पुणे :- महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीमार्फत राज्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या नवसंकल्पनांना मूर्त स्वरुप देण्यासाठी आयोजित ‘महाराष्ट्र स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंज’ स्पर्धेमध्ये शैक्षणिक संस्थांनी सहभागी होण्याकरिता १५ सप्टेंबर २०२३ तर शैक्षणिक संस्थेअंतर्गत उमेदवारांच्या नोंदणीकरिता ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
राज्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या नवसंकल्पनांचा शोध घेणे व त्यांचे नवउद्योजकतेचे स्वप्न साकार करण्यासाठी योग्य ते पाठबळ पुरविणे हा महाराष्ट्र स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंजचे मुख्य उद्देश आहे. राज्यातील कोणत्याही महाविद्यालय अथवा औद्योगिकक प्रशिक्षण संस्था येथे सध्या शिक्षण घेत असलेले विद्यार्थी-विद्यार्थीनी स्पर्धेत वैयक्तिक अथवा कमाल ३ जणांच्या समूहामध्ये सहभागी होऊ शकतात. अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे नाविन्यपूर्ण संकल्पना असणे आवश्यक आहे.
हा उपक्रम जिल्हा तसेच राज्यस्तरावर आयोजित होणार आहे. याद्वारे विजेत्या उमेदवारांना बीज भांडवल उपलब्ध होणार असून विशेष इनक्युबेशन प्रोग्रामचा लाभ घेता येणार आहे. जिल्ह्यातील अधिकाधिक शैक्षणिक संस्थांनी व उमेदवारांनी https://schemes.msins.in या संकेतस्थळाला भेट देऊन विहीत मुदतीत स्पर्धेत आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त सचिन जाधव यांनी केले आहे.