“मत देण्याआधी मत मांडूया” उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
बाणेर–बालेवाडी– पाषाण– सुस–महाळुंगे परिसरात नागरिक जाहिरनाम्याचे प्रकाशन

बाणेर : पुणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बाणेर, बालेवाडी, पाषाण, सुस आणि महाळुंगे परिसरात प्रभाग ९ साठी नागरिक जाहिरनाम्याचे प्रकाशन बालेवाडी येथील कॉमन मॅन स्टॅच्यू परिसरात करण्यात आले.

या कार्यक्रमाला खऱ्या अर्थाने लोकांचा, लोकांसाठी आणि लोकांनी घडवलेला असा उपक्रम म्हणून मोठा प्रतिसाद लाभला. हा जाहिरनामा “मत देण्याआधी मत मांडूया” या मोहिमेअंतर्गत बाणेर–बालेवाडी नागरिक मंच (BBNM) आणि बाणेर–बालेवाडी पाषाण रेसिडेंट्स असोसिएशन (BBPRA) यांच्या नेतृत्वाखाली तयार करण्यात आला आहे.

या उपक्रमांतर्गत स्वयंसेवकांनी प्रत्यक्ष परिसरात जाऊन नागरिकांशी संवाद साधला. गुगल फॉर्म, स्थानिक गट चर्चा आणि थेट भेटींच्या माध्यमातून ६,४०० हून अधिक नागरिकांनी आपली मते नोंदवली. हा आकडा केवळ संख्यात्मक नसून, वाढती नागरी जाणीव, काळजी आणि सहभाग दर्शवणारा आहे.

“खूप प्रश्न असले तरी लोकांना बोलण्यासाठी योग्य व्यासपीठ मिळत नव्हते. आता नागरिक स्वतः त्यांच्या शहराबद्दल बोलत आहेत,” असे आयोजकांनी नमूद केले.

या जाहिरनाम्यात वाहतूक कोंडी, खराब रस्ते, वारंवार होणारी खोदकामे, पाणीपुरवठ्याच्या समस्या, ड्रेनेज व सांडपाणी व्यवस्थापन, झाडतोड, वाढते प्रदूषण, फुटपाथचा अभाव आणि प्रशासनाशी संवादाचा तुटवडा अशा नागरिकांच्या दैनंदिन अडचणी स्पष्टपणे मांडण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर स्वच्छ व विश्वासार्ह पायाभूत सुविधा, पारदर्शक प्रशासन, हरित क्षेत्रांचे संरक्षण, सार्वजनिक उद्यानांचा विकास, सुरक्षित रस्ते आणि लोकप्रतिनिधींशी नियमित संवाद या अपेक्षाही ठळकपणे मांडल्या आहेत.

हा जाहिरनामा कोणावर टीका करण्यासाठी नसून, प्रशासनाला दिशा दाखवणारा आणि लोकप्रतिनिधींना जबाबदारीची जाणीव करून देणारा दस्तऐवज असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले. मतदानापूर्वी नागरिकांचा आवाज संघटित करून लोकशाही अधिक सशक्त करण्याचा हा प्रयत्न असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

See also  मराठा क्रांती मोर्चा पुणे शहराच्या वतीने हुतात्मा बाबू गेनू चौक येथे लाक्षणिक उपोषण तर औंध बाणेर बालेवाडी पाषाण परिसरात बंद