पंढरपूर आषाढी वारीमध्ये वारकरी भाविकांना आवश्यक सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात – विधान परिषद उपसभापती नीलम गोऱ्हे

सोलापूर : पंढरपूर आषाढी वारीमध्ये वारकरी भाविकांना आवश्यक सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. वारकरी भाविकांची गैरसोय होणार नाही, यासाठी जिल्हा प्रशासनाने विशेष दक्षता घ्यावी, अशा सूचना विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज येथे दिल्या.

पंढरपूर आषाढी वारी 2023 प्रशासकीय नियोजनाचा आढावा बैठकीच्या अध्यक्ष स्थानावरून त्या बोलत होत्या. नवीन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बैठक कक्षात झालेल्या या बैठकीस प्रभारी जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संजय माळी पंढरपूरचे उपविभागीय अधिकारी गजानन गुरव, जिल्हा प्रशासन अधिकारी आशिष लोकरे, जिल्हा नियोजन अधिकारी पुंडलिक गोडसे, पंढरपूरचे मुख्याधिकारी अरविंद माळी, देवस्थान समितीचे अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औंसेकर, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, सुनील उंबरे, आदि उपस्थित होते.

यावेळी प्रभारी जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांनी जिल्हा प्रशासनाच्या वतीने केलेल्या नियोजनाचे सादरीकरण केले.  जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी आषाढी वारी नियोजनाची माहिती दिली. त्यावर उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी समाधान व्यक्त केले.

रस्त्याची कामे सुरू असल्याने पर्यायी मार्गाचे तसेच, भाविकांना देण्यात येणाऱ्या सोयी सुविधांचे फलक दर्शनी भागात लावावेत. कामांच्या ठिकाणच्या राडारोड्याचे स्थलांतरण करावे, अशा सूचना डॉ. नीलम गोऱ्हे यांनी यावेळी केल्या.

दि. 28 जून रोजी पालखी आगमन होणार असून, दि. 29 जून रोजी आषाढी एकादशी आहे. दि. 4 जुलै रोजी महाद्वार काला होऊन आषाढी वारीची सांगता होणार आहे. मानाच्या 10 पालख्या, त्यांच्या मुक्कामाची व रिंगणाची ठिकाणे, घटना प्रतिसाद प्रणाली, जिल्ह्यामध्ये उभारण्यात आलेली 21 आपत्ती व्यवस्थापन केंद्रे, नेमणूक केलेले अधिकारी, कर्मचारी, नोडल अधिकारी, स्वयंसेवी संस्था, यशदा, पुणे मार्फत घेण्यात आलेले प्रशिक्षण यांची माहिती श्री. ठोंबरे यांनी यावेळी दिली.

वारकरी भाविकांना देण्यात येणाऱ्या सोयी सुविधाबाबत श्री. ठोंबरे म्हणाले, जिल्हा परिषदेमार्फत पाणी पुरवठ्यासाठी 49 टँकर्स व त्यामध्ये पाणी भरण्याची सुविधा करण्यात आली आहे. तसेच औषधोपचार केंद्रे, गॅस वितरण व्यवस्था, शौचालय व्यवस्था, महिलांची वैयक्तिक स्वच्छता व सुरक्षितेबाबत नियोजन करण्यात आल्याचे सांगितले.

See also  मराठी भाषा संवर्धनासाठी प्रत्येकाने पुढाकार घ्यावा - शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री ना. दीपक केसरकर

यंदा पहिल्यांदाच आषाढी वारीमध्ये महिला वारकऱ्यांसाठी स्वतंत्र सोयी सुविधा देण्यात येणार असून, जवळपास 3 हजार 200 ठिकाणी महिला वारकरी स्नान गृहे उभारण्यात आली आहेत, असे सांगून मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी ग्रामपंचायतीमीर्फत पालखी मार्गांवरील 72 गावात पुरविण्यात येणाऱ्या सुविधांची माहिती दिली. ते म्हणाले, 376 ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सुविधा, 98 ठिकाणी आरोग्य सुविधा, 95 ठिकाणी टँकर भरणा केंद्र, जवळपास साडे आठ हजार शौचालये, 177 ठिकाणी विसावा मंडप, 82 हिरकणी कक्ष, 352 प्लास्टिक संकलन केंद्र, 69 वारकरी मदत केंद्र, हरित वारी, निर्मल वारी अंतर्गत पालखी मार्गांवर 12 हजार वृक्ष लागवड करण्यात येत आहे.

यावेळी आरोग्य विभाग, परिवहन विभाग, 65 एकर परिसरातील नियोजन, पालखी मार्गांवर भाविकांना दिल्या जाणाऱ्या सुविधांचा आढावा डॉ. नीलम गोऱ्हे यांनी यावेळी घेतला.

तसेच नावीन्यपूर्ण उपक्रमाअंतर्गत पंढरीची वारी मोबाईल अँप, हरित वारी, निर्मल वारी यांची माहिती यावेळी देण्यात आली.