आरपारची लढाई लढायला मुंबईकडे निघालोय.. मनोज जरांगे पाटील

औंध : ” मराठा समाजातील लाखो तरुण शिकून बेरोजगार आहेत.मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी हि आरपारची लढाई लढायला मुंबईकडे निघालो आहे” असे प्रतिपादन मनोज जरांगे पाटील यांनी औंध येथे समाजबांधवांसमोर केले.मराठा आरक्षणासाठी मुंबईकडे जातांना जरांगे पाटील यांचा औंध, बाणेर, बालेवाडी, पाषाण, सुतारवाडी, सोमेश्वरवाडी,सूस, महाळुंगे,बोपोडीच्या वतीने सत्कार करण्यात आला याप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
पुढे बोलताना जरांगे पाटील म्हणाले ‘आपल्या नोंदी सापडलेल्या असतानाही ओबीसीत आरक्षण दिले जात नाही व ज्यांच्या कोणत्याही नोंदी नाहीत तरीही त्यांना आरक्षण आहे.आपल्या लेकरांसाठी हा संघर्ष रात्रंदिवस सुरू आहे.आता काहीही झाले तरी आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नाही व आरक्षण मिळाल्यावर औंधमध्ये नक्कीच मोठी सभा घेऊ’ असे आश्वासनही त्यांनी दिले. ‘ आरक्षणातून मराठ्यांची लेकरं आयपीएस,आयएएस अधिकारी झालेले बघायची आहेत हे शेवटचे स्वप्न आहे.हा लढा शेवटच्या टप्प्यात असून आपल्याला हा लढा जिंकायचा आहे.आरक्षण मिळवून देणार हा माझा शब्द असून साडेचार महिन्यात हा प्रामाणिकपणा समाजाला सिध्द करून दिला आहे.छातीवर गोळ्या चालवल्या आणि जीव गेला तरीही तरी आरक्षण मिळवून मराठ्यांच्या पोरांच्या अंगावर गुलाल टाकल्याशिवाय मागे हटणार नाही.विरोध करणारांच्या टोळ्या मागे पडल्या आहेत.हा संघर्ष मुंबईच्या दिशेने चालू असून घराघरातील मराठ्यांनी एकजुटीने मुंबईत यायचे आहे.शांततेत आंदोलन करायचे आहे व मुंबईत मराठी आणि मराठाच दिसेल ‘ असेही जरांगे पाटील म्हणाले. यावेळी औंधमधील मुस्लिम समाजाच्या वतीने जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनास जाहीर पाठिंबा देत त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच शेकडो वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी देखील आंदोलनास शुभेच्छा दिल्या.यावेळी आबाल वृद्ध लहान मुले महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते

See also  मुकुंद किर्दत यांची आम आदमी राज्य प्रवक्ते पदी नेमणूक!