प्रा. भास्कर घोडके : गरीबाचा मुलगा एक वेळ आय.ए. एस. होऊ शकतो पण प्राध्यापक नाही अशीच काहीशी परिस्थिती आज उच्च महाविद्यालयांमध्ये प्राध्यापक होऊ इच्छिणाऱ्या हजारो नेट-सेट,पी.एचडी. पात्रता धारकांवर आलेली दिसून येत आहे. हजारो पात्रताधारक क्लास वन मध्ये गणल्या जाणाऱ्या पदासाठीची परीक्षा पास होऊन आज प्राध्यापक बनण्याच्या प्रतीक्षेत आहेत.
यातील अनेक जणांनी आपल्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा आणि उमेदीचा काळ संघर्ष करण्यामध्ये विनाअनुदानित तत्त्वावरील महाविद्यालयांमध्ये नोकरी करत खर्ची घातला आहे. काही वर्षांपूर्वी लेखी वर्णनात्मक परीक्षा पद्धती असताना शेकडो, हजारो तास अभ्यास करून मोठ्या कष्टाने मिळवलेली नेट सेटची पात्रता आज वस्तुनिष्ठ पर्यायी पद्धतीमुळे कवडीमोल ठरत आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून घेतल्या जाणाऱ्या लेखी सेट परीक्षेचा निकाल कधीकाळी एक टक्क्यांच्या आत लागत असायचा, आता तो एकूण परीक्षार्थींच्या संख्येच्या त्यांच्या कॅटेगरीनुसार विषयातील उच्चतम मार्क्स ग्रहण करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मेरिटनुसार सहा टक्के एवढा लागत असल्यामुळे नेट – सेट पास होणाऱ्यांचे प्रमाण भरपूर वाढले आहे. त्यातच दुसऱ्या बाजूला शिक्षणातील घोडेबाजाराला ऊत आल्यामुळे ह्या सहा टक्के पास होणाऱ्या उमेदवारांमध्ये थोड्याफार फरकाने त्यातील एक टक्का वर्ग असा आहे की ते हवी तेवढी रक्कम मोजून नोकरी मिळवण्यासाठी तयार आहेत. ऐकिवात आल्यानुसार 25 लाखावरचा हा रेट आता 50 ते 60 लाखांवर गेलाचं तर काही ठिकाणी एक कोटी पर्यंत लोक देण्यासाठी तयार असल्याचं समजतंय. आज प्रत्येक विषयाच्या एका जागेसाठी किमान 50 उमेदवार मुलाखतीसाठी येतात. या 50 उमेदवारांमध्ये पाच ते दहा उमेदवार असे असतात की जे आर्थिक ताकदीसह मुलाखतीसाठी तयार असतात. बऱ्याच वेळा याच्यामध्ये पुन्हा ज्याचा वशिला व शैक्षणिक दृष्ट्या उजव्या असणाऱ्या अशाच उमेदवाराची निवड होताना दिसून येते. काही ठिकाणी तर पुन्हा त्यामध्ये घोडा बाजार असतोच. जो जास्त देतो त्याचे काम झाल्यात जमा असते.बऱ्याच वेळा ज्या उमेदवारांकडे पुरेशा जमिनी आहेत ते त्यांच्याकडच्या दोन-तीन एकर जमिनी सहज विकून पैसा उभा करतात.आलेले पैसे संस्थाचालकांच्या घशात घालतात आणि नोकरी मिळवतात .अशा पद्धतीने कामावर रुजू झालेले प्राध्यापक पुन्हा कर्तव्याला जागतीलच असे नाही. “मी पैसे भरून जॉईन झालेला आहे त्यामुळे मी का शिकवावे ?” ह्या आविर्भावात ते फक्त दिवसातील तास भरवत महिना संपण्याची वाट पाहत महाविद्यालयात हजर असतात. त्यामुळे अशा प्राध्यापकांना संस्थाचालक ही काही बोलत नाहीत आणि हे प्राध्यापक छान पैकी आपला तोरा सीएचबी वर काम करणाऱ्या अथवा तासिका तत्त्वावर काम करणाऱ्या लोकांवर मिरवून ह्या लोकांकडून कामे करून घेत असतात.
