताना दिसत आहे. भाजपनंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदें हे राष्ट्रवादीचे टेन्शन वाढवत आहेत.

आमदार बनसोडेंची मुख्यमंत्र्यांशी जवळीक

राष्ट्रवादी कॉंग्रेसची डोकेदुखी ठरतेय ते पिंपरीचे आमदार आण्णा बनसोडे आणि मुख्यमंत्री शिंदेंची वाढती जवळीक. काही दिवसांपूर्वीच शिंदे आणि बनसोडे यांनी एकत्र गाडीतून प्रवास केला. तर काल एकनाथ शिंदे यांनी थेट बनसोडे यांचे कार्यालय गाठले. एका बाजूला आमदार बनसोडे हे राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये नाराज असल्याची चर्चा असतानाच मुख्यमंत्र्यांशी वाढलेल्या जवळकीने राजकीय चर्चेला उधाण आलं आहे. बनसोडे हे शिवसेनेत प्रवेश करण्याची चर्चा सुरु झालीय.

आण्णा बनसोडेंची नाराजी का?

बनसोडे यांची राष्ट्रवादीतील नाराजी लपून राहिलेली नाही. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत जवळपास त्यांचा पत्ता कट झाल्याची चर्चा होती. मात्र पक्षाविरोधात बंड करत दंड थोपटण्याचे संकेत दिल्याने उमेदवारी पदरात पडून घेतली. मात्र गेल्या तीन वर्षात पक्षातील स्थानिक नेते आणि आमदार बनसोडे यांच्यामध्ये सर्वकाही आलबेल असल्याच दिसून आलं. बनसोडे हे विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे कट्टर समर्थक मानले जातात. परंतु गेल्या काही काळापासून पक्षात डावलेले जात असल्याची लेखी तक्रार त्यांच्या समर्थकांनी थेट अजित पवार यांच्याकडे केल्याचेही सांगितले जाते. दुसरीकडे चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना समर्थन देण्याची उघड भूमिका त्यांनी घेतली. त्यालाही स्थानिक नेत्यांनी कडाडून विरोध केला होता.

मध्यंतरी अजित पवार हे भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चांनी महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली होती. यावेळी बनसोडे यांनी अजितदादांची भेट घेत आपण ते घेतली त्या भूमिकेसोबत राहणार असल्याचं स्पष्ट केलं. त्यामुळे कदाचित अजित पवार भाजपसोबत गेलेच तर आपणही जाऊ, असे संकेतच त्यांनी दिल्याचे बोललं गेलं.

See also  अजित पवारांना बालेकिल्ल्यातचं मोठा धक्का बसणार?.. पिंपरी चिंचवड मधील शहराध्यक्षांसह अनेक नगरसेवकांनी घेतली शरद पवारांची भेट

मुख्यमंत्र्यांशी सुत जुळवण्याचे कारण काय?

आमदार बनसोडे यांची राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये घुसमट सुरु असतानाच, आगामी निवडणुकीत पक्षाचा उमेदवार बदलण्यासाठी एक गट प्रयत्नशील असल्याची चर्चा आहे. पक्षाने उमेदवारी नाकारण्याची शक्यता वाढल्याने बनसोडे यांच्याकडून राजकीय मशागत केली जात असून मुख्यमंत्री शिंदेंची वाढलेली जवळीक त्याचेच संकेत देत आहे. युतीच्या जागावाटपात पिंपरी मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला राहिलेला आहे. त्यामुळे आगामी काळात चिंचवड आणि भोसरीत भाजपचे आमदार असल्याने पिंपरीची जागा शिंदेंच्या वाट्याला येऊ शकते. त्यामुळे शिवसेनेची उमेदवारी आणि भाजपच्या पाठींब्यावर पुन्हा एकदा विधानसभेत जाण्याची साखरपेरणी आमदार बनसोडे करत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.