समाज कल्याण विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन उन्नती साधा-विभागीय आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार

पुणे :- केंद्र आणि राज्य  शासनाच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या समाज कल्याण विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन लाभार्थ्यांनी आपली उन्नती साधावी, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार यांनी केले.

राष्ट्रीय मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळ, राष्ट्रीय अनुसूचित जाती व वित्त विकास महामंडळ आणि राष्ट्रीय सफाई कर्मचारी वित्त व विकास महामंडळामार्फत दूरदृष्यप्रणालीद्वारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या   लाभार्थ्यांशी संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांच्या लाभांचे वितरण जिल्ह्यातील लाभार्थ्यांना  करण्यात आले. यावेळी डॉ. पुलकुंडवार बोलत होते. कार्यक्रमाला समाज कल्याण आयुक्त ओमप्रकाश बकोरिया, जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे,  समाज कल्याण सहायक आयुक्त विशाल लोंढे, महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक राम राठोड उपस्थित होते.

विभागीय आयुक्त डॉ.पुलकुंडवार म्हणाले, केंद्र आणि राज्य   शासन देशातील प्रत्येक नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी, प्रत्येकाला सन्मानाने जगता यावे यासाठी विविध योजना राबविते. या योजनांचा लाभ नागरिकांनी घ्यावा. पीपीई किट वाटप केलेल्या लाभार्थ्यांनी याचा योग्यपद्धतीने उपयोग करावा आरोग्य सुरक्षित करावे अशी सूचना त्यांनी केली.

बारामती येथे भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. अशा रोजगार मेळाव्याद्वारे प्रशिक्षणाची सोय उपलब्ध झाली आहे.  या प्रशिक्षणाचा तसेच उद्योगासाठी गरजेचे कौशल्य आत्मसात करुन त्याचाही उपयोग व्यवसाय वाढीसाठी करावा असे आवाहनही डॉ.पुलकुंडवार यांनी  लाभार्थ्यांना केले.

श्री.बकोरिया म्हणाले, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये लाभ वाटप आणि संवादाचा  कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.  या कार्यक्रमात राज्यातील ६२२ जणांना आयुष्यमान कार्डचे तसेच पीपीई किटचे वाटप करण्यात येणार आहे. यामुळे आरोग्य सेवेसाठी आणि उपचारासाठी लाभार्थ्यांना खर्च करण्याची गरज पडणार नाही.

सामाजिक न्याय विभागाच्यावतीने जगातील प्रमुख २०० विद्यापीठात ७५ विद्यार्थ्यांना आणि राज्यातील प्रमुख विद्यापीठात २०० विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी शिष्यवृत्ती देण्यात येते. या व अन्य योजनांचा लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा, त्यासाठी समाज कल्याण विभागाशी संपर्क साधावा असे आवाहन त्यांनी केले.

जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांमुळे वंचित व उपेक्षित नागरिकांच्या जीवनमानात सुधारणा होणार आहे असे सांगून लाभांच्या मंजूरीसाठी प्रशासनातर्फे सर्व प्रकारची मदत करण्यात येईल असे सांगितले.

या कार्यक्रमात प्रातिनिधिक स्वरुपात लाभार्थ्यांना लाभाचे वाटप करण्यात आले. महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या आणि संत रोहिदास चर्मकार महामंडळाच्या माध्यमातून पात्र लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरुपात कर्ज वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला विविध योजनांचे लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

See also  न्या.शिंदे समितीच्या आढावा बैठकीत जात नोंदींच्या पुराव्याबाबत सविस्तर चर्चा