स्वतःला ओळखा; सुख आपल्यातच दडलेले आहे -अविनाश धर्माधिकारी

पुणे :प्रत्येकाने आपल्या आयुष्यात डोकावले पाहिजे, सर्व सुख आपल्यात दडलेले असते. आपले कर्तव्ये उत्तमपणे करणे त्यात आनंद बाळगणे हेच खरे सुख आहे, असे मत माजी प्रशासकीय अधिकारी व चाणक्य मंडळ परिवाराचे संस्थापक अविनाश धर्माधिकारी यांनी व्यक्त केले. तरुण पिढी सध्या व्यसनाकडे वळली आहे. हे सुख नसून दुःखदायक सुख आहे. आपल्याला ज्ञान आणि साधनेचे व्यसन लागले पाहिजे, ज्ञान, साधना केल्यास आयुष्यभर ज्ञानाची शिदोरी आपल्या जवळ असते, असेही यावेळी त्यांनी नमूद केले.


आराध्या योग अँड वेलनेस इन्स्टिट्यूट वतीने आयोजित आणि अनुराध्या प्रकाशनातर्फे प्रकाशित पुणे महानगरपालिकेचे उपायुक्त राजीव नंदकर लिखित ‘सुखाच्या शोधात’ आणि इयत्ता पाचवीतील १० वर्षीय त्यांची मुलगी कु. आराध्या नंदकर हिने लिहलेले ‘सारा पारकर अँड द मॅजिकल ओरब्ब’ या दोन्ही पुस्तकांचे प्रकाशन बुधवारी बालगंधर्व रंगमंदिर येथे, माजी प्रशासकीय अधिकारी व चाणक्य मंडळ परिवाराचे संस्थापक अविनाश धर्माधिकारी यांच्या हस्ते प्रकाशन झाले.


माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड आणि आळंदी देवस्थानचे विश्वस्त व अर्थतज्ञ अभय टिळक यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. महावितरणचे मुख्य अभियंता राजेंद्र पवार, आराध्या योग अँड वेलनेस इन्स्टिट्यूटच्या संचालिका व प्रकाशिका चेतना राजीव नंदकर यावेळी यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाचा प्रारंभ दीपप्रज्वलन करून करण्यात आला. श्रावणी कुलकर्णी हिने सरस्वती प्रार्थना सादर केली.
‘सुखाचा शोध’ या विषयावर अविनाश धर्माधिकारी यांचे व्याख्यान झाले.
धर्माधिकारी म्हणाले, तरुणांना ज्ञान आणि साधना करण्याचे व्यसन लागले पाहिजे, त्यामुळे त्याला आयुष्य सुखाचे जगता येईल. आपल्या कर्तव्यात आनंद असतो. आपण हाती घेतलेले काम उत्तम रीतीने पार पाडले पाहिजे. दुसऱ्याच्या सुखात आपण डोकावण्याची गरज नाही, खरे सुख आपल्यात असून ते ओळखण्याची ताकद आपल्यात निर्माण करा.
सात्विक सुख सुरवातीला विषासारखे असते, मात्र नंतर हेच विष अमृतात रूपांतर होते. सर्व सुखाचे निदान आपल्यात आहे. चांगल्या गोष्टींची सवय लावून असा सल्ला यावेळी त्यांनी दिला. लेखक नंदनकर यांनी सुखाचा शोध या पुस्तकातून तुम्हाला अनुभूती घेता येईल. त्यांनी सुखाचा खरा मार्ग त्यांनी दाखवला आहे. सुख मिळवण्यासाठी काय काय करावे लागणार अगदी सोप्या भाषेत त्यांनी सांगितले आहे.
माणसाला कितीही मिळाले तरी, त्याला कमीच वाटते. माणसाला भौतिक साधने जमा करण्याची हाव लागली असल्याने सुखाचा मार्ग सापडत नाही. स्वच्छ आणि कार्यक्षम अधिकारी होऊन मी काम केले. ते स्वप्न मी आधी पाहिले होते. दुखीतांचे अश्रू पुसता आले तरच आपले जीवन सार्थकी लागेल, असेही यावेळी त्यांनी नमूद केले. संत ज्ञानेश्वर यांनी सुखाचा मार्ग पसायदानात सांगितला आहे. संतांनी सुखाचा मार्ग सांगितला आहे, हेच त्यांचे काम नंदनकर करीत असल्याचे कौतुक धर्माधिकारी यांनी केले.
शेखर गायकवाड म्हणाले, आपली जगण्याची वाटचाल भौतिक साधनांकडे चाललेली आहे. साधे कसे राहायचे हे नंदकर यांनी आपल्या पुस्तकातून सोप्या भाषेत सांगितले आहे. आराध्या हिने देखील आपल्या कल्पना शक्तीचा वापर केला आहे.सध्या माणूस गोंधळलेल्या परिस्थितीत सारखा जगत असतो. सुखाचा सोपा मार्ग त्यांना सापडत नाही, ही मोठी खंत आहे. आध्यात्मिक आणि व्यवस्थापन नंदनकर यांनीपुस्तकात मांडले आहे. सुखाचा सोपा मार्ग त्यांनी दाखवला आहे.
डॉ. अभय टिळक म्हणाले, सुखाची अनुभूती येण्यासाठी आपल्यातील दुर्गुण काढणे गरजेचे आहे. आपले मन स्थिर असणे गरजेचे आहे. संत विचार जीवनात आणणे गरजेचे आहे.
राजीव नंदकर म्हणाले, प्रत्येकजण सुखाच्या शोधत असतो. हे सुख शोधण्याचे काम मी केले. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना अनेक विषयावर लिहिले. त्यात या पहिल्या पुस्तकाचे प्रकाशन होत असल्याचा आनंद होत आहे. कु. आराध्या हिने आपले मनोगत व्यक्त केले. ती म्हणाली, मी कोरोना काळात लिहिण्याची कल्पना सुचली, याचा मी पुरेपूर वापर केला. मी माझ्या कल्पना शक्तीचा वापर केला आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक चेतना नंदकर यांनी केले. त्या म्हणाल्या, ग्रंथ हेच जीवन आहे. ग्रंथ आपल्याला जीवन जगायला शिकवते. आज वाचन संस्कृती लोप पावत चालली आहे. वाचावे आणि लिहावे हा उपक्रम आम्ही हाती घेतला आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राजक्ता मांडके यांनी केले. राजीव नंदकर यांनी आभार मानले.

See also  कोंढवा भागात मुलींसाठी उर्दू माध्यमिक शाळा सुरू करण्याची आप ची मागणी