‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ स्वाक्षरी फलकाचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या हस्ते अनावरण

पुणे : ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ योजनेअंतर्गत स्वाक्षरी फलकाचे अनावरण जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात नुकतेच करण्यात आले. पुणे जिल्ह्यात ‘बेठी बचाओ बेठी पढावो’ या योजनेअंतर्गत सर्व यंत्रणेने सक्रीय सहभाग नोंदवून बाल लिंग गुणात्तराचे प्रमाण वाढवण्यासाठी प्रयत्न करावा, असे निर्देशही जिल्हाधिकारी श्री. देशमुख यांनी यावेळी दिले.

‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ योजनेअंतर्गत ‘मी गर्भलिंग तपासणी करणार नाही, मी मुलींची भ्रुणहत्या होऊ देणार नाही, मी मुलींच्या सर्वांगिण विकासासाठी संपूर्ण सहकार्य करीन’ अशा आशयाचा हा स्वाक्षरी फलक सर्वांना स्वाक्षरीसाठी उभारण्यात आला होता.

यानंतर ‘बेठी बचाओ बेटी’ पढाओ या योजनेअंतर्गत गठित केलेल्या जिल्हा कृतीदलाची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, जि. प. उप मुख्य कार्यकारी अधिकारी जे. बी. गिरासे यांच्यासह जिल्हा कृती दलाचे सदस्य उपस्थित होते.

बैठकीत श्रीमती कदम म्हणाल्या, बेठी बचाओ बेटी पढाओ या योजनेअंतर्गत महिला व बाल कल्याण विभागामार्फत सर्वेक्षण करावे. राष्ट्रीय स्तरावरील बाल लिंग गुणोत्तरापेक्षा कमी प्रमाण असलेल्या ग्रामपंचायती शोधून त्यांच्याकरिता विविध उपक्रम राबवावेत. जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय तसेच खाजगी यंत्रणांनी ‘मुलगी वाचवा मुलगी शिकवा’ या राष्ट्रीय अभियानाअंतर्गत जनजागृतीसाठीच्या विविध कार्यक्रमात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहनही श्रीमती कदम यांनी यावेळी केले.

श्री. गिरासे म्हणाले, जिल्हास्तरीय कृतीदलाच्या बैठकीमध्ये शिक्षण विभाग, गृह विभाग, आरोग्य विभाग, महिला व बाल कल्याण विभाग, पंचायत व ग्रामविकास विभाग अशा सर्व विभागांना विविध कार्यक्रम राबविण्याची जबाबदारी सोपविण्यात आली असून जिल्हा कृती दलाच्या सर्व सदस्यांनी ‘मुलगी वाचवा मुलगी शिकवा’ या मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदविला आहे. योजनेच्या सूक्ष्म नियोजनासाठी नुकतेच गावनिहाय बाल लिंग गुणोत्तर सर्वेक्षण पूर्ण केले आहे.

जिल्ह्यातल ९३३ पेक्षा कमी लिंगगुणोत्तर असलेल्या ६६९ ग्रामपंचायती या रेड झोनमध्ये आहेत. या रेड झोनमधील गावांमध्ये सातत्याने जनजागृती करणे आवश्यक असून राष्ट्रीय बालिका दिनाच्या औचित्याने गावपातळीवर विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे, असेही श्री. गिरासे यांनी सांगितले.
0000

See also  उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सिहंगड रस्त्यावरील उड्डाणपुलाचे लोकार्पण