बाणेर मध्ये झळकले आम्ही सदैव साहेबांच्या विचारांसोबत चे बॅनर

बाणेर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा गटाने पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या विचारांशी फारकत घेत शिंदे फडणवीस सरकार मध्ये जाण्याचा निर्णय घेतला. यानंतर पुणे शहरातील मोठा गट अजित पवार यांच्या बरोबर गेला असला तरी पुणे शहराचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी शरद पवार यांच्या विचारांसोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे.

या पार्श्वभूमीवर बाणेर बालेवाडी पाषाण सुस महाळुंगे परिसरातील पक्षातील नेते हे अजित पवार यांच्याबरोबर गेले असले तरी मोठ्या प्रमाणात मतदार मात्र शरद पवार यांच्या विचारांसोबत राहण्याचे पाहायला मिळत आहे. याच पासून अजित पवार यांच्या वाढदिवसाच्या दिवशी बाणेर परिसरामध्ये काही ठिकाणी आम्ही सदैव साहेबांच्या विचारांसोबत असे बॅनर झळकताना पाहायला मिळाले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बॅनर वर राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे फोटो टाकण्यात आले असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे फोटो टाकण्यात आलेले नाहीत. यामुळे पुणे शहरामध्ये सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली नव्याने बांधणी होणार असल्याची बाब समोर येत आहे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या सोबत असलेल्या नव्या नेतृत्वाची फळी बाणेर बालेवाडीसह शहर परिसरात पाहायला मिळणार आहे. तसेच गेले अनेक वर्ष जुन्या नेतृत्वामुळे संधी मिळत नसेलेल्या नेतृत्वांना देखील यामुळे नेतृत्व करण्याचा फायदा होत असल्याने अनेक तरुण कार्यकर्ते शरद पवार यांच्या सोबत राहिल्याचे पाहायला मिळत आहेत.

राष्ट्रवादी पक्षाला मानणारा बहुतांश मतदार हा फुले शाहू आंबेडकर विचारांचा असल्याने हा मतदार शरद पवार यांच्या सोबतच असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत असून राष्ट्रवादीतील नवी फळी उमेदवार म्हणून येणार असल्याने निश्चितच स्थानिक पातळीवर उत्सुकता देखील निर्माण झाली आहे.

See also  बाणेर मध्ये 'ग्रे स्टोन' इमारतीच्या बांधकामावरील क्रेन घरावर पडून अपघात