पुणे : मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र पात्र व्यक्तींना देण्याबाबतची कार्यपद्धती विहीत करण्यासाठी गठित केलेल्या समितीची बैठक विभागीय आयुक्त कार्यालयात झाली. ‘मराठा कुणबी, कुणबी मराठा’ या जात नोंदींचे सबळ पुरावे ठरणारी कागदपत्रे, पुरावे निश्चित करण्यासंदर्भात या कामकाजात सविस्तर चर्चा झाली.
समितीचे अध्यक्ष न्यायमूर्ती संदीप शिंदे (निवृत्त), विभागीय आयुक्त सौरभ राव, उपायुक्त वर्षा लड्डा, विभागातील सर्व जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, वरिष्ठ पोलीस अधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी, जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, महापालिका आणि पुरातत्व विभागाचे अधिकारी आदी उपस्थित होते.
बैठकीच्या प्रारंभी समितीचे अध्यक्ष व सदस्यांचे स्वागत करण्यात आले. विभागीय आयुक्त श्री. राव यांनी विभागात आतापर्यंत केलेल्या कागदपत्रांच्या तपासणीची माहिती सादर केली. त्यानंतर विभागातील पाचही जिल्हाधिकाऱ्यांनी सादरीकरणाद्वारे केलेल्या कार्यवाहीची माहिती सादर केली. न्या.शिंदे यांनी विभागात झालेल्या कामकाजाबद्दल समाधान व्यक्त केले.