भारत महासत्ता होणार की भ्रष्टाचारात नंबर १

दीपक श्रोते –
भ्रष्टाचाराचे बरबटलेल्या काँग्रेस पासून देशाला दुसरा पर्याय म्हणून यांना संधी दिली.
परंतु हे भाजप वाले तर त्यांच्या पेक्षा दहापट बदमाश निघाले. खोट्या गोष्टी पसरवणे, खोट्याचा रेटा लावणे यात हे माहीर झालेत.
ज्यांच्या पासून पिच्छा सोडायचा त्याच इतर पक्षातील भ्रष्टांना पक्षात घेऊन होती नव्हती इज्जत ही घालवून बसले.
बेकारीने उच्चांक गाठला, भ्रष्टाचार सर्वत्र बोकाळला, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करतो म्हणणारे, शेतकऱ्यांचे हाल बेहाल करून टाकले. कापूस, सोयाबीन, तुरीला तर दहा वर्षाआधी जे भाव होते त्यापेक्षा कमी भावात माल विकावा लागत आहे.
विध्वंसक, सिमेंटधारी रस्ते विकास केला हे सांगावे तर बेंगळुरू सारखे शहर सिमेंटधारी विकासाने ठणठण कोरडे केले, आयटी शहर पिण्याच्या पाण्याला मोताज झाले. उष्णतेने जनता त्रस्त होत आहे, निसर्ग ओरबडल्यामुळे दरड कोसळून गावे गाडली जाणे, रस्त्याने जाताना दरड कोसळून मृत्यू ओढवणे ह्याचे प्रमाण वाढले आहे. हिमालय धोक्याची घंटा वारंवार देतोच आहे तरी ओरबडणारा विकास सुरूच आहे. असाच विकास होत राहिला तर पुढील पाच वर्षात देशातील इतर मोठी २० शहरे अशीच बेंगळुरू सारखी कोरडी होणार हे दिसतेच आहे, सरकारी अहवालाच हे सांगतो आहे.

नमामी गंगे, नमामी चंद्रभागेच्या  नावाखाली फक्त जाहिराती व मोठ मोठे उत्सव भरवले, नदीकाठ सुधार प्रकल्प आणून ठेकेदारांना हजारो कोटींची कंत्राटे व हितचिंतकांना नद्या मारून, बंदिस्त करून जमीन मोकळी करून दिली जात आहे. देशभरात  एकही नदी ना स्वच्छ झाली ना बारमाही वाहती. उलट नद्या, नाले, ओढे अधिक प्रदूषित झाले, जंगल सपाट्याने संपवले.

देश महासत्ता होणार, जगातील तिसरी आर्थिक ताकद होणार ह्या गप्पा मारत असताना पुढील पाच वर्षे देशातील ६०% म्हणजे ८० कोटी जनता खाण्यालाही महाग राहणार त्यांना लाचार ठेवत त्यांच्या दोन वेळच्या जेवणाची व्यवस्था सरकार करणार याची गॅरंटी देत जाहिराती सुरू आहे. एकेवेळी फुकट देण्याला रेवडी म्हणणारे व त्यावर बंदी घालू म्हणणाऱ्यांना त्याचाच आधार घ्यावा लागत आहे ही शोकांतिका आहे.  यांचे बघून विरोधकही फुकट देण्याच्या घोषणा देत आहे. कुठल्या दिशेने ही देशाची वाटचाल सुरू आहे?

आता ठोस असे काही दाखवायला नाही तर देव आणि धर्माचा खोटा आडोसा घेत बसले.आमच्या सारख्या सामान्य जनतेचा पार भ्रमनिरास केला. यांच्या पेक्षा तेच बरे होते ही म्हणायची वेळ आली.

         

See also  आरक्षण व राजर्षी शाहू महाराज;लेखन अनिल नरके (प्रा. हरी नरके यांचे पुतणे).