‘नामदेव तुझा बाप’ म्हणत कवी, साहित्यिकांचे अभिनव आंदोलन

पुणे : भारतीय चित्रपट सेन्सॉर बोर्डाने विद्रोही कवी, पद्मश्री नामदेव ढसाळ यांच्याबद्दल केलेल्या अवमानकारक वक्तव्याच्या निषेधार्थ  पुण्याती साहित्यिक, कवी यांनी एकत्र येत अभिनव पद्धतीने गुदळक चौकातील कलाकार कट्ट्यावर आंदोलन केले.  ‘नामदेव तुझा बाप’ असे म्हणत नामदेव ढसाळ यांच्या कविता व लेखनांचे वाचन, आणि विद्रोही कवितांचे सादरीकरण करत सेन्सॉर बोर्डाच्या कोण नामदेव ढसाळ? या प्रश्नाला उत्तर दिले. 

सम्यक साहित्य संमेलन, पुणेचे अध्यक्ष परशुराम वाडेकर यांच्या वतीने या अभिनव आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ गझलकार  म. भा. चव्हाण होते. या आंदोलनात पुण्याच्या माजी उपमहापौर सुनीता वाडेकर, राहुल डंबाळे, दंगलकार नितीन चंदनशिवे, प्रा.राजा भैलूमे, डॉ.  निशा भंडारे, किरण सुरवसे, सागर काकडे, हृद‌मानव अशोक,  रोहित पेटारे उर्फ मिर्झा, कला दिग्दर्शक संतोष सखंद, दीपक म्हस्के, कुमार आहेर, विठ्ठल गायकवाड, आनंद जाधव, आकाश सोनवणे, डॉ. शुभा लोंढे, नागेश भोसले यांच्यासह मान्यवर साहित्यिक, कवी सहभागी झाले होते.

म. भा. चव्हाण म्हणाले, नामदेव ढसाळ हे जागतिक साहित्यिक होते. ते जातीय साहित्यिक नाहीत. बहुजनांचे आग्रदुत होते ते. त्यामुळे एका साहित्यिकाला आपण विशिष्ट जातीत बंद करणे योग्य नाही.

नितीन चंदनशिवे म्हणाले, नामदेव ढसाळ यांची कविता ही नुसती कविता नव्हती तर ऑन ड्युटी 24 असणारी व्यवस्था होती. त्यांच्या कवितांनी केवळ पुस्तकात येवून स्थान मिळवलेले नाही. काही कविता लिहायच्या असतात, काही वाचायच्या असतात तर काही कविता या बोंबलायच्याच असतात. मराठी साहित्याला बोंबलायची सवय नव्हती ती सवय ढसाळ यांच्या  साहित्याने लावली. मात्र आजच्या हेडफोन लावणाऱ्या पिढीला तो आवाजच ऐकायलाच येत नाही.

परशुराम वाडेकर म्हणाले, नामदेव ढसाळ कोण? असं म्हणत त्यांच्या कवितांवर आधारीत एका चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाने परवानगी नाकारली. ढसाळांच्या कवितांपेक्षा आक्षेपार्ह चित्रीकरण आजकालच्या चित्रपटात पाहायला मिळत पण ते सेन्सॉर बोर्डाला दिसत नाही. ढसाळांनी आपल्या लेखणीतून कामगार, मजूर यांना केंद्रस्थानी ठेवून फुले, शाहू, आंबेडकरांचे विचार पसरवण्याचे काम केले. त्यांच्या कवितांची दाखल घेवून भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरविले आहे. पण  आज त्या सरकारला नामदेव ढसाळांचा विसर पडला आहे. ढसाळ यांची कविता प्रत्येकाच्या मनामनात पोचली आहे. गरिबांचा विद्रोह त्यांनी आपल्या लेखणीतून मांडला. त्यांच्या कविता मधील शिव्यांमध्ये ही प्रेम आहे.

दरम्यान, बुद्धगया येथे सुरू असलेल्या महाबोधी विहार मुक्ती आंदोलनाला पाठिंबा देण्याचा ठराव यावेळी मंजूर करण्यात आला. नामदेव ढसाळ यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आणि राष्ट्रगीताने या अभिनव आंदोलनाची सांगता झाली. कवी संमेलनाचे सूत्रसंचालन नितीन चंदनशिवे यांनी केले तर दीपक म्हस्के यांनी आभार मानले.

See also  उपमहाराष्ट्र केसरी पै.महेंद्र गायकवाड यांचा हिंदू युवा प्रबोधिनी कडून सन्मान !!