पंढरपूर येथील धर्म शाळेसाठी श्री भैरवनाथ देवस्थान ट्रस्ट बाणेरच्या वतीने तीन लाख रुपयांची मदत

बाणेर: श्री भैरवनाथ देवस्थान ट्रस्टच्या वतीने भागवत एकादशी निमित्त श्री भैरवनाथ देवस्थान ट्रस्टच्या कार्यालयात श्री संत सेवा हवेली मुळशी (पुणे) धर्मशाळा ट्रस्ट या संस्थेस श्री भैरवनाथ देवस्थान ट्रस्टच्या वतीने रू.३,००,०००/- (तीन लाख) श्री क्षेत्र पंढरपूर येथील धर्मशाळा बांधकामासाठी मदत म्हणून देण्यात आले.

सदर तीन लाख रुपयांचा चेक श्री संत सेवा धर्मशाळा ट्रस्टचे पदाधिकारी यांना श्री भैरवनाथ देवस्थान ट्रस्टच्या पदाधिकारी, विश्वस्त व मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला. या प्रसंगी ट्रस्टचे उपाध्यक्ष श्री ज्ञानेश्वर तापकीर, सचिव श्री दिलीप मुरकुटे पाटील, खजिनदार श्री लक्ष्मण सायकर, विश्वस्त श्री गणेश कळमकर, सल्लागार श्री बबनराव चाकणकर, सभासद श्री बन्सी आण्णा मुरकुटे, श्री प्रवीण शिंदे व इतर मान्यवर उपस्थित होते. श्री संत सेवा धर्मशाळा ट्रस्टच्या वतीने श्री पांडुरंग उर्फ शशिकांत पारखे, श्री राहुल अर्जुन सायकर,श्री गणपत उर्फ बन्सी आण्णा मुरकुटे, श्री आप्पा भुमकर, श्री मारुती वाडकर, श्री कुंडलिक चाकणकर, श्री तुकाराम ताम्हाणे, श्री बाळासाहेब पारखे, श्री सोपान कुदळे, श्री सहदेव हरिहर व इतर मान्यवर उपस्थित होते.
मुळशी तालुक्यातील कोळावडे गावचे माजी सरपंच श्री दत्ताभाऊ शकंरराव उभे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. त्यांच्या शुभहस्ते सदर तीन लाख रुपयांचा चेक प्रदान करण्यात आला. यावेळी त्यांनी पंढरपूर येथे होणाऱ्या धर्मशाळेच्या दरवाजासाठी सांगवान लाकडाची मोफत मदत जाहीर केली. त्यासाठी उत्तम गुणवत्तेचे लाकूड पाठवण्यात येईल असे त्यांनी सांगितले.
यावेळी ट्रस्टचे उपाध्यक्ष श्री ज्ञानेश्वर तापकीर यांनी श्री भैरवनाथ देवस्थान ट्रस्ट तर्फे वेळोवेळी विविध सामजिक व धार्मिक कार्यासाठी केलेल्या मदतींचा आढावा दिला. सन २०१६ साली महाराष्ट्रात दुष्काळ पडला होता त्यावेळी ट्रस्टने सात लाख रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीस दिले. तसेच २०१९ साली पश्चिम महाराष्ट्रात ओला दुष्काळ पडला होता, त्याचे मोठ्या प्रमाणावर गरीब जनतेला नुकसान झाले. त्या संकटकाळी श्री भैरवनाथ देवस्थान ट्रस्टच्या वतीने पंधरा लाख रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये देणगी स्वरुपात देण्यात आले होते. जगतगुरु संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांच्या भंडारा डोंगर येथील भव्यदिव्य मंदिर बांधकामासाठी श्री भैरवनाथ देवस्थान ट्रस्टच्या वतीने अकरा लाख रुपयांचा धनादेश श्री विठ्ठल रखुमाई तुकाराम महाराज भंडारा डोंगर ट्रस्ट यांना देणगी स्वरुपात देण्यात आला असे उपाध्यक्ष श्री ज्ञानेश्वर तापकीर यांनी सांगून पंढरपूर येथील प्रस्तावित धर्मशाळेचे बाणेरसह इतर सर्व ठिकाणाहून येणाऱ्या भाविकांना मदत होईल अशी आशा व्यक्त केली.

See also  एसआरएच्या खाजगी विकासाच्या फायद्यासाठी बालभारती रस्ता बनवण्याचा प्रयत्न - कोथरूड मधील नागरिकांचा आरोप


विश्वस्त श्री गणेश कळमकर यांनी श्री भैरवनाथ देवस्थान जिर्णोध्दाराबाबत सर्वांना माहिती देऊन प्रत्येक वेळी आपले ट्रस्ट हे ग्रामस्थांच्या मदतीसाठी नेहमी पुढे आले आहे असे अधोरेखित केले. त्यांनी पंढरपूर येथील धर्मशाळेमध्ये बाणेरचे ग्रामदैवत श्री भैरवनाथाचा नावासह एक फोटो असावा अशी विनंती केली. ट्रस्टचे सचिव श्री दिलीप मुरकुटे पाटील यांनी श्री भैरवनाथ देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून आयोजित करण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व धार्मिक उपक्रमांची माहिती दिली व उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाचा समारोप केला.