पुणे : या महिन्याच्या अखेरीस आयोजित करण्यात येणारा महासंस्कृती महोत्सव आणि ३५० व्या शिवराज्याभिषेक वर्षानिमित्त आयोजित महानाट्याच्या अनुषंगाने सर्व संबंधित नोडल अधिकाऱ्यांची पूर्वतयारी बैठक निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांच्या अध्यक्षतेखाली आणि जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली.
पुणे येथे आयोजित करण्यात येणारा महासंस्कृती महोत्सव हा राज्यातील सर्व लोककला, सांस्कृतिक वैभवाचे दर्शन घडविणारा असेल आणि ‘शिवगर्जना’ हे महानाट्य शालेय विद्यार्थ्यांसह सर्वांनाच प्रेरणा देणारे ठरेल, असे श्रीमती ज्योती कदम यावेळी म्हणाल्या.
बैठकीस उपजिल्हाधिकारी अर्चना तांबे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागनाथ येमपल्ले, नगरपालिका प्रशासनचे जिल्हा प्रशासन अधिकारी व्यंकटेश दुर्वास, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेंद्र काटकर, सहायक परिवहन अधिकारी अमर देसाई यांच्यासह सर्व संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
‘शिवगर्जना’ या महानाट्याचे २३, २४ आणि २५ फेब्रुवारी असे तीन दिवस दररोज संध्याकाळी एक सादरीकरण होणार आहे. येरवडा कारागृहाचे प्रशिक्षण केंद्रासमोरील मोकळ्या जागेत हे महानाट्य आयोजित करण्याचे नियोजन आहे. त्यादृष्टीने सार्वजनिक बांधकाम विभाग, परिवहन विभाग, पोलीस, सांस्कृतिक कार्य आदी विभागांनी संयुक्त स्थळपाहणी करुन जागानिश्चिती, वाहनतळाची व्यवस्था, वाहतूक व्यवस्था आदींबाबत आराखडा तयार करावा असे श्रीमती कदम म्हणाल्या.
या महिनाअखेरीस पाच दिवसांचा महासंस्कृती महोत्सव लोकशाहीर अण्णा भाऊ साठे सभागृह बिबवेवाडी येथे आयोजित करण्यात येणार असून प्राधान्याने जिल्ह्यातील कलाकार व कलावंताचा निवडीसाठी विचार करण्यात येणार आहे. शिवचरित्रावर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम, महाराष्ट्रातील सर्व लोककलांचे प्रकार, कोकणातील नमन, दशावतार, विदर्भातील झाडीपट्टी आदी राज्यातील विविध महोत्सव, जिल्ह्यातील विविध उत्सव, सण, कविता, देशभक्तीपर गीते आदींविषयक कार्यक्रम यामध्ये सादर करण्यात येणार आहेत.
महोत्सवात छत्रपती शिवाजी महाराज यांचे सचित्र दालन, संरक्षित गडकिल्ल्यांची माहिती असणारे प्रदर्शन, हस्तकला, पर्यटन, वस्त्रसंस्कृती, बचत गटांच्या उत्पादने आदींसाठी प्रदर्शन दालने उभारण्यात येणार आहेत. मर्दानी खेळ, शिवकालीन कला, लुप्त होत चाललेल्या खेळांसंबंधित कार्यक्रम, विविध स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.
घर ताज्या बातम्या पुण्यात २३ ते २५ फेब्रुवारीदरम्यान ‘शिवगर्जना’ महानाट्य; महिनाअखेरीस ‘महासंस्कृती महोत्सव’