पैठणचे संत ज्ञानेश्वर उद्यान आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटनस्थळ म्हणून विकसीत करावे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : पैठण येथील संत ज्ञानेश्वर उद्यानाचा आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटनस्थळ म्हणून विकास करावा यासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

संत ज्ञानेश्वर उद्यान विकसित करण्याबाबत मंत्रालयात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली शिखर समितीची बैठक झाली. यावेळी दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संदिपान भुमरे सहभागी झाले होते तर मुख्य सचिव डॉ. नितीन करीर, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ.पी. गुप्ता, नियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरव विजय, पर्यटन विभागाच्या सचिव जयश्री भोज  उपस्थित होते.

या उद्यानाच्या विकास कामांसाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच उच्चाधिकार समितीची बैठक झाली. त्यामध्ये समितीच्या शिफारशीनुसार विकासकामांच्या प्रस्तावात सुधारणा करून १४९ कोटी रुपयांचा सुधारित प्रस्ताव करण्यात आला.

पैठण येथील संत ज्ञानेश्वर उद्यान आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्यासाठी मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली यापूर्वी वेळोवेळी बैठका घेण्यात आल्या आहेत. मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनी छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत संत ज्ञानेश्वर उद्यान पुनर्विकासासाठी १५० कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी केली होती.

संत ज्ञानेश्वर उद्यान विकसित व सुशोभित करण्याचा प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी जागतिक स्तरावरील सल्लागार निवडीची निविदा प्रक्रिया पूर्ण करून सल्लागाराला  कार्यारंभ आदेश देखील देण्यात आला आहे. यावेळी उद्यानाच्या सुशोभीकरण आणि पुनर्विकास कामांचे सादरीकरण करण्यात आले.

See also  आचारसंहितेचे उल्लंघन होतेय ? मग, सीव्हिजिल ॲपवर तक्रार करा,भारत निवडणूक आयोगाने विकसित केला मोबाईल ॲप