कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरमैय्याजी यांच्या उपस्थितीत बारामतीत राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती सोहळा संपन्न

बारामती : बारामती येथे राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खा. शरद पवार प्रमुख पाहुणे म्हणून कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरमैय्याजी उपस्थित होते.

या कार्यक्रमाला राज्याचे विरोधी पक्षनेते अजितदादा पवार, कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, आमदार दत्तात्रय भरणे, आमदार रवींद्र धंगेकर हे देखील उपस्थित होते.

यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना खासदार सुप्रिया सुळे व राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी बारामती लोकसभा मतदारसंघात सिद्धरमैय्याजी यांचे स्वागत केले. तसेच महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्या ऋणानुबंधाचा उल्लेख करताना कर्नाटकमध्ये मिळवलेल्या ऐतिहासिक विजयाबद्दल सिद्धरमैय्याजी यांचे अभिनंदन केले.

यावेळी बोलताना धनगर समाजासोबतच मराठा, लिंगायत आणि मुस्लिम आरक्षणासाठी संसदेत पाठपुरावा करत असल्याचे नमूद केले. धनगड आणि धनगर एकच आहेत. पण केंद्र सरकार हे मान्य करत नाही ही मोठी आश्चर्याची बाब आहे. धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत राज्यातील भाजप आणि केंद्रातील भाजपा यांची परस्परविरोधी भूमिका आहे. भाजप धनगर समाजाची दिशाभूल करत असल्याचे वेळोवेळी स्पष्ट झाले आहे. पण आरक्षणासाठी आमचे प्रयत्न सुरु असून यात यश येईल असे नमूद केले. यावेळी पळशीमधील धनगर समाजातील पहिल्याच प्रयत्नात सीए झालेल्या लाला धायगुडे यांचे अभिनंदन करुन काैतुक केले. ते आपल्या बारामती लोकसभा मतदारसंघातील आहेत ही अभिमानाची बाब असल्याचे सांगितले. त्याचबरोबर धनगर समाजातील तरुण यश संपादन करत आहेत ही मोठी समाधानाची बाब असल्याचे स्पष्ट केले. धनगर समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाही हा संकल्प व्यक्त केला. भाजपाच्या भुलथापांना आता कोणीही भुलणार नाही असा विश्वास व्यक्त केला. कर्नाटक सरकारने धनगर समाजाला आरक्षण मिळण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन यावेळी केले. या कार्यक्रमाला विरोधी पक्षनेते अजित पवार, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, आमदार संजय जगताप, दत्तात्रय भरणे, रवींद्र धंगेकर, ए.व्ही देशपांडे, यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते आदी उपस्थित होते.

See also  निवडणूक आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी तात्काळ सुरू करा-जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे