विज्ञान भारती, इंडियन नॅशनल सायन्स अकॅडमी व ‘आयआयटीएम’ यांच्यातर्फे ‘सायन्स-२०’ अंतर्गत ‘शाश्वत विकासासाठी विज्ञान, तंत्रज्ञान व इनोव्हेशनला पोषक वातावरण निर्मिती’ यावर राष्ट्रीय परिषद

पुणे : विज्ञान भारती पश्चिम महाराष्ट्र विभाग, भारतीय राष्ट्रीय विज्ञान अकादमी नॅशनल (इंडियन नॅशनल सायन्स अकॅडमी) आणि भारतीय उष्णप्रदेशीय हवामानशास्त्र संस्था (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेटेरॉलॉजी-आयआयटीएम) यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सायन्स २०’च्या पुढील चर्चासत्राचे व राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘शाश्वत विकासासाठी विज्ञान, तंत्रज्ञान व इनोव्हेशनला पोषक वातावरणनिर्मिती’ ही या परिषदेची संकल्पना आहे. येत्या मंगळवारी (दि. ३ ऑक्टोबर) सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत ही राष्ट्रीय परिषद आयआयटीएम, पाषाण रोड पुणे येथे संपन्न होणार आहे.

भारताच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या जी-२० परिषदेच्या अंतर्गत सायन्स-२० बैठकीत झालेल्या वैचारिक चर्चेचा प्रसार करण्याच्या उद्देशाने ही राष्ट्रीय परिषद महत्वाची आहे. या निमित्ताने वैज्ञानिक समूहाला एकाच व्यासपीठावर आणण्याचा हा अनोखा प्रयत्न आहे.

या राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन मंगळवारी सकाळी १० वाजता नालंदा विद्यापीठाचे माजी कुलपती व ज्येष्ठ संगणक शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर, आयुष मंत्रालयाचे सचिव डॉ. राजेश कोटेचा, विज्ञान भारतीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. शेखर मांडे, इंडियन नॅशनल सायन्स अकॅडमीचे अध्यक्ष डॉ. आशुतोष शर्मा, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेटेरॉलॉजीचे संचालक डॉ. आर. कृष्णन, विज्ञान भारतीचे राष्ट्रीय सचिव प्रवीण रामदास, विज्ञान भारती पश्चिम महाराष्ट्र विभागाचे अध्यक्ष डॉ. योगेश शौचे यांच्या उपस्थितीत होणार आहे.

प्रसिद्ध शास्त्रज्ञ प्रा. डॉ. भूषण पटवर्धन, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरू लेफ्ट. जनरल माधुरी कानिटकर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. सुरेश गोसावी, रणजित पुराणिक, शास्त्रज्ञ डॉ. आशिष लेले, डॉ. प्रशांत ढाकेफळकर, भौतिक शास्त्राचे अभ्यासक डॉ. संजय ढोले, डेक्कन विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. वसंत शिंदे, डॉ. अरविंद रानडे, डॉ. अंकुर पटवर्धन यांच्यासह विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्रातील इतर अनेक तज्ज्ञ या राष्ट्रीय परिषदेत मार्गदर्शन करणार आहेत.

यासह परिषदेमध्ये पदवी, पदव्युत्तर, पीएचडी, रिसर्च फेलो आणि पदव्युत्तरांसाठी ‘क्लीन एनर्जी फॉर ग्रीनर फ्युचर’, ‘युनिव्हर्सल होलिस्टिक हेल्थ’ आणि ‘सायन्स फॉर सोसायटी अँड कल्चर’ या तीन सायन्स-२० संकल्पनेवर चर्चा आणि पोस्टर सादरीकरणे असतील. पदवी अभ्यासक्रम शिकणारे विद्यार्थी, फॅकल्टी सदस्य, संशोधक, शास्त्रज्ञ व विज्ञानप्रेमींना या परिषदेला उपस्थित राहता येईल.

See also  सुसगावच्या रस्ता रुंदीकरणासाठी आमदार रणजीत सिंह मोहिते पाटील यांचे विशेष प्रयत्न