‘दंगल नको- शांतता हवी’ हीच सामान्य नागरिकांची मागणी – भानूप्रताप बर्गे

खराडी : – प्रत्येक धर्म जर शांतता आणि बंधुभावाची शिकवण देतो तर धर्माचे पुढारपण करणाऱ्यांना अशांतता निर्माण व्हावी असे का वाटत असावे? असा सवाल करत आपण सारे एकच आहोत. सारे भारतीय माझे बांधव आहेत, अशी शालेय जीवनापासून आपण प्रतिज्ञा करताना जाती जातीत आणि दोन धर्मात तेढ निर्माण करणाऱ्या प्रवृत्तींचे मनसुबे हाणून पाडले पाहिजेत, कोणी कितीही दंगली भडकवण्याचे मनसुबे आखले तरी आपण भारताचा सुजाण नागरिक होण्याचेच कर्तव्य निभावले पाहिजे, कारण येथील प्रत्येक नागरिकाला दंगल नको तर शांतता हवी आहे, असे मत प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते आणि मा. सहाय्यक पोलीस आयुक्त भानुप्रताप बर्गे यांनी व्यक्त केले.


गणेशोत्सवाची सांगता म्हणजेच अनंत चतुर्दशी आणि मोहम्मद पैगंबर यांची जयंती एकच दिवशी होत असल्याने हिंदू आणि मुस्लिमांचे सर्वोच्च सण – उत्सव साजरे होत असताना एकमेकांच्या धर्मांना कोणत्याही प्रकारचे गालबोट लागू नये म्हणून धार्मिक ऐक्य आणि सामाजिक सलोखा परिषदेच्या वतीने पुण्यातील खराडीमध्ये धार्मिक ऐक्य संवाद आणि चर्चेचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी भानूप्रताप बर्गे बोलत होते. यावेळी रुग्ण हक्क परिषदेचे अध्यक्ष उमेश चव्हाण, पृथ्वी मेडिकल फाऊंडेशनचे अध्यक्ष तथा मा. सहा. पोलीस आयुक्त मिलिंद गायकवाड, रुग्ण हक्क परिषदेच्या पुणे शहर अध्यक्ष अपर्णा साठे मारणे, माजी पोलीस उपनिरीक्षक रोहिदास किरवे, सुनील जगदाळे, संतोष टिंगरे यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.


आपल्याला चांगले शिक्षण मिळावे, आरोग्याच्या सुविधा मिळाव्यात, आपल्या सर्वांचे मूलभूत हक्क अधिकार आपल्याला मिळालेच पाहिजेत या सर्व मुद्द्यांकडे दुर्लक्ष व्हावे म्हणून दंगलीची योजना आखली जाते, अशा लोकांचे मनसुबे आपण ओळखले पाहिजेत आणि सामाजिक ऐक्य निर्माण केले पाहिजे, असे मा. पोलीस सहा. आयुक्त मिलिंद गायकवाड म्हणाले.


सामाजिक सलोखा परिषदेचे पुणे शहराध्यक्ष फारुख तांबोळी यांनी ज्यावेळी शांतता व संवाद परिषदेचे आयोजन केले होते. खराडी भागातील नागरिकांनी यावेळी गर्दी करत या उपक्रमास प्रचंड पाठिंबा नोंदविला.

See also  बाल गुन्हेगारी रोखण्यासाठी शिक्षण आणि प्रशिक्षणावर भर द्यावा-डॉ.नीलम गोऱ्हे