मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ‘पर्यावरणाची वारी पंढरीच्या दारी’ उपक्रमाचा समारोप
पंढरपूर : भावी पिढीच्या उज्ज्वल भविष्यासाठी पर्यावरण जतन व संवर्धन गरजेचे असून, ‘पर्यावरणाची वारी, पंढरीच्या दारी’ या उपक्रमातून याबाबत जनजागृती होत आहे. अशा उपक्रमाच्या माध्यमातून पर्यावरण रक्षणाची लोकचळवळ झाली व्हावी, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्यावतीने आयोजित ‘पर्यावरणाची वारी पंढरीच्या दारी’ या उपक्रमाच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. पंढरपूर शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या या कार्यक्रमास महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रा, डॉ. तानाजी सावंत, बंदरे व खनिकर्म मंत्री दादाजी भुसे, माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे, खासदार जयसिद्धेश्वर महास्वामी, आमदार सर्वश्री बबनराव पाचपुते, भरत गोगावले, समाधान आवताडे, शहाजीबापू पाटील आणि बालाजी कल्याणकर, पर्यावरण विभागाचे सचिव प्रविण दराडे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर आदि उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, ‘पर्यावरणाची वारी-पंढरीच्या दारी’ या उपक्रमाचे अखंडितपणे गेल्या तेरा वर्षापासून आयोजन करण्यात येत असून ही पर्यावरण आणि आरोग्याची वारी आहे. वारीमध्ये पोवाडा, भारुड, कीर्तन, गोंधळ अशा पारंपरिक लोककलेच्या माध्यमातून नागरिकांचे प्रबोधन करण्यात आले आहे. पर्यावरण वारीच्या माध्यमातून एक प्रकारची लोकचळवळ उभी करीत आहे.
आज वातावरणीय बदलामुळे अवेळी पाऊस, गारपीट, बर्फ वितळणे, समुद्राच्या पाण्याची पातळीमध्ये वाढ अशी पर्यावरणाचा समतोल बिघडण्याची चिन्हे दिसत असून अनेक दुष्परिणामांना सामोरे जावे लागत आहे. हे टाळण्यासाठी वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन करायला पाहिजे, प्लास्टिकचा वापर टाळला पाहिजे, पाण्याची व विजेची बचत केली पाहिजे.
पर्यावरण संवर्धनासाठी राज्य शासन आग्रही असून गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार, जलयुक्त शिवार यासारख्या योजना सुरू करण्यात आल्या आहेत. मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण केले जात आहे. वृक्षसंवर्धन आवश्यक असून यासाठी अनेक सामाजिक संस्था सोबत आहेत. याबाबत जनजागृती होण्याची गरज आहे. पर्यावरण विभाग व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ खूप मोठ्या प्रमाणात काम करीत आहे. शासनासोबत आपण सर्वजण काम करुन ही लोकचळवळ झाली पाहिजे.
स्वच्छता ही आरोग्याच्यादृष्टीने महत्वाची आहे. पंढरपूर स्वच्छ करण्यासाठी लोकप्रतिनिधी सोबत जिल्हा प्रशासन काम करीत आहे. यावर्षी वारकऱ्यांची वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन योग्य प्रकारचे नियोजन करण्यात आले आहे. प्रत्येक वारकरी हा सुखरूप घरी गेला पाहिजे. या वर्षी शासनाच्यावतीने वारकऱ्यांना एक लाखाचे विमा कवच दिले आहे, असे श्री. शिंदे म्हणाले.
यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आदी मान्यवरांच्या समवेत यांनी ज्ञानोबा माऊली तुकाराम, ‘ज्ञानोबा- माऊली तुकाराम’ गजर करत कलावंतासोबत पाऊली खेळली.
सचिव प्रविण दराडे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी डॉ. प्रकाश खांडगे, शाहीर देवानंद माळी, चंदाबाई तिवडी, ज्ञानेश्वरमहाराज वाबळे आदि उपस्थित होते.