लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळातर्फे योजना -डॉ. प्रशांत नारनवरे

पुणे :- ऊसतोड कामगारांना न्याय देण्यासाठी लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्यावतीने विविध योजना राबविण्यात येत असून ऊसतोड कामगारांनी त्वरीत महामंडळाकडे नोंदणी करावी असे आवाहन समाज कल्याण विभागाचे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी केले आहे.

ऊसतोड कामगार संबंधातील विविध प्रश्न आणि अडचणीबाबत चर्चा करण्यासाठी साखर आयुक्तालयात आयोजित बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉ.नारनवरे यांनी योजनांची माहिती दिली. यावेळी साखर आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, कामगार उपआयुक्त डॉ. संतोष कानडे, साखर आयुक्तालयाचे सहसंचालक संतोष पाटील, महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघाचे व्यवस्थापकीय संचालक संजय खताळ, वेस्ट इंडिया शुगर मिल असोसिएशनचे कार्यकारी संचालक अजित चौगुले, समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त बाळासाहेब सोळंकी आदी उपस्थित होते.

ऊसतोड कामगारांच्या समस्या सोडविण्यासाठी लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या माध्यमातून प्रत्येक नोंदणीकृत कामगारांचा विमा उतरविला जातो. महिलांच्या आरोग्याची काळजी घेतली जाणार आहे. ऊसतोड कामगारांच्या मुला-मुलींच्या शिक्षणासाठी प्रत्येक तालुक्यात वसतीगृहांची उभारणी करण्यात येणार आहे. यासाठी ऊसतोड कामगारांनी महामंडळाकडे त्वरित नोंदणी करून घेणे आवश्यक आहे, असे डॉ. नारनवरे म्हणाले.

ऊसतोड कामगारांच्या प्रश्नांबाबत विविध विभागांचा एकत्रितपणे मसुदा तयार करण्यात येईल व त्यानुसार शासन निर्णय करण्यात येणार असल्याचे साखर आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी यावेळी सांगितले.

कामगार विभागाचे उपायुक्त डॉ. संतोष कानडे यांनी कामगार विभागाच्या निर्देशानुसार कामगार विभागाचे अधिकारीदेखील भेटी देऊन निरीक्षण करतील असे यावेळी सांगितले.

See also  बाणेर पोस्ट ऑफिसमध्ये जागतिक टपाल दिन साजरा