आयुर्वेद जगभर पोहोचण्यासाठी प्रयत्न गरजेचे, दुर्धर रोगांना बरे करण्याचे सामर्थ्य आयुर्वेदात – सुनील देवधर यांचे प्रतिपादन

पुणे :- भारतीय योग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अथक परिश्रम करून जागतिक पातळीवर पोहोचवला. आयुर्वेद हे शाश्वत भारतीय शास्त्र असून दुर्धर आजारांना बरे करण्याचे सामर्थ्य यात आहे. हा आयुर्वेद जगभरात पोहोचवण्यासाठी पंतप्रधानांचे प्रयत्न सुरू असून त्याला नक्की यश मिळेल असा विश्वास भारतीय जनता पक्षाचे माजी राष्ट्रीय सचिव सुनील देवधर यांनी व्यक्त केला.

वैद्य योगेश बेंडाळे यांनी यशस्वी उपचार केलेल्या, 50 कर्करोग व इतर दुर्धर आजाराच्या रुग्णांच्या आयुष्यात आयुर्वेदाच्या मदतीने आमुलाग्र बदल झालेल्या रुग्णांची मनोगते असलेल्या “hope, care & healing” या पुस्तकाचं प्रकाशन देवधर व डॉ शेखर मांडे यांच्या हस्ते पुण्यात झालं त्यावेळी सुनील देवधर बोलत होते. कौन्सिल ऑफ सायंटिफिक इंडस्ट्रियल रिसर्च अर्थात CSIR चे माजी संचालक डॉ. शेखर मांडे प्रमुख पाहुणे म्हणून व्यासपीठावर उपस्थित होते. कर्करुग्ण, त्याचे कुटुंबीय, नातेवाईक, समाजाचा या रुग्णांकडे पाहण्याचा दृष्टिकोन अशा विविध पैलूंचा आढावा घेणाऱ्या ज्यामध्ये मराठी चित्रपटातील कलाकारांनी भुमिका केलेल्या व कर्करोगावर जागृती करणाऱ्या एका लघुपटाचे प्रदर्शन आणि सादरीकरण यावेळी करण्यात आलं. त्याचे दिग्दर्शन शारवी गिरीष कुलकर्णी यांनी केले आहे.

देवधर म्हणाले, आयुर्वेदासारखा अनमोल ठेवा भारताकडे आहे. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर यासाठी स्वतंत्र मंत्रालयाची स्थापना करण्यात आली. त्या माध्यमातून आयुर्वेदाला जागतिक पातळीवर नेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या आयुर्वेदामध्ये संशोधन करून त्याला आधुनिकतेची जोड देण्याचं काम वैद्य योगेश बेंडाळे यांनी केलं आहे. त्यांनी संशोधित केलेल्या 40 पेक्षा जास्त औषधांना आंतरराष्ट्रीय पेटंट मिळाली आहेत ही नक्कीच अभिमानाची गोष्ट आहे.

डॉ. शेखर मांडे म्हणाले, आयुर्वेदाबाबत जनजागृतीसाठी लघुपटाची निर्मिती करणे हा एक अभिनव उपक्रम असून या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांपर्यंत आयुर्वेदाचे महत्त्व पोहोचण्यास मदत होईल. अशा स्वरूपाच्या लघुपटांची जास्तीत जास्त निर्मिती होऊन आयुर्वेदाबाबत जागरूकता वाढवण्याची गरज आहे.

वैद्य योगेश बेंडाळे म्हणाले, आधुनिक औषधांनी आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाने बरे न होणाऱ्या रुग्णांवरही आयुर्वेदाने यशस्वी उपचार होतो याची अनेक उदाहरणं पाहायला मिळतील. आयुर्वेदाला जागतिक स्तरावर मान्यता मिळवून देण्यासाठी सर्व आयुर्वेद तज्ञांनी आणि वैद्यांनी एकत्र येण्याची गरज आहे. आयुर्वेदाबद्दल लोकांच्या मनात अनेक गैरसमज असून ते दूर करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करायला हवेत.

See also  महासंस्कृती महोत्सवामुळे स्थानिक कलावंतांना हक्काचे व्यासपीठ मिळेल – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने झाली. वैद्य. विनिता बेंडाळे यांनी प्रास्ताविक केले. वैद्य ईशानी बेंडाळे आणि रमा बेंडाळे यांनी सूत्रसंचालन केले.