‘बजाज पुणे ग्रँड टूर- २०२६’चा यशस्वी समारोप

पुणे : ‘बजाज पुणे ग्रँड टूर- २०२६’ या आंतरराष्ट्रीय स्तरावरील सायकल स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाने पुण्याचे नाव जगात पोहोचले. प्रशासनाने गेले सहा महिने या स्पर्धेसाठी खूप मेहनत व तयारी केली, अशा शब्दात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी स्पर्धेच्या समारोपप्रसंगी प्रशासनाचे कौतुक केले.

‘बजाज पुणे ग्रँड टूर- २०२६’ च्या अंतिम टप्प्यासह स्पर्धेच्या यशस्वी समारोप आज बालगंधर्व रंगमंदीर समोर झाला. त्यानंतर झालेल्या पारितोषिक वितरण समारंभाला केंद्रीय युवक कार्य व क्रीडा राज्यमंत्री श्रीमती रक्षा खडसे, खासदार मेधा कुलकर्णी, युनियन सायकलिस्ट इंटरनॅशनलच्या (युसीआय) महासंचालक अमीना लानाया, युसीआयचे उपाध्याक्ष व आशियाई सायकलिंग महासंघाचे (एसीसी) अध्यक्ष दातो अमरजीत सिंग गिल, सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे (सीएफआय) महासचिव मनिंदर पाल सिंग, अभिनेता अमीर खान, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, पुणे मनपा आयुक्त नवल किशोर राम, पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर, बजाज ऑटोचे व्यवस्थापकीय संचालक राजीव बजाज, पंचशील रियाल्टीचे चेअरमन अतुल चोरडिया, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडून जिल्हाधिकाऱ्यांचे विशेष कौतुक जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांच्या नेतृत्त्वाखाली स्पर्धेचे चांगले नियोजन झाले. या स्पर्धेच्या यशाचे श्रेय कुणाला जात असेल तर ते श्री. डूडी यांना जाते अशा शब्दात त्यांनी विशेष कौतुक केले. पुणेकरांनी इतका मोठा खेळ उपक्रम यशस्वी होण्यासाठी योगदान दिले. पुढील वर्षीही खूप मोठा इव्हेंट आयोजित केला जाईल, असेही ते म्हणाले.

राज्यमंत्री श्रीमती खडसे सर्व स्पर्धकांना शुभेच्छा देऊन म्हणाल्या, भारत हे आता खेळांसाठी एक चांगले ठिकाण झाले आहे. आपले राष्ट्र खेळसंस्कृतीकडे वाटचाल करत आहे याचा जास्त आनंद आहे.

यावेळी युसीआयच्या महासंचालक श्रीमती लानाया यांनी स्पर्धेचे अत्यंत यशस्वी आयोजन झाल्याचे सांगून स्पर्धेला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला असे सांगितले. येथे सायकलिंगला चालना मिळेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. यावेळी श्री. गिल तसेच अभिनेता अमीर खान यांनीही स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाबद्दल आयोजकांचे अभिनंदन केले. श्री. बजाज, श्री. चोरडिया यांनीही मनोगत व्यक्त केले.

See also  वंचित बहुजन आघाडी च्या वतीने बाणेर येथील सतीश रणवरे यांची पक्षाकडे उमेदवारीची मागणी