शहरात स्वच्छता अभियान पण पालकमंत्र्यांच्या मतदारसंघात ड्रेनेज मधील पाणी रस्त्यावर

सुतारवाडी : सर्वत्र पुणे शहरामध्ये स्वच्छता अभियान राबवले जात असताना पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मतदार संघातील सुतारवाडी मनपा शाळेजवळ मात्र ड्रेनेज मधील पाणी गेले अनेक महिने रस्त्यावरून वाहत आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर असताना पुणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांसह अनेक नेते स्वच्छता अभियानाच्या फोटोमध्ये व्यस्त आहेत परंतु या समस्येकडे कोणाचेही लक्ष जात नसल्याची तक्रार या परिसरातील नागरिक करत आहेत.

सुतारवाडी मनपा शाळेजवळ गेले अनेक महिने पुणे महानगरपालिकेच्या ड्रेनेज मधील ओव्हर फ्लो झालेले पाणी रस्त्यावरून वाहत आहे. औंध क्षेत्रीय कार्यालय ते पुणे महानगरपालिकेचे आयुक्त सर्वांच्या पर्यंत नागरिकांनी तक्रारी करून देखील यावर अद्याप कारवाई करण्यात आलेली नाही. विशेष बाब म्हणजे या परिसरात पुणे महानगरपालिकेची मनपाची शाळा आहे या शाळेमधील मुलांना देखील या सांडपाण्यातून यावे जावे लागते.

परिसरात दुर्गंधी निर्माण होत असल्याने आरोग्याचा प्रश्न देखील गंभीर होत आहे. तसेच या परिसरातील नागरिकांच्या पिण्याचा पाण्यामध्ये हे पाणी मिसळत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. स्वच्छता अभियानाचा बडेजाव मिरवण्यापेक्षा या नागरिकांच्या प्रश्नांकडे लक्ष देण्यात यावे अशी मागणी नागरिक करत आहेत.

See also  भाजपच्या पहिल्या यादीत 'कसबा' नाही आश्चर्याचा धक्का