मुंबई : राज्यातील जनतेच्या प्रश्नांविषयी मुद्देसूद चर्चा करुन त्यांना न्याय देण्यासाठी तसेच धोरणात्मक निर्णय घेण्याच्या दृष्टीने विधिमंडळ अधिवेशन महत्वाचे असून मागील अधिवेशनात सभागृहात दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करुन सकारात्मक निर्णय घेण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. त्यामुळे त्या अनुषंगाने प्रशासनाने कार्यवाही करावी, असे निर्देश राज्याचे वने, सांस्कृतिक कार्ये आणि मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले.
राज्याचे पावसाळी अधिवेशन १७ जुलै पासून सुरू होत आहे. त्या पार्श्वभूमीवर वने, सांस्कृतिक कार्ये आणि मत्स्यव्यवसाय या तीनही विभागातील कामांसंदर्भात आतापर्यंत दिलेल्या आश्वासनांची पूर्ती, सर्व तारांकित प्रश्न, लक्षवेधी, पुढील संकल्प यासंदर्भात मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी सह्याद्री अतिथीगृह येथे अधिकाऱ्यांसह सविस्तर बैठक घेतली. तीनही विभागांचे सचिव व विभागप्रमुख यावेळी उपस्थित होते.
मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी तीनही विभागाचे सादरीकरण बघून विषयनिहाय मुद्देसुद चर्चा केली. सांस्कृतिक कार्य विभागाने वर्षभरात राबविलेल्या कार्यक्रमांची माहीती घेऊन विभागाने यासंदर्भात माहिती पुस्तिका प्रकाशित करण्याची सूचना त्यांनी केली. प्रधान सचिव श्री विकास खारगे यांनी सादरीकरण केले.
वन विभागाच्या विविध योजना, नुकसान भरपाई, वन्यजीव संवर्धन आणि सामाजिक वनीकरण याबाबत प्रधान सचिव श्री. वेणुगोपाल रेड्डी यांनी सादरीकरण केले.
मत्स्य व्यवसाय विभागाच्या बैठकीत प्रधान सचिव अतुल पाटणे यांनी सविस्तर सादरीकरण केले. मच्छीमार बांधवांच्या कल्याणासाठी सुरू केलेल्या योजना, जाहीर करण्यात आलेले अनुदान, डिझेल परतावा, गोड्या पाण्यातील मत्स्यसंवर्धन, केंद्रातील योजनांची अंमलबजावणी, ससून डॉक विकास इत्यादी विषयांवर बैठकीत चर्चा करुन आवश्यक सूचना मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी केल्या.