माहिती अधिकार कट्ट्याचा दहावा वर्धापन दिन

पुणे : माहिती अधिकार कट्ट्याचा दहावा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. यावेळी माहिती अधिकार कट्ट्याचे संस्थापक विजय कुंभार यांनी माहिती अधिकार कट्ट्यामार्फत घेण्यात आलेल्या उपक्रमामुळे सामान्य नागरिक आणि प्रशासन यांच्यामधील दरी मोठ्या प्रमाणावर कमी झाली असल्याचे मत व्यक्त केले. परिणामी सर्वसामान्य नागरिक सबल व्हायला मदत झाली असेही ते म्हणाले.

सर्वसामान्य नागरिकांना माहितीच्या अधिकाराची माहिती सहजपणे उपलब्ध व्हावी यासाठी विजय कुंभार यांनी 2014 साली माहिती अधिकार कट्टा सुरू केला. या कट्ट्यामार्फत माहिती अधिकाराबाबत जनजागृती, प्रशिक्षण, जनहित याचिका दाखल करणे, माहिती अधिकाराबाबत न्यायालयीन लढाई लढणे आदी उपक्रम राबवले जातात.

कार्यक्रमाला माजी प्रधान सचिव महेश झगडे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुभाष वारे, माजी अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रल्हाद कचरे, ज्येष्ठ माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली, मोहम्मद अफजल तसेच माहिती अधिकार क्षेत्रातील अनेक दिग्गज उपस्थित होते.

कार्यक्रमात बोलताना माजी प्रधान सचिव महेश झगडे यांनी सध्या माहिती अधिकार कमकुवत करण्याचे सर्वत्र प्रयत्न चालले असल्याचे सांगितले. माहिती अधिकार कायद्याची अंमलबजावणी होते की नाही हे पहाण्याची जबाबदारी त्या त्या खात्याच्या सचिवांनी पार पाडली पाहिजे असेही ते म्हणाले.

माजी अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रल्हाद कचरे यांनी माहिती अधिकार कायदा हा शासन आणि नागरिक यांच्यामधील एक प्रकारचा संवाद असल्याचे सांगितले. सध्या 3% लोक देश चालवत आहेत आणि 97% लोक त्यानुसार चालत आहेत असेही ते म्हणाले. माहिती अधिकारातील कलम 4 नुसार शासनाने खुलेपणाने सर्व माहिती नागरिकांनी न मागता उघड केली पाहिजे असेही ते म्हणाले.

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुभाष वारे यांनी सध्या लोकशाही ही भांडवलशाहीची बटीक झाली असल्याचे सांगितले. आज आपण निवडून दिलेले लोकप्रतिनिधी लोकप्रतिनिधी न राहता राजे झालेले आहेत असेही ते म्हणाले.

यावेळी माहिती अधिकार कट्ट्याच्या वतीने दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिका नेटाने लढणारे एडवोकेट सुनील आह्या यांचा सत्कार करण्यात आला.ज्येष्ठ पत्रकार विनिता देशमुख यांनी सूत्रसंचालन केले.

See also  पुण्याचे अतिरिक्त विभागीय आयुक्त अनिल रामोड सीबीआयच्या जाळ्यात; सरकारी निवासस्थान व बाणेर येथील घरावर सीबीआयचा छापा