निवडणुकीच्या कामकाजात टाळाटाळ; खडकवासला विधानसभा मतदारसंघातील सहा कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई प्रस्तावित

पुणे : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या कामकाजात टाळाटाळ केल्याप्रकरणी खडकवासला विधानसभा मतदारसंघात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी म्हणून नियुक्त सहा कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई प्रस्तावित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, अशी माहिती खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी संजय आसवले यांनी दिली आहे.

पुणे महानगरपालिकेच्या कै. ह. तू. थोरवे प्राथमिक विद्यालय शाळा क्र. १६२ बी व विद्या निकेतन १९ चंद्रभागनगर कात्रज या शाळेतील शिक्षकांना निवडणूक कामकाजाकरीता मतदान केंद्रस्तरीय अधिकारी म्हणून आदेश बजावण्यात आले होते. या कर्मचाऱ्यांनी वारंवार संधी देऊनही त्यांना नियुक्त केलेल्या भागाचे मतदान केंद्रस्तरीय अधिकारी म्हणून आपले निवडणूक कर्तव्य पार पाडण्यात अक्षम्य दुर्लक्ष, कुचराई, दिरंगाई केल्याच्या कारणास्तव त्यांच्याविरुद्ध लोकप्रतिनिधीत्व अधिनियम १९५० कलम ३२ अन्वये निलंबनाची कारवाई प्रस्तावित करावी असे निर्देश पुणे महानगरपालिकेच्या शिक्षणाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. यापुढेही निवडणूक कामकाजात टाळाटाळ करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यासह कडक कारवाई करण्यात येईल, असेही श्री. आसवले यांनी स्पष्ट केले आहे.

See also  भाजपने दरवेळी नवा जाहीरनामा दिला -माधव भांडारी