रस्ता झाला निकृष्ट, पॅचवर्कच्या सूचना
कंत्राटदारावर अधिकाऱ्यांची मेहेरबाणी

लोहगांव : कळस-केसनंद-राहु रस्त्याचे काम लोहगावातील संत नगर ते दादाची वस्ती या १ कि.मी. काँक्रिट रस्त्याचे काम निकृष्ट झाल्याची तक्रार माहिती सेवा समितीतर्फे देण्यात आली होती. त्याच्या स्थळपाहणीसाठी सहाय्यक अभियंता सार्वजनिक बांधकाम उपविभाग क्रं. १ सौ. जान्हवी रोडे व श्री. अभिमन्यू जमाले हे आले होते. पाहणीनंतर संबंधीत अधिकाऱ्यांनी काम निकृष्ट झाल्याचे मान्य जरी केले असले तरी त्यावर पॅचवर्कची मलमपट्टी करण्याची शक्कल लढविली आहे. ही बाब सेवा समितीला मान्य नसून या विरोधात उच्च न्यायालयात धाव घेणार असल्याचे समजते आहे.


संबंधीत रस्त्याचे काम सुरूवातीपासूनच वादग्रस्त राहिले आहे. तक्रारदारांची तक्रार गेल्यानंतर बरेच दिवस चौकशीचे आदेश दिल्या नंतरही चौकशी झाली नव्हती. त्यानंतर एकदिवसीय लाक्षणिक उपोषण देखील करण्यात आले होते. सबब महापालिकेने संबंधीत ठेकेदाराचे ३.५ कोटीचे बिलही थांबवण्यात आले. परंतू यातून मार्ग काढण्याच्या हेतुने का म्हणा सहाय्यक अभियंता सार्वजनिक बांधकाम उपविभाग क्रं. १ सौ. जान्हवी रोडे व श्री. अभिमन्यू जमाले यांनी स्थळपाहणी दौरा केला व चुकीच्या दुरूस्तीला पर्याय म्हणून पॅचवर्क चे आश्वासन देण्यात आले.
अवघे काही महिन्या अगोदर तयार केलेल्या रस्त्याला पहिल्याच वर्षात पॅचवर्क ची मलमपट्टी म्हणजे १५० कोटी कर देणाऱ्या लोहगांवकरांच्या हातात तुरी देण्यासारखी बाब आहे.


माहिती सेवा समितीच्या माध्यमातून ४ महीने पाठपुरावा व उपोषण केल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी या निकृष्ट कामाची पाहणी केली व काम निकृष्ट झाल्याचे मान्य केले. असे असतांना ठेकेदाराकडुन पॅचवर्क करुन घेऊन रस्ता दुरुस्त करण्याचे सुचविले. त्यांची हि सुचना अमान्य करुन संपुर्ण रस्ताच पुन्हा नव्या निवीदेप्रमाणे बनविण्याची मागणी करण्यात आली आहे.


शासनातर्फे सदर कामाची चौकशी सुरू असली तरी मागणी अमान्य झाल्यास माहिती सेवा समिती उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे अधिकार्‍यांना ठामपणे सांगण्यात आले. यावेळी, माहिती सेवा समिती चे पुणे जिल्हा सरचिटणीस सागर खांदवे, मधुकर खांदवे, नवनाथ खांदवे, गोपीशेठ खांदवे, सुमीत खांदवे, सनी खांदवे व लोहगावातील स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.

See also  गुलटेकडी मार्केट यार्ड येथील श्री काळुबाई माता मंदिर येथे स्वच्छता अभियान