पालकांनी मुलांवर अपेक्षांचे ओझे लादू नये – मेधा कुलकर्णी

पुणे :- मुलांचे मानसिक स्वास्थ्य चांगले राहावे, त्यांच्यात न्यूनगंड निर्माण होऊ नये यासाठी पालकांनी मुलांमधील विशेष प्रावीण्य ओळखून त्याला प्रोत्साहित करावे. मुलांना काय आवडते त्यानुसार त्यांचा विकास होऊ द्या. स्व. लता मंगेशकर यांना गणित सोडवायला सांगितले असते किंवा सचिन तेंडुलकर यांना विज्ञानाचा अभ्यासात कच्चा आहेस असे जर पालकांनी सांगितले असते तर आज आपल्याला कदाचित भारतातील ही दोन रत्ने मिळाली नसती. असे प्रतिपादन माजी आमदार व उपाध्यक्ष राष्ट्रीय महिला मोर्चा मेधा कुलकर्णी यांनी केले.

शालेय विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धात्मक, गुणात्मक, नावीन्यपूर्ण विचार वाढ आणि महापालिका शाळांची गुणवत्ता वाढ यासाठी श्री भैरवनाथ शिक्षण संस्थेच्या वतीने औंध मधील पं. भीमसेन जोशी सभागृह येथे आनंदोत्सव (कार्निवल) साजरा करण्यात आला. यावेळी त्या विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन करत होत्या.

कार्निवल वेळी संस्थेचे संस्थापक शिवलाल धोंडीबा धनकुडे, माजी आमदार व उपाध्यक्ष राष्ट्रीय महिला मोर्चा मेधा कुलकर्णी, पुणे ग्रामीणचे अतिरिक्त पोलीस आयुक्त मितेश गट्टे साहेब, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक बोर्डाचे सचिव अनुराधा ओक, पिंपरी चिंचवड उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अतुल अडे साहेब, कार्यकारी अभियंता श्री अंकुर कावळे साहेब, पीएसआय स्पेशल क्राईम ब्रांच शरद शिंदे, अध्यक्ष सुरेखा शिवलाल धनकुडे, कार्यकारी अधिकारी सुषमा भोसले, सचिव विराज शिवलाल धनकुडे, खजिनदार राहुल शिवलाल धनकुडे, मुख्याध्यापक रेखा काळ, बाणेर ब्रांचे यादव, सुस ब्रांच माधुरी शेवाळे व ॲड. संकेत बुंदिले उपस्थित होते.

आपली मुले उत्कृष्ट नागरिक झाले पाहिजेत याकडे पालकांनी लक्ष दिले पाहिजे, त्यांच्यामध्ये नितीमुल्यांचा विकास झाला पाहिजे. घर आणि शाळेतून त्यांना उत्तम शिस्त लागू द्या. छोट्या चुकांमधून मोठ्या चुका घडण्याची भीती असते.छोटे छोटे नियम पालकांनी देखील पाळले पाहिजेत.गुन्हेगारी मुक्त समाज घडवण्यासाठी आतापासून या गोष्टींचे पालकांनी पालन करावे असे आवाहन कुलकर्णी यांनी यावेळी केले.

See also  खेळाडूंची आंतरराष्ट्रीय स्तरावर कामगिरी उंचावण्यासाठी ‘मिशन लक्ष्यवेध’ राबवणार-क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे

स्पर्धेत एखाद्या मिळालेल्या यशाने हुरळून न जाता यशाची आस विद्यार्थ्यांच्या मनात कायम राहिली पाहिजे. यशाच्या भुतकाळ रमण्यापेक्षा यशाची तृष्णा जिवंत ठेवणारे विद्यार्थी आपल्याला घडवायचे आहेत.परीक्षेतील यश फक्त गुणांपुरते मर्यादित आहेत पण आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल तर पुस्तकाबाहेरील जग खूप मोठे आहे. समर्थपणे तग धरून राहणारे विद्यार्थी आपल्या तयार करणे ही आपली जबाबदारी आहे. विविध उपक्रमांच्या माध्यमातून श्री भैरवनाथ शिक्षण संस्थेचे विद्यार्थी समाजात यशस्वी होत आहेत याचे निश्चित कौतुक आहे. यापुढेही त्यांचा हा यशाचा प्रवास कायम राहावा अशा सदिच्छा यावेळी पुणे ग्रामीणचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक मितेश गट्टे यांनी व्यक्त केला.

नर्सरी ते नववीपर्यंतच्या विद्यार्थ्यांमध्ये या उपक्रमांतर्गत संस्थेच्या विविध शाळांमध्ये विविध कार्यक्रम झाले असून यामध्ये आंतरशालेय स्पर्धा, गेम्स झोन, सांस्कृतिक कार्यक्रम, प्रश्नमंजूषा, ट्रेझर हंट आदी उपक्रम झाले. त्याचे बक्षीस वितरण यावेळी पार पडले.