पुणे : महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या(एमसीए) वतीने आयोजित श्रीराम कॅपिटल महाराष्ट्र प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत नवव्या दिवशी ऋषभ राठोड(५५धावा), अथर्व काळे(२३धावा), यांनी केलेल्या फलंदाजीच्या जोरावर सोलापूर रॉयल्स संघाने छत्रपती संभाजी किंग्ज संघापुढे १४१ धावांचे आव्हान उभे केले.
महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या गहूंजे येथील स्टेडियमवर सुरूअसलेल्या या स्पर्धेत छत्रपती संभाजी किंग्ज संघाने नाणेफेक जिंकून सोलापूर रॉयल्स संघाला प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दोन्ही तळातील संघांमध्ये हि लढत होत असून काल सोलापूर रॉयल्स संघाने पुणेरी बाप्पा संघाविरुद्ध पहिल्या विजयाची नोंद केली होती.
पॉवरप्ले मध्ये संभाजी किंग्जच्या आनंद ठेंगे, रामेश्वर दौड, राजवर्धन हंगर्गेकर या गोलंदाजांनी प्रभावी गोलंदाजी केली. पॉवर प्ले संपेपर्यंत सोलापूर संघाने आपले तीनही फलदांज अवघ्या १५ धावात गमावले. यात यश नाहर(४धावा), अवधूत दांडेकर(५धावा) आणि स्वप्निल फुलपगार(३धावा) हे पाठोपाठ झटपट बाद झाले. त्यामुळे सोलापूरची ४.१ षटकात ३बाद १५ अशी बिकट स्थिती झाली. त्यानंतर कर्णधार विशांत मोरेने १५ चेंडूत २चौकार व १ षटकारासह २१ धावांची खेळी करून संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. त्याला ऋषभ राठोडने चौफेर व संयमी फटकेबाजी करत ४४ चेंडूत २ चौकार व २ षटकारासह ५५ धावा काढून साथ दिली. या जोडीने चौथ्या गड्यासाठी ३१ चेंडूत ४६ धावांची भागीदारी केली. विशांत मोरे २१ धावांवर खेळत असताना ऋषभ राठोड यांच्यातील समन्वयाच्या अभावामुळे चोरटी धाव घेत असताना हितेश वाळुंजने विशांतला धावबाद केले व सोलापूर संघाला चौथा झटका दिला.
सहाव्या क्रमांकावर फलंदाजीस अथर्व काळेने २६ चेंडूत २चौकारासह २३ धावांची खेळी केली. अथर्व व ऋषभ या जोडीने फटकेबाजी करत ४४ चेंडूत ४४ धावा काढून संघाला ५बाद १०५ धावांपर्यंत मजल मारून दिली. अथर्व काळे २३ धावांवर असताना एक उत्तुंग फटका मारण्याच्या प्रयत्नात शमसुजमा काझीच्या गोलंदाजीवर झेल बाद झाला. त्यानंतर मेहुल पटेलने ११ चेंडूत नाबाद २१धावा केल्या. त्यात २चौकार व १ षटकाराचा समावेश होता. सोलापूर रॉयल्स संघाने निर्धारित षटकात ६ बाद १४० धावा केल्या.
स्पर्धेचा सविस्तर निकाल:
सोलापूर रॉयल्स: २० षटकात ६बाद १४०धावा (ऋषभ राठोड ५५(४४,२x४,२x६), अथर्व काळे २३(२६), विशांत मोरे २१, राजवर्धन हंगर्गेकर १-२३, रामेश्वर दौड १-२६, शमसुजमा काझी १-२३, आनंद ठेंगे १-३५)वि. छत्रपती संभाजी किंग्ज:.