पुणे : “श्री सदगुरु विश्वनाथ महाराज रूकडीकर ट्रस्ट कोल्हापूर आणि श्री विश्ववती आयुर्वेदीय चिकित्सालय व रिसर्च सेंटर कोल्हापूर आयोजित श्री विश्वव्याख्यानमाला सातव्या आयुर्वेद राष्ट्रीय परिषदेचे, भव्य आयुर्वेद प्रदर्शनाचे, आरोग्य तपासणी व उपचार शिबिराचे आणि आयुष मंत्रालय व नॅशनल कमिशन फॉर इंडियन सिस्टीम ऑफ मेडिसिनच्या (एनसीआयएसएम) बोर्ड ऑफ एथिक्स अँड रजिस्ट्रेशन सहकार्याने आयुष्मान भारत डिजिटल मिशनचे उद्घाटन उद्या शुक्रवारी (ता. ६) करण्यात येणार आहे,” अशी माहिती ‘एनसीआयएसएम’चे चेअरमन वैद्य राकेश शर्मा आणि श्री सदगुरु विश्वनाथ महाराज रूकडीकर ट्रस्टचे मुख्य सल्लागार व विश्वस्त वैद्य समीर जमदग्नी यांनी पत्रकार परिषदेत दिली. प्रसंगी श्री सद्गुरू विश्वनाथ महाराज रुकडीकर ट्रस्ट कोल्हापूरचे विश्वस्त डॉ. तुषार सौंदणकर, सायंटिफिक कमिटीचे प्रमुख डॉ. गिरीश शिर्के व डॉ. प्रसाद पांडकर आदी उपस्थित होते.
वैद्य राकेश शर्मा म्हणाले, “आयुष मंत्रालय व नॅशनल कमिशन फॉर इंडियन सिस्टीम ऑफ मेडिसिनच्या (एनसीआयएसएम) सहकार्याने सुरु करण्यात येणाऱ्या आयुष्मान भारत डिजिटल मिशनचे उद्घाटन शुक्रवारी (ता. ६) रोजी सकाळी १० वाजता खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. आमदार माधुरी मिसाळ, ‘एनसीआयएसएम’ आयुर्वेद शिक्षण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष वैद्य जयंत देवपुजारी, आयुष मंत्रालयाशी संबंधित अनेक पदाधिकारी यावेळी उपस्थित राहतील. आयुष्मान भारत डिजिटल मिशन अंतर्गत महाराष्ट्रातील आयुष विभागातील अंदाजे २००० डॉक्टरांची नोंदणी देखील करण्यात येणार आहे. ज्यामुळे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील ‘आभा’ (आयुष्मान भारत हेल्थ अकाऊन्ट) प्रकल्पाला चालना मिळेल.”
वैद्य समीर जमदग्नी म्हणाले, “पुण्यातील बिबवेवाडी येथील वर्धमान सांस्कृतिक केंद्रात ६, ७ व ८ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत श्री विश्व व्याख्यानमालेअंतर्गत सातव्या राष्ट्रीय आयुर्वेद परिषदेचे आयोजन केले आहे. भारतातील आयुर्वेद क्षेत्रात ३५ वर्षांहून अधिक अनुभव असणारे दिग्गज वक्ते परिषदेत मार्गदर्शन करणार आहेत. संपूर्ण भारतातून ३००० आयुर्वेदिक डॉक्टर्स व विद्यार्थी उपस्थित राहणार आहेत. या परिषदेचे उद्घाटन आरोग्य विज्ञानातील प्रतिष्ठित प्राध्यापक डॉ. भूषण पटवर्धन व ज्येष्ठ नेते माजी आमदार उल्हास पवार यांच्या हस्ते होणार आहे. परिषदेत २०० पेक्षा अधिक शोधनिबंध सादर केले जाणार आहेत.”
“पुण्यातील ख्यातनाम वैद्य समीर जमदग्नी, संशोधक डॉ गिरीश टिल्लू, पंचकर्म तज्ञ वैद्य योगेश काळे व आयुर्वेदीय स्त्रीरोग तज्ञ वैद्य रेणुका कुलकर्णी हे मुख्य वक्ते असतील. उत्तराखंड डेहराडून चे देशातील जेष्ठ रसशास्त्री पद्मश्री वैद्य बालेंदु प्रकाश, बंगलोर येथील ज्येष्ठ तज्ज्ञ प्रो. ममता भागवत आणि कोट्टकल केरळ येथील ज्येष्ठ आयुर्वेदीय बालरोग तज्ञ वैद्य दिनेश के एस यांचेही मार्गदर्शन ३००० आयुर्वेद डॉक्टरांना लाभणार आहे. ट्रस्ट चे अध्यक्ष श्री सदगुरू आनंदनाथ सांगवडेकर अध्यक्षस्थानी असतील. वैद्यनाथ चे सिद्धेश शर्मा व धूतपापेश्वर चे श्री रणजित पुराणिक उपस्थित राहणार आहेत,” असे वैद्य प्रसाद पांडकर यांनी नमूद केले.
डॉ. तुषार सौंदणकर म्हणाले, “तीनही दिवस मोफत आरोग्य तपासणी व सल्ला शिबीर होईल. या शिबिरात पोटाच्या, पचनाच्या तक्रारी, स्त्रियांच्या तक्रारी, संधिवात व मणक्याचे विकार, त्वचा विकार व सौंदर्य विषयक तक्रारी, डोळ्यांचे आजार, मधुमेह व रक्तदाब, मूळव्याध, भगंदर, मुतखडा व मूत्रविकार, दमा व श्वसनाचे विकार या आजारांवर मोफत तपासणी, सल्ला व १५ दिवसांची औषधे मोफत दिली जाणार आहेत. शिबिरात ३०० आयुर्वेदीय तज्ञ डॉक्टर्स सहभागी असणार आहेत. भव्य आयुर्वेद एक्स्पोअंतर्गत दैनंदिन आयुर्वेद उत्पादने, औषधे, पंचकर्म उपकरणे आणि सौंदर्य प्रसाधने यांचे प्रदर्शन सर्वसामान्यांसाठी खुले आहे. यासह आयुर्वेदातील विविध वनस्पतींचे प्रदर्शन त्यांच्या उपयोगासह प्रदर्शित केल्या जाणार आहेत