महाराष्ट्रामध्ये काही दशकांपूर्वी काही शिक्षण महर्षींनी खेड्यापाड्यातील गरीब मुलांना शिक्षण मिळावे म्हणून शिक्षण संस्थांची स्थापना केली.त्या शिक्षण संस्थांना या महर्षींनी महाराष्ट्रातील समाजसुधारकांची नावे दिली परंतु आज दुर्दैवाने ह्या शिक्षण संस्था काही धोरणी आणि धुर्त मंडळींनी ताब्यात घेतल्या असून, त्यांनी त्यामध्ये आर्थिक व्यवहार करायला सुरुवात केली आहे. ज्यांनी शिक्षण संस्था सुरू केल्या त्यांनी आपला संसार वाऱ्यावर सोडला. बायका पोरांच्या अंगावरील दाग दागिने विकले आणि गरिबांची पोरं शिकवली. आज परिस्थिती मात्र उलट झाली आहे .ज्यांनी गरिबांची पोरं शिकवण्यासाठी स्वतःचे खिसे खाली केले .त्यांच्या शिक्षण संस्थांवर कब्जा केलेले वारसदार आज लोकांचे खिसे कापत आहेत. लोककल्याण्याचा, लोकशिक्षणाचा वसा घेतलेले शिक्षण महर्षी कुठे आणि त्यांच्या नावाचा उल्लेख करून स्वतःच्या तुंबड्या भरणारे शिक्षण सम्राट कुठे?
अशा या शिक्षण सम्राटांच्या साम्राज्यामध्ये पुरता शोषित झालेला वर्ग म्हणजे सीएचबी चा प्राध्यापक. ज्याला स्वतःचा चेहरा नाही .ज्याला एक वेळचा पगार नाही. ज्याला स्वतःचा आवाज नाही. ज्याला स्वतःचा अस्तित्व नाही. ज्याला स्वतःचा विचार नाही. ज्याला स्वतःची वेळ नाही. संस्थाचालकांच्या इशारावर नाचणं, त्यांना हवा तेवढा वेळ देणं, त्यांच्या शिक्षण संस्थांची भरभराट करण्यासाठी स्वतःला शिजवणं, निवडणुका आल्या की लोकांच्या घरोघरी जाऊन प्रचार करणं अशी सर्व काम हा सीएचबी चा प्राध्यापक न कुरकुरता करत असतो. विरोधाभास असा आहे की, हा सीएचबीचा प्राध्यापक ज्या महाविद्यालयामध्ये शिकवतो त्याच महाविद्यालयातील गेटच्या वॉचमनच वर्षाचा पगार आणि ह्या सीएचबीवाल्या प्राध्यापकाचा पगार यांची तुलना केली तर गेटवरचा वॉचमन याच्यापेक्षा भारी ठरतो, यापेक्षा मोठी शोकांतिका काय असावी?शासनाच्या, विद्यापीठाच्या, शिक्षण संचालक कार्यालयाच्या विविध धोरणामुळे हा सीएचबीवाला प्राध्यापकाचा पगार वेळेवर देखील होत नाही. वर्षाच्या पहिल्या सत्रामध्ये दरवर्षी या सीएचबीवाल्या प्राध्यापकाचे दिवाळं निघत, तर कायमस्वरूपी प्राध्यापकांची दिवाळी साजरी होत असते .मागील तीन वर्षांमध्ये महाराष्ट्रातील अनेक विद्यापीठांशी संलग्न असणाऱ्या महाविद्यालयातील सीएचबी प्राध्यापकांचा पगार चार ते पाच महिन्यानंतर काढण्यात आलेला आहे. जगायचं कसं हा मोठा प्रश्न घेऊन ही लोक तारेवरची कसरत करताना दिसत आहेत.ज्याला ही कसरत जमते ते तग धरून आहेत, ज्यांच्या ही हाताबाहेर गेली त्यांनी व्यवस्थेला कंटाळून जगाचा निरोप घेतला. थोडक्यात, उच्चशिक्षितांच्या वेठबिगारीच उत्तम उदाहरण म्हणजे आजचा सीएचबीवाला प्राध्यापक. एकीकडे सीएचबीवाल्या अभ्यासू प्राध्यापकांचे व्यवस्थेने दिवाळ काढलं असलं तरी हे महाराष्ट्राच्या शैक्षणिक व्यवस्थेचा दिवाळ निघणार नाही यासाठी जाणकारांनी, शिक्षण तज्ञांनी, शिक्षण सम्राटांनी, आजच्या स्वयंघोषित शिक्षण महर्षींनी वेळीच जागं होऊन धोरणात्मक पावलं उचलणं गरजेचं आहे आणि म्हणूनच सध्याच्या परिस्थितीचा विचार करता येणाऱ्या काळामध्ये गरिबांची मुलं यूपीएससी सारख्या जगात अवघडात अवघड समजल्या जाणाऱ्या परीक्षेतून एक वेळ आयएएस होऊ शकतील पण धूर्तांच्या हातात सापडलेल्या शिक्षण संस्थांमध्ये प्राध्यापक होणं त्यांच्या आवाक्या पलीकडे गेलं आहे .त्यांच्या आर्थिक क्षमतांपलीकडे गेलं आहे.हेच आजचं वास्तव आहे.
प्रा.भास्कर घोडके,
M.A.,M.Phil,SET,DTD,DJC,PGSEB.
पी.एचडी. संशोधक,पुणे.