पुणे : अपघातांचा शास्त्रीय अभ्यास, रस्ते अभियांत्रिकी, वाहतूकीचे अभ्यासपूर्ण नियोजन, वाहनचालकांचे प्रबोधन करण्यासोबत नियम मोडणाऱ्यांवर कारवाई आदी विविध उपाययोजनांद्वारे अपघात आणि त्यामुळे होणारे मृत्यू कमी करण्याचा प्रयत्न व्हावा, असे मत जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी व्यक्त केले.
शासकीय विश्रामगृह येथे युनेस्कोच्या सहकार्याने ‘पुणे जिल्ह्यात लहान मुले आणि किशोरवयिनांसाठी रस्ता सुरक्षा’ या विषयावर आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते. कार्यक्रमाला सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता बप्पा बहिर, युनेस्केचे प्रतिनिधी बालाजी वरकड, सेंटर फॉर एन्व्हायर्नमेंट एज्युकेशनच्या संस्कृती मेनन आदी उपस्थित होते.
डॉ.देशमुख म्हणाले, अपघातातील मृत्यूची संख्या कमी करणे महत्वाचे असून ती काळाजी गरज आहे. शहरीकरण, उत्तम रस्ते, अत्याधुनिक वाहनांची उपलब्धता अशा वातावरणात अपघातांची वाढती संख्या चिंतेचे कारण आहे. प्रभावशाली उपाययोजना करून अपघात थांबविण्यासाठी नागरिकांच्या प्रबोधनासोबत अपघातांचे शास्त्रीय विश्लेषण गरजेचे आहे. अपघातांची कारणे लक्षात घेऊन विविध यंत्रणांनी त्याचे एकत्रितपणे विश्लेषण केल्यास चांगले उपाय शोधता येतील. कार्यशाळेच्या माध्यमातून याबाबत चांगल्या सूचना याव्यात, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
पुण्यातील औद्योगिकरण आणि लोकसंख्या वाढत असतांना राज्यातील इतर शहरांच्या तुलनेत पुणे शहरातील अपघातातील जीवितहानी अधिक आहे. शहरीकरणाचा वाढता वेग लक्षात घेऊन याबाबत उपाययोजना निश्चित कराव्या लागतील. लहान मुलांना अपघातापासून वाचविण्यासाठी कार्यशाळेत विचारमंथन व्हावे, असेही डॉ.देशमुख म्हणाले.
श्री.बहीर यांनी कार्यशाळेच्या आयोजनामागची भूमिक स्पष्ट केली. पुणे जिल्ह्यात रस्ता सुरक्षा समितीच्या माध्यमातून अपघात कमी करण्याच्या उपाययोजना करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. सुरुवातीला युनेस्कोच्यावतीने सादरीकरणाद्वारे अपघातांची कारणे व सद्यस्थितीची माहिती देण्यात आली.
कार्यक्रमाला महानगरपालिका, पोलीस, पीएमपीएमएल, जिल्हा परिषद, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, एसटी महामंडळ, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय, शिक्षण विभाग, ससून हॉस्पिटल, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, राष्ट्रीय महामार्ग विभाग आदी विविध विभागांचे अधिकारी तसेच विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.