सामान्य माणसाला उत्तम आरोग्यसेवा देण्यासाठी आरोग्य शिबीर उपयुक्त- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे : आज विविध क्षेत्रात प्रगती होत असताना नागरिकांना आरोग्याच्या विविध समस्या भेडसावत असून दुर्धर रोगांवरील उपचार परवडणारा नसतो. अशावेळी सर्वसामान्यांना विनामूल्य उपचार उपलब्ध करून देणारे ‘अटल विनामूल्य महाआरोग्य’ शिबिराचे आयोजन उपयुक्त आहे, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

महाराष्ट्र शासन, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, प्रतिभा महिला प्रतिष्ठान, चंद्ररंग चॅरीटेबल ट्रस्ट आणि अटल चॅरिटेबल फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने नवी सांगवी येथील पी.डब्ल्यु.डी. मैदान येथे आयोजित अटल विनामूल्य महाआरोग्य शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

कार्यक्रमाला आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत, आमदार उमा खापरे, महेश लांडगे, अश्विनी जगताप, भीमराव तापकीर, पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंह, शिबिराचे आयोजक शंकर जगताप, माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, माजी खासदार अमर साबळे, माजी महापौर उषा ढोरे, पद्मश्री गिरीष प्रभुणे, जिल्हा नियोजन समिती सदस्य आप्पासाहेब रेणुसे आदी उपस्थित होते.

महाराष्ट्र शासन नागरिकांना चांगली आरोग्यसेवा देण्यासाठी प्रयत्नशील आहे असे सांगून उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले, राज्यातील प्रत्येक व्यक्तीला महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत मोफत उपचाराची व्याप्ती ५ लाखापर्यंत वाढविण्यात आली आहे. तसेच लवकरच आणखी १ हजार ९०० रुग्णालयांचा या योजनेत समावेश करण्यात येत आहे.

राज्य शासन सामान्यांसाठी काम करीत असल्याचे नमूद करून उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, आपले स्वप्न रामराज्याचे आहे जिथे समाजातील शोषित, पीडित, वंचितांच्या प्रश्नाकडे लक्ष दिले जाते. शिवाजी महाराजांचे रयतेचे राज्य होते, त्याप्रमाणे राज्य निर्माण करायचे आहे. सामान्यांना सोबत घेऊन समाजासाठी काम करण्याचे काम लोकनेता करत असतो. लक्ष्मण जगताप असे लोकनेते होते, असेही ते म्हणाले.

स्व. लक्ष्मण जगताप सातत्याने महाआरोग्य शिबीर आयोजित करून रुग्णसेवा करायचे असे सांगून ते पुढे म्हणाले, या शिबिरासाठी दीड लाख नागरिकांची नोंदणी पाहिल्यावर शिबिराचे महत्व लक्षात येते. लक्ष्मण जगताप यांनी सामान्य जनतेसाठी संघर्ष केला. ते सामान्य माणसाच्या लहान गरजा ओळखणारे आणि विकासयोजना राबविणारे होते. त्यांचा वारसा सक्षमपणे चालविण्यासाठी त्यांचे कुटुंबिय प्रयत्न करीत आहेत. स्व. लक्ष्मण जगताप यांच्या कार्याला अनुरूप हे कार्य आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्र्यांनी उपक्रमाचे कौतुक केले. लक्ष्मणभाऊंनी सुरू केलेले जनहिताचे कार्य सगळे मिळून पुढे नेऊ, अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

यावेळी आमदार श्रीमती जगताप, शंकर जगताप यांनीही विचार व्यक्त केले. आरोग्य शिबिरात १५० हून अधिक रुग्णालयांनी सहभाग नोंदविला असून २ हजारहून अधिक डॉक्टर्स सेवा देत आहेत. दीड लाख ऑनलाईन आणि ३७ हजार नागरिकांची ऑफलाईन नोंदणी झाली आहे. पहिल्याच दिवशी ६६ हजार नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे. स्व. लक्ष्मण जगताप यांनी ९ वर्षापूर्वी हा उपक्रम सुरू केला होता. गतवर्षी २ लाख ४७ हजार नागरिकांनी याचा लाभ घेतला, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

तत्पूर्वी उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी दिव्यांग तपासणी, उपचार व जयपूर फूट वाटपाच्या स्टॉलला भेट देऊन दिव्यांग रुग्णाशी संवाद साधला. भारतीय विचार साधना संस्थेतर्फे तयार करण्यात आलेल्या विचाररथाची किल्ली श्री.फडणवीस यांच्या हस्ते विपिन पाटसकर यांना सुपूर्द करण्यात आली. दिनदर्शिकेचे प्रकाशनही यावेळी करण्यात आले.

See also  कामगार मंत्री डॉ.सुरेश खाडे यांच्याकडून अजमेरा मोरवाडी येथील भूखंडाची पाहणी