संस्कारांची शिदोरी – मी अंजना शिंदे
(मी अंजना शिंदे या आत्मचरित्रातील काही भाग)

संस्कारांची शिदोरी – मी अंजना शिंदे
(मी अंजना शिंदे या आत्मचरित्रातील काही भाग)
माझी दुकानदारी चालूच होती. मला दुकानावर कोणी भाजीची चोरी केलेली आवडायचं नाही. बऱ्याच गिऱ्हाइकांना चोरी करताना मी पकडायची. भाजी विकताना माझ्या दुकानावर कितीही गर्दी असली, तरी सगळीकडे माझं बारीक लक्ष असायचं. जर कोणी चोरी केली, तर मी त्याला खूप बडबड करायची. आजूबाजूच्या दुकानदारांनाही समजायचं, की हे गिऱ्हाईक चोरी करत होतं ते. चारचौघांत त्याचा पाणउतारा झाला, म्हणजे त्या गि-हाइकाची खोड मरून जायची. पुन्हा ते माझ्या दुकानावर फिरकत नसायचं. मी तर काही चांगल्या सोसायटीत राहणाऱ्या गिऱ्हाइकांनासुद्धा चोरी करताना पकडलं आहे. गरजेपोटी केलेली चोरी आणि सवय म्हणून केलेल्या चोरीत फरक असतो.

असाच एक प्रसंग माझ्या लक्षात आहे. एक बाई आमच्या दुकानावर भाजी घेत होती. बाई गरीब घरातली वाटत होती. तिच्याबरोबर दोन लहान मुलं होती. एका पोराच्या नाकाला शेंबूड आला होता आणि दुसऱ्या पोराच्या शर्टाच्या गुंड्या तुटल्या होत्या. बाई कुठंतरी घरकाम करत असावी. तिनं कांदा घेतला, पण शेजारीच असणाऱ्या पाटीतल्या दोन काकड्या गुपचूप तिनं तिच्या पिशवीत घातल्या. माझ्या चाणाक्ष नजरेनं ते ओळखलं होतं. तिचा कांदा घेऊन झाल्यावर मी तिला म्हटलं,

“अग, तुझी पिशवी दे. मी त्याच्यातच टाकते डायरेक्ट भाजी. “

पण तिनं काही मला पिशवी दिली नाही. मला माहीत होतं, तिनं काकडी चोरलेली आहे. तिचा हिशेब झाला होता. तिची सगळी भाजी घेऊन झाली होती. त्या वेळी माझा धाकटा मुलगा विशाल दुकानावर होता. मी त्याला म्हटलं,


“बाळा, दोन गाजरं धुऊन घे बादलीतून आणि दोन्ही पोरांच्या हातात दे.

गाजरं दिली, तशी पोरंही मटामटा खाऊ लागली. मी त्या बाईला म्हटलं,

“तुझ्या पिशवीतल्या दोन काकड्या गुपचूप काढून ठेव.”

तसं त्या बाईनं खजील होऊन त्या दोन काकड्या गुपचूप पिशवीतून काढून ठेवल्या आणि ती पटापटा निघून गेली. मी तिला काय बोलले आणि काय झालं, हे बाजूच्या गिन्हाइकांनाही कळलं नाही, पण विशालला मात्र सगळं कळलं होतं. तसं तो मला विचारायची घाई करू लागला होता, पण मी हातानं खूण करून त्याला आधीच शांत बसवलं होतं.

माझ्या दुकानावरची सगळी गिऱ्हाइकं गेल्यावर, मी विशालला म्हणाले,

“बोल रे बाळा, काय म्हणत होतास?” विशाल मला म्हणाला,

“काय ग आई, तू तर काहीच बोलली नाहीस तिला. दरवेळेस

तर किती बडबड करतेस. ‘

“अरे बाळा, तिनं चोरी केली ती तिच्या मुलांसाठी. गरीब होती बिचारी. तिच्या मुलांना काकडी खायला मिळावी म्हणून तिनं चोरली होती. “

“अग, मग काय तू फुकट देणार का त्यांना गाजरं ?”

“जाऊ दे रे. त्या दोन पोरांना दोन घास मिळतील आणि त्या गरीब माउलीचंही मन समाधानी होईल, म्हणून दिली दोन गाजरं. पोरंही किती खूश होऊन गेली होती, पाहिली नाही का तू?” “अग, मग तिच्याच पिशवीतली द्यायची होती ना काकडी काढून!”

“अरे बाळा, तिच्याच पिशवीतली कशी देऊ? ती काकडी तर चोरीची होती म्हणून घेतली काढून आणि काकडी कशी देऊ त्या दोन मुलांना? तू पाहिलं नाही का? एकाच्या नाकातून गंगामाई वाहत होती ते. अजून सर्दी नको व्हायला म्हणून गाजरं दिली. “

“सगळं ठीक, पण चोरी केली होती, तर तू बडबड का नाही केलीस? अशानं फुकट मिळतं म्हणून पुढच्या वेळेस ती पुन्हा चोरी करेल. “

“अरे बाळा, तिला चूक समजली तिची. तिच्या दोन मुलांसमोर त्यांच्या आईला बोलल्यावर तिला किती वाईट वाटलं असतं. स्वतःच्या मुलांच्या नजरेत कोणत्या आई-बापाला पडलेलं आवडेल? म्हणून नाही बोलले तिला काही. अरे, गरिबी वाईट असते. कोणी माझ्यासारखं जिद्दीनं लढतं, तर कोणी वाईट मार्गाला लागतं. कोणत्याही परिस्थितीत चोरी करणं वाईटच असतं. कधीच चोरी करू नये. पचत नाही बाळा, चोरीचं कधी. “

गरीब आई आणि मुलांना मी पाहिलं, की मला माझे जुने दिवस आठवायचे. अशा कितीतरी गरीब मुलांना मी काकडी, टोमॅटो द्यायची. गरीब गिऱ्हाईक दिसलं म्हणजे मी राहिलेली शिळी भाजीही द्यायची. मी गरिबी भोगली आहे. माझी मुलंही अशा प्रसंगांतूनच शिकत होती. इतर आईवडिलांसारखा मला माझ्या मुलांना जवळ घेऊन गोष्टी सांगायला वेळ मिळत नसायचा, जे काही शिकवता आलं, ते असं घडलेल्या प्रसंगांतून, पण काही झालं, तरी चोरी करू नये हे मी मुलांच्या मनावर बिंबवू शकले. माझ्या मुलांना दिलेली हीच संस्काराची शिदोरी आयुष्यभर पुरेल.

– शब्दांकन विशाल अंजना सर्जेराव शिंदे

See also  खंडकरी शेतकऱ्यांना भोगवटा वर्ग १ जमिनीसाठी अधिनियमात सुधारणा