पुणे ः भारताचे पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पदक विजेते खाशाबा जाधव यांच्या तैलचित्रांचे अनावरण पुण्यातील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात करण्यात आले आहे.
म्हाळुंगे-बालेवाडी मधील महाराष्ट्र शासनाच्या श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलातील मुख्य अॅथलेटिक्स स्टेडियमच्या प्रवेशव्दाराजवळ खाशाबा जाधव यांच्या तैलचित्र झळकले आहे.
ऑलिम्पिकपटू देवेंदर वाल्मिकी, क्रीडा व युवक कल्याण विभागाचे सहसंचालक सुधीर मोरे, उपसंचालक सुहास पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून या तैलचित्राचे अनावरण करण्यात आले. यावेळी क्रीडा लेखक संजय दुधाणे, सहाय्यक संचालिका भाग्यश्री बिले, क्रीडा अधिकारी संजोग ढोले, प्रशिक्षिका प्रज्ञा पाटील, दिपाली पाटील, क्रीडा अधिकारी चनबस स्वामी आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी शासनाच्या क्रीडा प्रबोधिनीचे खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते. या तैलचित्रला महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे सचिव नामदेव शिरगांवकर, उपाध्यक्ष प्रदिप गंधे, संजय शेटे यांनीही अभिवादन केले आहे.
प्रसिध्द चित्रकार प्रकाश बोरूडे यांनी 3 बाय 4 फूटाचे खाशाबा जाधवांचे तैलचित्र रेखटले आहे. तैलचित्राखाली ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव, 15 जानेवारी 1925 ते 14 ऑगस्ट 1984, भारताचे पहिले ऑलिम्पिक पदक विजेते, हेलसिंकी ऑलिम्पिक 1952, खेळ – कुस्ती असा फलकही लावण्यात आला आहे. खाशाबा जाधव यांच्या निवृत्तीनंतरच्या काळातील तैलचित्र क्रीडानगरीत लक्ष वेधून घेत आहे. क्रीडा लेखक संजय दुधाणे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व क्रीडामंत्री संजय बनसोडे यांच्याकडे तैलचित्र लावण्याबाबत मागणी केली होती. त्यानुसार तत्कालिन क्रीडा आयुक्त सुहास दिवसे यांनी हे तैलचित्रासाठी कार्यवाही केली. तैलचित्राची निवड करण्यासाठी क्रीडाआयुक्त राजेश देशमुख, उपसंचालक संजय सबनीस व उपसंचालक उदय जोशी यांनी मार्गदर्शन केले. 23 जून ऑलिम्पिक दिनाचे औचित्य साधून तैलचित्राचे अनाकरण करण्यात आले. तैलचित्राबद्दल खााशाबा जाधवांचे सुपुत्र रणजीत जाधव यांनीही महाराष्ट्र शासनाने आभार मानले आहेत.
महराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक कल्याण विभागाच्या वतीने खाशाबा जाधवांचा 15 जानेवारी हा जन्मदिन राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा केला जात आहे. त्यांच्या नावाने राज्य कुस्ती स्पर्धेचेही शासनाकडून दरवर्षी आयोजन करण्यात येते.