कोणाची तरी तक्रार हवी तरच काम.. पुणे मनपा अधिकारी कर्मचारी मानसिकता बदलण्याची गरज..

पुणे : पुणे महानगरपालिकेमध्ये माजी नगरसेवक अथवा आमदारांनी सांगितल्याशिवाय अधिकारी काम करत नसल्याचे अनुभव सध्या पुणे महानगरपालिकेचा कर भरत असलेल्या अनेक नागरिकांना येत आहे. नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी कोणाची तरी तक्रार हवी तरच काम करण्याची अनेक अधिकाऱ्यांची मानसिकता झाली आहे. यामुळे रस्त्यांमध्ये खड्डे पडलेले दिसत असताना देखील पालिका अधिकारी त्यावर कारवाई करत नाहीत. कारण याची कोणीच तक्रार केलेली नाही. रस्त्यांवरती दिसत असलेल्या समस्या सोडवण्यासाठी स्वतःहून पालिकेने प्रयत्न करण्याची आवश्यकता व्यक्त केली जात आहे.

सध्या पुणे महानगरपालिकेमध्ये प्रशासक नियुक्त करण्यात आले आहेत.‌ पुणे महानगरपालिकेच्या विविध विभागांमध्ये नागरिकांनी समस्या सोडवण्यासाठी मागणी केल्यास, फोन केल्यास समस्या प्राधान्याने सोडवली जात नाही. तीच समस्या आमदार अथवा माजी नगरसेवक यांच्या कार्यालयातून मांडली असता अधिकारी तत्परतेने जागेवर कर्मचाऱ्यांसह पोहचतात. ड्रेनेज, कचरा, पाणी, रस्त्यातील खड्डे, बंद पडलेले विद्युत दिवे आदी प्रश्नांसाठी देखील प्रशासनाला शिफारशीची गरज लागत असल्याचे पाहायला मिळत आहे.

यामुळे मनपा अधिकारी व कर्मचारी हे राजकीय नेत्यांच्या सांगण्यावर काम करत आहेत का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. नागरिकांनी मांडलेल्या प्रश्नाकडे गांभीर्याने न पाहण्याची निर्माण झालेली वृत्ती बदलण्याची आवश्यकता असून पुणे मनपा आयुक्तांनी याबाबत योग्य उपाय योजना कराव्यात अशी मागणी केली जात आहे.

सुसगाव, म्हाळुंगे या नव्याने समाविष्ट झालेल्या गावांमध्ये हा अनुभव नागरिकांना सातत्याने घ्यावा लागत आहे. बाणेर बालेवाडी परिसरामध्ये नागरिकांनी सांगितलेली कामे होत नाहीत अथवा फक्त पाहणी करून बगल दिली जाते. नागरिकांच्या प्रश्नांसाठी तत्परतेने कामे करण्यात यावीत अशी मागणी केली जात आहे.

See also  पुण्यात मनोज जरांगे पाटील यांची रेकॉर्ड तोड रॅली