वरिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापकांच्या प्रश्नाबाबत शासन सकारात्मक – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

मुंबई : उच्च व तंत्र शिक्षण विभाग अंतर्गत वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापकांच्या विविध प्रश्नासंदर्भात शासन सकारात्मक असून याबाबतच्या प्रलंबित प्रश्नाबाबत वित्त विभागाशी चर्चा करून प्रश्न सोडवले जातील अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली .

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली विधान परिषद, विधान सभेचे सन्मा. सदस्यांकडून उच्च व तंत्रशिक्षण विभागांतर्गत वरिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापकांच्या विविध प्रश्न संदर्भात निवेदनाच्या अनुषंगाने मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, आमदार कपिल पाटील, आमदार विक्रम काळे, आमदार जयंत आसगावकर, आमदार मनीषा कायंदे, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकास चंद्र रस्तोगी, उच्च शिक्षण संचालक डॉ.शैलेंद्र देवळाणकर, उच्च शिक्षण विभागाचे उपसचिव अजित बाविस्कर व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

मंत्री श्री.पाटील म्हणाले, सहयोगी प्राध्यापक व प्राध्यापक यांना देय दिनांक पासून कँसचे लाभ लागू करण्यात यावेत. नवीन शैक्षणिक धोरणामध्ये प्राधान्याने प्राध्यापक भरती आणि महाविद्यालयांना अनुदान देण्याबाबत शासन कार्यवाही करत आहे. आदिवासी भागातील महाविद्यालय, नक्षलवादी भागातील महाविद्यालय, अल्पसंख्यांक महाविद्यालय, डोंगरी भागातील विद्यालय अशा सात ते आठ कॅटेगरीतून आपण हा विषय अनुदानाचा, प्राध्यापक भरतीचा पूर्ण करत आहोत. या सर्व कामासाठी लागणाऱ्या निधी साठी वित्त विभागाशी चर्चा करण्यात येईल असेही श्री. पाटील यांनी सांगितले. केंद्र शासन व विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्देशनानुसार शंभर टक्के प्राध्यापक भरती करण्यात येईल तसेच सुरू असलेली प्राध्यापक भरती गतिमान करून वेळेत पूर्ण करण्यात येईल. यासाठी लागणाऱ्या आर्थिक तरतुदी संदर्भात वित्त विभागाशी चर्चा करण्यात येईल असेही श्री .पाटील यांनी यावेळी सांगितले.

See also  उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि इन्फोसिस यांच्यात सामंजस्य करार; विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास आणि संवाद कौशल्यच्या दृष्टीने उपयुक्त ठरेल - उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील