विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून महानगरपालिकेद्वारे विविध योजनांचा लाभ

पुणे – केंद्र शासन पुरस्कृत योजना तळागळातील लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात विकसित भारत संकल्प यात्रेचे २८ नोव्हेंबर २०२३ ते २६ जानेवारी २०२४ या कालावधीत आयोजन करण्यात आले असून नागरिकांना पीएम-स्वनिधी योजना, प्रधानमंत्री आयुष्यमान योजना कार्ड, आरोग्य तापसणी, आधार अपडेट, प्रधानमंत्री उज्वला गॅस योजना आदी विविध योजनांचा लाभ देण्यात येत आहे.

विविध योजनांच्या लाभासाठी पात्र असलेल्या नागरिकांपर्यंत योजना पोहोचविण्यासाठी केंद्र शासनाकडून फिरता चित्ररथ उपलब्ध करून देण्यात आला आहे. या रथाच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजनांची माहिती चित्रफिती आणि हस्तपत्रकांच्या माध्यमातून देण्यात येत आहे. नागरिकांशी संवाद साधून लाभार्थ्यांची नोंदणीदेखील करून घेण्यात येत आहे. ही यात्रा पुणे शहरातील १२५ तर पिंपरी चिंचवड शहरातील ६७ ठिकाणी फिरणार आहे.

आतापर्यंत पुणे शहरातील २० ठिकाणी यात्रेचे आयोजन करण्यात आले असून सुमारे ४८ हजार नागरिकांना माहिती देण्यात आली आहे. ६ हजार ९०० पेक्षा अधिक नागरिकांना विविध योजनांचा प्रत्यक्ष लाभ देण्यात आला आहे. पिंपरी चिंचवड शहरातील २० ठिकाणी यात्रेचे आयोजन करण्यात आले असून सुमारे ७ हजार ५०० नागरिकांना माहिती देण्यात आली आहे. ४ हजार ५०० पेक्षा अधिक नागरिकांना विविध योजनांचा प्रत्यक्ष लाभ देण्यात आला आहे.

शनिवार ९ डिसेंबर रोजी शासनाच्या विविध योजनांची माहिती देणारा रथ पुणे शहरातील ओम सुपर मार्केट येथे सकाळी १० वाजता आणि खराडी परिसरात दुपारी २ वाजता, रविवार १० डिसेंबर रोजी बारामती होस्टेल परिसरात सकाळी १० वाजता आणि परिहार चौक औंध येथे दुपारी २ वाजता,११ डिसेंबर रोजी पांडव नगर परिसरात सकाळी १० वाजता आणि पुणे विद्यापीठ परिसरात दुपारी २ वाजता येणार आहे.

पिंपरी चिंचवड शहरात यात्रा शनिवार ९ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर चौक,पिंपरी येथील मैदान तर दुपारी ३ वाजता नेहरुनगर, प्राथमिक शाळा या ठिकाणी येणार आहे. रविवार १० डिसेंबर रोजी पुनावळे येथील समाजमंदीर परिसर येथे सकाळी १० वाजता तर दुपारी ३ वाजता भूमकर शाळेजवळ यात्रा येणार आहे. सोमवार ११ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता कावेरीनगर मार्केट येथे तर दुपारी ३ वाजता पिंपळे निलख येथील शाळेत यात्रा येणार आहे.

नागरिकांनी विविध योजनांची माहिती जाणून घ्यावी आणि त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन महानगरपालिका आणि जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

See also  पुणे विभागातील जिल्हा वार्षिक योजनांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्यस्तरीय बैठकीत आढावा