समूह नृत्यातून दिव्यांग मुलांची मनमोहक अदाकारी

पुणे : ‘बूम रो बूम रो’ गाण्यावरील काश्मिरी नृत्य… ‘गजानना गजानना’ वर सादर केलेली गणेशवंदना… ‘गोविंद हरी बोलो गोपाल बोलो’ भाजनावर धरलेला ठेका… लोकगीतांवरील आदिवासी, कोळी, शेतकरी नृत्य… ‘आई भवानी तुझ्या कृपेने तारिसी भक्ताला’ यातून देवीला केलेली विनवणी… पर्यावरण संदेश देणारे नृत्य, देशभक्तीपर नृत्य अशा बहारदार व मनमोहक नृत्याच्या अदाकारीने दिव्यांग मुलांनी उपस्थितांची मने जिंकली.

निमित्त होते, लायन्स क्लब इंटरनॅशनल ३२३४ डी-२ मधील सहकारी क्लब आयोजित मतिमंद गट समूहनृत्य स्पर्धेचे! लायन्स क्लब ऑफ पूना वेस्ट, गणेशखिंड, सहकारनगर, रॉयल, युनिक, संस्कृती, ट्वेन्टी फर्स्ट सेंच्युरी यांच्या वतीने आयोजित दिव्यांग विद्यार्थ्यांच्या स्पर्धेचे हे १३ वे वर्ष होते. सदाशिव पेठेतील उद्यान प्रसाद कार्यालयात रंगलेल्या या स्पर्धेत १७ शाळेतून एकूण २५० विद्यार्थी सहभागी झाले होते. ही स्पर्धा शाळा, कार्यशाळा व पुनर्वसन गट अशा तीन गटात झाली. वैशाली आचार्य, साक्षी आपटे यांनी परीक्षक म्हणून काम पहिले.

समूहनृत्य स्पर्धेत शाळा गटात सेवासदन दिलासा केंद्र, लक्ष्मी रोडने प्रथम (बूम रो बूम रो-काश्मिरी नृत्य), साई संस्कार निगडीने द्वितीय (आई भवानी तुझ्या कृपेने) व सेवाधाम मतिमंद निवासी शाळा, पिंपळे जगताप यांनी तृतीय (आदिवासी) क्रमांक पटकवला. कार्यशाळा गटात साई संस्कार निगडी या गटाने प्रथम, कामयानी गोखलेनगर गटाने व्दितीय, तर सेवासदन दिलासा एरंडवणा गटाने तृतीय क्रमांक पटकावला. पुनर्वसन गटात मारुंजी येथील नवक्षितिज संस्थेच्या मुलांनी कोळी नृत्य सादर करत प्रथम क्रमांक मिळवला.

स्पर्धेत सहभागी प्रत्येक विद्यार्थ्याला लायन्स क्लब ऑफ ट्वेन्टी फर्स्ट सेंच्युरी यांच्याकडून बक्षीस देण्यात आले. लायन्स क्लब ऑफ पुणे गणेशखिंड व पुना वेस्ट यांच्याकडून स्नेहभोजन देण्यात आले. माजी प्रांतपाल लायन चंद्रशेखर शेठ, लायन शाम खंडेलवाल, लायन आनंद आंबेकर, लायन कांतीलाल पालेशा यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी संयोजिका सीमा दाबके, लायन ऋजुता पितळे, माधुरी पंडित, शीतल गादिया, अनघा शहा, रोहिणी गाडेकर, शामा गोयल, सतीश राजहंस, प्रशांत टेंबरे, अमृत गुंदेचा, सरीता सोनावले, मंदार मेहंदळे, क्रांती दहिवळे आदी उपस्थित होते.

प्रास्ताविकात सीमा दाबके म्हणाल्या, या विद्यार्थ्यांचा बुध्यांक कमी असला, तरी प्रत्येकात कलागुण आहेत. या कलागुणांना समाजासमोर आणून त्यांच्यात सभाधीटपणा, आत्मविश्वास, सांघिक भावना व जिद्द वाढवण्याच्या दृष्टीने ही स्पर्धा मोलाचे योगदान देत आहे. शिक्षकांच्या मेहनतीमुळे हे विद्यार्थी सुंदर नृत्य सादर करतात.

चंद्रशेखर शेठ यांनी विद्यार्थ्यांना बोधपर गोष्ट सांगितली. श्याम खंडेलवाल, आनंद आंबेकर यांनी विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाचे कौतुक केले. प्रतिभा खंडागळे यांनी सूत्रसंचलन केले. श्रद्धा शहा यांनी आभार मानले.

See also  ब्राह्मण समाजाच्या एकत्रीकरणाचे कार्य कौतुकास्पद - नामदार चंद्रकांतदादा पाटील यांचे कौतुकोद्गार