पुणे : पुणे शहराच्या परिसरात असलेल्या पुणे कॅन्टोन्मेंटचा परिसर इथल्या गर्द झाडीने व्यापलेला आहे. अत्यंत वेगाने वाढणाऱ्या पुणे शहरात गेली दोन दशकं येथील निसर्ग, स्थानिक वृक्ष, अधिवास आणि पर्यावरण संवर्धन यात भारतीय सेनेचे मोठे कार्य आहे. पुणे शहर हे जैवविविधतेने नटलेल्या सह्याद्रीच्या कुशीत वसले असून इथली विविधता टिकविण्यासाठी ‘पुणे कॅन्टोन्मेंट – बायोडाव्हर्सीटी हॉटस्पॉट’ या प्रकल्पांतर्गत दक्षिण कमान मुख्यालयाकडून विविध योजना तयार करण्यात आल्या आहेत.
त्या अनुषंगाने भारतीय सेनेच्या शौर्याचे प्रतीक म्हणून व दक्षिण कमान यांचे देशसेवेचे मोलाच्या कार्य विशद होण्यासाठी येथील मुख्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारात देशाच्या ‘७६ व्या स्वतंत्रता दिवसा’ चे औचीत्य साधून भव्य असा ‘तिरंगा टनेल’ निर्माण केला आहे. याचे उदघाटन दक्षिण कमानचे लेफ्टनंट जनरल अजय कुमार सिंग, येविएसएम, वायएसएम, एसएम, विएसएम, जनरल ऑफिसर कमांडिंग इन चीफ यांच्या हस्ते होत आहे.
१३.५ मी रुंद व ३० मी लांब असे दोन तिरंगा इथे तयार केले असून केशरी व पांढऱ्या फुलांसाठी बोगनवेल आणि हिरव्या रंगासाठी मणीप्लांट या वेलाची लागवड इथे केली आहे. दिवसा या फुलांच्या रंगातून तर रात्री एल.इ.डी. लाईट मधून हा भव्य असा तिरंगा टनेल भारतातील इतका भव्य आणि एकमेव असून सर्वांचे लक्ष वेधून घेणारा आहे. कौन्सिल हॉल व सर सॅम मनेकशॉव पुतळा या दोन्ही बाजूने जाताना याची भव्यता जाणवणार आहे. त्यासाठी हिमालया वेलनेस कंपनी आणि पुणे महानगर पालिकेने विशेष साहाय्य केले असून इथल्या पर्यावरणाबद्दल सखोल शास्त्रीय माहिती मिळविण्यासाठी पुण्यातील निर्सग संवर्धन क्षेत्रात अग्रगण्य सोसायटी फॉर एनव्हयरोनमेंट अँड बायोडाव्हर्सीटी कॉन्सर्व्हेशन (एस.इ.बी.सी.) या संस्थेने हि संकल्पना प्रत्यक्षात आणण्याचे काम केले आहे.
भारतीय सेना फक्त सीमेवरच आपले संरक्षण करते असे नसून स्थानिक पर्यावरण व निसर्ग संरक्षणात देखील मोलाचे योगदान देत आहे. स्थानिक वृक्षांची जपणूक, संवर्धन आणि संरक्षण करून आपल्या जवानांमध्ये निसर्गाबद्दल जागरूकता निर्माण करत आहे. या योजने अंतर्गत इथल्या पुरातन वृक्षांची गणना करून त्यांची शास्त्रीय नावं, प्रत्येक जातीच्या वृक्षांची संख्या, शास्त्रीय माहिती तयार करून वृक्षांचे जी.बी.एच. व उंची मोजून त्यांनी कार्बन सिंक म्हणून केलेले कार्य अभ्यासले जाणार आहे. तसेच येथील मुख्य वृक्षांवर कयू.आर. कोड सर्वसामान्य लोकांना त्यांची माहिती नवीन तंत्रज्ञान वापरून एका क्लीक वर उपलब्ध होणार आहे. त्याची सुरुवात मुख्यालय परिसरातील रस्त्यांवर नुकतीच झाली आहे.