गतिमान नव्हे नीतिमूल्ये हरवलेलं सरकार

दीपक श्रोते, –
कुठे चाललाय महाराष्ट्र माझा ?
जिथे शिक्षणाची, ज्ञानाची गंगा वाहायला हवी त्यासाठी पैसे नाही म्हणून ते मोडीत काढायला निघाले. दुर्गम भागातील १४,००० शाळा बंद करणार तर महाराष्ट्रातील ६२,००० शाळा खासगीला दत्तक देणार. यांचा डोळा सरकारी शाळेच्या मोक्याच्या जागेवर दिसतो. अर्थातच दबे कुचल्यांचा एक कदम गुलामीकडे. कारण ह्यांची मुले, मुली शहरात पैसे देऊन खासगी शाळेत शिकतात .

म्हणजे महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, महर्षी कर्वे, डॉ. पंजाबराव देशमुख, डॉ. आंबेडकर यांनी महिला व वंचितांच्या शिक्षणासाठी केलेल्या कामाला मुठमातीच देणे झाले ना ?

आणि दुसरीकडे अजून जनता बरबाद करण्यासाठी दारूची दुकाने वाढवत मद्याच्या गंगा वाहाण्याची महत्वाकांक्षा.
आणि हेच सरकार महात्मा गांधींजींची आपल्या कृत्यातून खिल्ली उडविते.
ह्यांचे अजेंडे दारूची दुकाने वाढविण्याचे आणि 2 ऑक्टोबर पासून ड्राय सप्ताह पाळत दुकानांवर धाडी टाकायच्या. चहाच्या दुकानात सिगारेट विकल्या जाते म्हणून 2 ऑक्टोबरला त्यांचेवर झडती घेत पोलीस कारवाई होताना मी बघितले. तर मग काय फक्त आठवडा भरच गांधीजी वरून बघत असतात का ?
खरच मान ठेवायचा असेल तर दारूच्या फॅक्ट्री, दुकाने बंद करा, ते न करता ते वाढवता. म्हणजे एकीकडे काम त्यांच्या विरोधात आणि दुसरीकडे ड्राय सप्ताहाचे नाटक.

किती हा ढोंगीपणा.
गतिमान नव्हे, नीतिमूल्ये हरवलेलं सदा न कदा खुर्चीच्या खेळात रंगणारं नशेबाज सरकार.
शिक्षणाची दारे बंद करणारं, मद्यपी वाढवणारं. सत्तेसाठी लाचार.
आणि सध्या विरोधात असणारे लोकप्रतिनिधीही मूग गिळून गप्प. कुणाला घाबरतात, इतकी कसली लाचारी?

जनतेलाच उठाव केल्याशिवाय काही होणे नाही.
यांनी तर जनतेच्या बरबादीचा विडाच उचललाय दिसतो. उद्रेक तर होणारच आणि मग पळता भुई कमी पडेल हे लक्षात ठेवा.
सह्याद्री हिमालयासमोर इतका लाचार कधीच नव्हता.
शिवरायांचे सर्वच नाव घेतात पण कृत्य ?


See also  शिक्षक दिनाच्या निमित्ताने..नवीन शैक्षणिक धोरण राबवण्यापूर्वी प्रा.भाऊसाहेब घोडके यांचा लेख