ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना सन २०२३ चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर

मुंबई : महाराष्ट्र शासनाकडून दिला जाणारा सन 2023 चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना जाहीर झाला आहे. महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा राज्यातील सर्वौच्च नागरी सन्मान आहे. आज यासंदर्भातील घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. मानपत्र, सन्मानचिन्ह आणि रुपये 25 लाख असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. अशोक सराफ यांनी नाटक आणि चित्रपटांच्या माध्यमातून केलेल्या कला क्षेत्रातील कामगिरीचा गौरव या पुरस्काराच्या माध्यमातून करण्यात आला आहे.

मुख्यमंत्री श्री. शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह विविध मान्यवरांनी या पुरस्काराबद्दल अभिनेते अशोक सराफ यांचे अभिनंदन केले आहे.

महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा राज्य शासनाकडून देण्यात येणारा हा सर्वात मोठा पुरस्कार आहे. आरोग्यसेवा, उद्योग, कला, क्रीडा, पत्रकारिता, लोकप्रशासन, विज्ञान आणि समाजसेवा या क्षेत्रांत केलेल्या विशेष योगदानासाठी हा पुरस्कार दिला जातो. या क्षेत्रात महाराष्ट्राचे नाव देशात आणि जगभर नेणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार देण्यास सन 1995 पासून सुरुवात झाली. यावर्षी ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्या नाट्य –चित्रपट क्षेत्रातील योगदानाची दखल घेऊन मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने त्यांची या पुरस्कारासाठी निवड केली. आपल्या विनोदी शैलीने त्यांनी अनेक चित्रपटातून रसिकांना खळखळून हसायला लावले. त्याचबरोबर, संवेदनशीलतेने भूमिका साकारताना रसिकांना आपल्या अभिनयाने मंत्रमुग्ध केले. त्यांच्या अभिनयाचे गारुड मराठी चित्रपटरसिकांवर आजही कायम आहे.

अशोक सराफ हे मराठी चित्रपटसृष्टीतील गुणी आणि दमदार अभिनेता म्हणून अवघ्या चित्रपटसृष्टीत परिचित आहेत. मराठी चित्रपटसृष्टीबरोबरच हिंदी चित्रपटसृष्टीतही त्यांनी आपल्या अभिनयाने त्यांचे वेगळे अस्तित्व निर्माण केले. व्यावसायिक नाटकापासून त्यांनी सुरुवात केली. त्यानंतर पांडू हवालदार, राम राम गंगाराम, अशी ही बनवाबनवी, धुमधडाका, नवरी मिळे नवऱ्याला, आत्मविश्वास, गंमत जंमत, आयत्या घरात घरोबा, एक उनाड दिवस, शुभमंगल सावधान, आई नंबर वन अशा चित्रपटांतून विविधरंगी भूमिका करुन प्रेक्षकांच्या मनात स्वत:चे स्थान निर्माण केले. स्वत:च्या कामाचे क्षेत्र मर्यादित न ठेवता त्यांनी विनोदी, खलनायक तसेच गंभीर पात्रेही पडद्यावर साकार केली आणि त्यातून वेगळी शैली निर्माण केली. त्यांच्या या कारकिर्दीचा गौरव राज्य शासनाने या पुरस्कारासाठी त्यांची निवड करुन केला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, डॉ. अनिल काकोडकर, वासुदेव कामत, डॉ. गो. ब. देगलूरकर, डॉ. शशिकला वंजारी, अॅड. उज्वल निकम आणि समितीचे सदस्य सचिव बिभीषण चवरे यांचा समावेश होता.

राज्य शासनाने प्रख्यात लेखक पु. ल. देशपांडे यांना पहिला महाराष्ट्र भूषण पुरस्कार देवून त्यांच्या साहित्य सेवेतील योगदानाबद्दल गौरविले होते. त्यानंतर गानसम्राज्ञी लता मंगेशकर (संगीत), ज्येष्ठ क्रिकेटपटू सुनील गावसकर (क्रीडा), ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर (विज्ञान), क्रिकेटपटू भारतरत्न सचिन तेंडुलकर (क्रीडा), पंडीत भीमसेन जोशी (कला/संगीत), सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग व राणी बंग (सामाजिक प्रबोधन), ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे (सामाजिक प्रबोधन), ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर (विज्ञान), उद्योगपती रतन टाटा (उद्योग), रा. कृ. पाटील (समाजरप्रबोधन), कवीवर्य मंगेश पाडगावकर (साहित्य), नानासाहेब धर्माधिकारी (समाजप्रबोधन), ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर (मराठी चित्रपट), ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर (विज्ञान), ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर (विज्ञान), शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे (साहित्य), ज्येष्ठ गायिका आशा भोसले (संगीत) आणि निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी (समाजप्रबोधन) यांना राज्य शासनाने यापूर्वी महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन गौरविले आहे.

See also  हिंदवी स्वराज्य महोत्सव २०२४ ची जल्लोषात सांगता