नेट,सेट,पी.एच.डी. पात्रता धारक प्राध्यापक संघटनेची दिवाळीनंतर होणाऱ्या आंदोलनासाठीची गुगल मीट ऍप वरील मीटिंग यशस्वी संपन्न.

पुणे : नेट,सेट,पी.एच.डी. पात्रता धारक प्राध्यापक संघटनेच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रभरातील सदस्यांची गुगलमीट नुकतीच घेण्यात आली. गुगल प्लॅटफॉर्म वरील या मीटिंग मध्ये महाराष्ट्रातल्या विविध जिल्ह्यातील अनेक नेट,सेट, पी.एच.डी.पात्रता धारक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उपस्थित प्राध्यापकांनी मिटिंगमध्ये आपली मते नोंदवत सक्रिय सहभाग नोंदवला.या मीटिंगमध्ये दिवाळीच्या सुट्टीनंतर केला जाणाऱ्या आंदोलनाची चर्चा करण्यात आली.आंदोलनाची दिशा काय असली पाहिजे ह्या विषयीचे धोरण ठरवण्यात आले. आंदोलनामध्ये कुठल्या कुठल्या विषयांचा अंतर्भाव असायला हवा यावरती समितीतील सदस्यांनी त्यांची भूमिका मांडली.मीटिंगमध्ये आयोजित केलेल्या खुल्या चर्चेमध्ये महाराष्ट्रभरातील वेगवेगळ्या जिल्ह्यातून सहभागी झालेल्या संघटनेच्या विविध सदस्यांनी काही निर्णायक सूचना केल्या.

याबाबत अधिक माहिती देताना संघटनेचे अध्यक्ष ,प्राध्यापक भास्कर घोडके म्हणाले की, संघटनेच्या वतीने दिवाळीच्या सुट्टीनंतर म्हणजेच लगेचच दिनांक 16 ऑक्टोबर रोजी पुणे येथील हायर एज्युकेशन डायरेक्टर ऑफिस येथे संघटनेच्या वतीने नेट,सेट, पी.एच.डी. पात्रता धारकांचे आंदोलन करण्याचा मानस आहे. या आंदोलनामध्ये प्राध्यापकांची शंभर टक्के भरती करण्याची मागणी, त्याचबरोबर तासिका तत्वावरील (सी.एच.बी.) धोरण हे कायमस्वरूपी बंद करून जोपर्यंत प्राध्यापकांची 100 टक्के भरती होत नाही तोपर्यंत, प्रत्येक महाविद्यालयात रिक्त असणाऱ्या जागेवर त्या विषय प्राध्यापकांची 11 महिण्यांसाठीची नियुक्ती केली जावी आणि या नियुक्तीवरील प्राध्यापकाला गोवा, गुजरात, राजस्थान आदी राज्यांच्या धर्तीवर महाराष्ट्र शासनाकडून प्रति महिना पन्नास हजार रुपये वेतन अदा करण्यात यावे तसेच, हा शिकवण्याचा अनुभव प्राध्यापकांच्या एकूण सेवेमध्ये गृहीत धरला जावा. प्राध्यापकांचे वेतन त्यांच्या खात्यामध्ये डायरेक्ट जमा करण्यात यावे आदी गोष्टी मांडल्या.
या मिटिंगमध्ये आणखीनही काही महत्वाच्या शैक्षणिक बाबींवर तसेच प्राध्यापकांच्या तासिका तत्वावरील नियुक्तीमुळे होणाऱ्या पिळवणूकी बाबत, तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांच्या महिनोन्महिने रखडणाऱ्या तुटपुंज्या पगाराबाबत चर्चा करण्यात आली. संघटनेच्या माध्यमातून विविध टप्प्यांवर हे प्रश्न सोडवले जातील अशी भूमिका संघटनेचे उपाध्यक्ष प्रा. डॉ. गोरक्षा डेरे यांनी मांडली तर संघटनेचे खजिनदार प्रा. डॉ. बाळासाहेब सोनवणे यांनी संघटनेच्या या आंदोलनास प्रत्येक जिल्हा-जिल्ह्यातून नेट,सेट, पी.एच.डी.पात्रता धारकांनी सहभागी व्हावे असे आवाहन केले.या मीटिंगमध्ये प्रा. डॉ.शिवाजी शेळके यांनी “आपण सर्वात महत्वपूर्ण म्हणजे शंभर टक्के प्राध्यापक भरती झालीच पाहिजे याविषयीची मुख्य भूमिका लावून धरायला हवी,”असे प्रतिपादन केले.

See also  अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राज्यातील नाट्यगृहे सुसज्ज करणार – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा निर्धार


प्रा.बाबूराव सावंत आणि प्रा.डॉ.रामनाथ फुटाणे यांनी देखील काही महत्त्वाच्या सूचना या निमित्ताने मांडल्या.या मिटींगच्या प्रास्ताविकातून प्रा. प्रवीण शिंदे यांनी हे आंदोलन सर्व पात्रताधारकांनी करणे का गरजेचे आहे याविषयी आपली भूमिका मांडली. या मीटिंगमध्ये प्रा. राहुल हूळवळे यांनी संघटनेच्या सोशियल मीडियाच्या विविध दिलेल्या जबाबरींविषयी ज्या पूर्तता आवश्यक आहेत त्याविषयी आपली मते मांडली.
संघटनेचे संघटक, प्रा.बालाजी मगर यांनी तासिका तत्वावरील धोरण बंद करण्यासाठी उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यासाठीची तयारी संघटनेकडून करण्यात येत असल्याची माहिती दिली. याप्रसंगी प्रा.गजानन आडे यांनी, संघटनेचे टेलिग्राम चॅनल सुरू झाले असून आपण सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने या ऍप वर जॉईन व्हा असे आवाहन केले.प्रा.डॉ.अस्मिता पाटील,डॉ.सुधाकर भालेराव,प्रा डॉ.शिवराम शिंदे, प्रा.डॉ. वैभव झाकडे यांनी महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये प्राध्यापकांचे कशाप्रकारे शोषण केले जाते या बाबींवर लक्षवेधी गोष्टी मांडल्या आणि संघटनेच्या माध्यमातून या गोष्टींना कसा आळा घालता येईल याविषयी चर्चा केली या मीटिंगची सांगता आणि आभार प्रदर्शन संघटनेचे उपाध्यक्ष प्रा.डॉ.गोरक्षा डेरे यांनी केले.
आंदोलनाच्या कायदेशीर बाबींची पूर्तता करण्यासाठी आणि संघटनेच्या प्रत्यक्ष कृती कार्यक्रम हाती घेण्यापूर्वी राहिलेल्या गोष्टींचा आढावा घेण्यासाठी संघटनेच्या वतीने पुन्हा दोन दिवसात आढावा मीटिंग घेण्यात येईल असे संघटनेचे अध्यक्ष प्रा.भास्कर घोडके यांनी सांगितलं.
एकूणच संघटनेच्या वतीने केल्या जाणाऱ्या आंदोलनाची दिशा ठरवणारी ही मीटिंग निर्णायक ठरली असे संघटनेचे प्रसिध्दी प्रमुख प्रा.गजानन आडे यांनी सांगितले.