मतदान केंद्रावर नियुक्त अधिकारी, कर्मचाऱ्यांनी चोखपणे जबाबदारी पार पाडावी – डॉ.स्वप्नील मोरे

पुणे,दि.१२ :- शिरुर लोकसभा मतदारसंघांतर्गत निवडणूक कामासाठी नियुक्त करण्यात आलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी प्रशिक्षणाच्या माध्यमातून कामाचे स्वरूप जाणून घ्यावे आणि  आपली जबाबदारी चोखपणे पार पाडावी अशी सूचना सहायक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.स्वप्नील मोरे यांनी केली.

   हडपसर विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्रावर नियुक्त १ हजार १२० क्षेत्रीय अधिकारी, समन्वय अधिकारी, मतदान केंद्रावर प्रत्यक्ष काम करणारे केंद्रप्रमुख व सहाय्यक अधिकारी कर्मचारी यांच्यासाठी मतदान प्रक्रिया, ईव्हीएम व व्हीव्हीपॅट हाताळणीबाबत वानवडी येथील महात्मा फुले सांस्कृतिक भवन येथे दोन दिवसीय प्रशिक्षणास सुरुवात झाली त्यावेळी श्री.मोरे बोलत होते. प्रशिक्षणाला तहसीलदार नागनाथ भोसले, नायब तहसीलदार जाई कोंडे, समन्वय अधिकारी रविंद्र कदम, प्रदीप आव्हाड आदी उपस्थित होते.

  दोन दिवसीय प्रशिक्षण सत्राच्या पहिल्या दिवशी मार्गदर्शन करताना श्री.मोरे यांनी अधिकारी व कर्मचारी यांची मतदानाच्या आदल्या दिवशी व प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशीचे कर्तव्य व अधिकार याबाबत सविस्तर माहिती दिली. निवडणूक कामकाज करताना होणाऱ्या चुका  टाळण्याबाबत मार्गदर्शन करतांना निवडणूक आयोगाच्या निर्देशाचे सर्वांनी पालन करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. मतदान प्रक्रिया निष्पक्ष व खुल्या वातावरणात पार पाडण्यासाठी मतदान करणाऱ्या मतदाराला केंद्रस्थानी मानून आपले राष्ट्रीय कर्तव्य प्रत्येकाने पार पाडावे असे आवाहन त्यांनी केले.

  कर्तव्य करतांना प्रत्येक अधिकाऱ्याने गोपनीयतेचा भंग होणार नाही याची दक्षता घ्यावी. कोणीही प्रशिक्षण व प्रत्यक्ष मतदान यंत्र हाताळणीचे प्रात्यक्षिक टाळू नये , असे आवाहनही श्री.मोरे यांनी केले.

  समन्वय अधिकारी श्री.कदम यांनी  मतदान यंत्राबाबत माहिती दिली. प्रशिक्षण सत्रांमध्ये प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मतदान यंत्रे स्वतः हाताळावीत. प्रशिक्षणार्थींनी  प्रात्यक्षिकाच्या आधारे मतदान प्रक्रियेची माहिती करून घ्यावी, यामुळे प्रत्यक्ष मतदानावेळी चुका होणार नाहीत,  असे त्यांनी सांगितले.  सादरीकरणाच्या माध्यमातून यावेळी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या शंकांचे निरसन करण्यात आले.

See also  पाषाण आयशर जवळ मेट्रोच्या कामादरम्यान आढळून आले ब्रिटिशकालीन हँडग्रेनेड