महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष रोहित पवार ह्यांनी बीसीसीआय सचिव जय शहा यांचे मानले आभार
पुणे : तब्बल २७ वर्षांनंतर पुण्यात आयसीसी पुरुष विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेचे सामने होणार आहेत. या वर्षी होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेतील तीन सामन्यांचे यजमानपद महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या (एमसीए) गहुंजे येथील आंतरराष्ट्रीय स्टेडियमला मिळाले आहेत. ह्यात मुख्य आकर्षण भारतीय क्रिकेट संघाचा १९ ऑक्टोबरचा बांगलादेश विरुद्धचा सामना हे असेल.
यापूर्वी १९९६ च्या विश्वचषक स्पर्धेत २९ फेब्रुवारी रोजी वेस्ट इंडिज वि. केनिया हा सामना पुण्यातील नेहरु स्टेडियमवर खेळला गेला होता. केनियाने या सामन्यात त्यांचा १६६ धावत खुर्दा उडून देखील वेस्ट इंडिजचा ७३ धावांनी पराभव करून सनसनाटी निकाल नोंदवला होता.
महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष रोहित पवार यांनी या निर्णयाचे स्वागत केले असून, सध्या सुरु असलेल्या महाराष्ट्र प्रिमियर लीगच्या अंतिम सामन्यानंतर महाराष्ट्र क्रिकेट संघटना विश्वचषकाच्या तयारीला सुरवात करेल. महाराष्ट्र प्रिमियर लीगचा अखेरचा सामना २९ जूनला होणार आहे.
भारत विरुद्ध बांगलादेश ह्या सामन्याखेरीज अफगाणिस्तान वि क्वालिफायर २, न्यूझीलँड वि दक्षिण आफ्रिका, इंग्लंड वि क्वालिफायर १
आणि ऑस्ट्रेलिया वि बांगलादेश हे इतर चार सामने होतील.
“विश्वचषक स्पर्धेचे २७ वर्षांनी पुण्यात आयोजन होणार आहे. भारतीय संघाचे सामने आयोजित करणे ही कायमच आनंदाची बाब असते आणि विश्वचषकासारख्या मोठ्या स्पर्धेतील सामन्यांचे आयोजन करणे ही तेवढीच आनंददायी आणि आव्हानात्मक गोष्ट आहे. ही संधी आम्हाला मिळाली हा आम्ही आमचा सन्मान मानतो,” महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष रोहित पवार यांनी सांगितले.
“महाराष्ट्र क्रिकेट संघटनेला आणि पर्यायाने पुण्याला विश्वचषक आयोजनाची संधी दिल्याबद्दल आम्ही बीसीसीआयचे व जय शहा, मा. सचिव, बीसीसीआय यांचे विशेष आभार मानतो. अन्य राज्य संघटना देखील या सामन्यांच्या आयोजनासाठी कसोशीने प्रयत्न करत होत्या. परंतु, बीसीसीआयने महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या आयोजन क्षमतेवर विश्वास दाखवला याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो,” असे रोहित पवार म्हणाले.
पवार यांनी बीसीसीआय अध्यक्ष रॉजर बिन्नी, खजिनदार आशिष शेलार, उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांचे देखील आभार मानले. त्याचबरोबर रोहित पवार यांनी आयसीसी व बीसीसीआयचे माजी अध्यक्ष शरद पवार यांचेही विशेष आभार मानले. “मा. पवार साहेबांनी कायमच महाराष्ट्र क्रिकेटच्या बाबतीत दूरदृष्टी दाखवली आहे. त्यांनी विश्वचषकाचे सामने पुण्यात व्हावे ह्यासाठी आमची बाजू बीसीसीआय समोर मांडली तसेच आमची शिफारस देखील केली. त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे,” असे रोहित पवार म्हणाले.
रोहित पवार यांनी या वेळी वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारतीय कसोटी व एकदिवसीय संघात निवड झालेल्या ऋतुराज गायकवाडचेही अभिनंदन केले. ऋतुराज गुणी फलंदाज आहे. विंडीज दौऱ्यात तो यशस्वी होईल आणि विश्वचषक संघातही दिसेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. २०१९च्या विश्वचषक स्पर्धेत आपला केदार जाधव सहभागी होता. यंदा घरच्या मैदानावर होणाऱ्या ह्या स्पर्धेत देखील आपले अनेक खेळाडू दिसतील अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
एमसीए अध्यक्षांनी ह्यावेळी एमपीएलच्या आयोजनासाठी परवानगी दिल्याबद्दल बीसीसीआय व सचिव जय शहा यांचे विशेष आभार मानले. “अतिशय कमी वेळात ही स्पर्धा आयोजित करण्यासाठी आम्हाला बीसीसीआयने परवानगी तर दिलीच, त्याशिवाय यशस्वी आयोजनासाठी मौल्यवान मार्गदर्शनही केले,” असे ते म्हणाले.
पुण्यातील वर्ल्ड कपचे सामने
ऑक्टो. १९: भारत वि. बांगलादेश
ऑक्टोबर ३०: अफगाणिस्तान वि क्वालिफायर २
नोव्हेंबर १: न्यूझीलँड वि दक्षिण आफ्रिका
नोव्हेंबर ८: इंग्लंड वि क्वालिफायर १
नोव्हेंबर १२: ऑस्ट्रेलिया वि बांगलादेश.
सर्व सामने दु. २ वाजता सुरू होतील. मात्र ऑस्ट्रेलिया वि बांगलादेश सामना सकाळी १०.३० ला सुरू होईल.